Yes, paddy production is possible even in western Vidarbha
Yes, paddy production is possible even in western Vidarbha 
मुख्य बातम्या

होय, पश्‍चिम विदर्भातही धान उत्पादन शक्य

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्यात धानाचे पीक पूर्व विदर्भात मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. पश्‍चिम विदर्भात मात्र हे पीक घेता येत नाही, असा एक समज तयार झालेला आहे. परंतु, सिंचनाची सोय असेल तर ठिबक सिंचन पद्धतीने धानाचे पीक घेता येऊ शकते, असा विश्‍वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर केलेल्या प्रयोगातून समोर आला आहे. 

कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. नरसिंह पार्लावर व सहायक प्राध्यापक डॉ. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिविद्या विभागातील पीएच.डी.चे विद्यार्थी संजय सरोदे यांच्यामार्फत सदर प्रयोग विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहे. पहिल्याच वर्षात अर्ध्या एकरात लागवड करण्यात आली होती. यातून निघालेल्या उत्पादनानुसार हेक्टरी ७२ ते ७४ क्विंटल एवढी उत्पादकता निघाली आहे. हा प्रयोग पुढील दोन वर्षे सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रात धान हे तृणवर्गातील प्रमुख अन्नधान्य पीक मानले जाते. जास्त पाण्याच्या प्रदेशात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. धान पिकाला जवळपास १००० मिलिमीटर ते २२५० मिलिमीटर पावसाची गरज असते. परंपरागत धान लागवड पद्धतीमध्ये म्हणजेच पाणी साचलेल्या बांधामध्ये लागवड करत असताना, ५०-६० टक्के पाणी हे निरनिराळ्या कारणांनी वाया जाते व पर्यायाने या पद्धतीमध्ये पाण्याची वापर क्षमता कमी मिळते. पश्चिम विदर्भात धान शेती करण्यास असंख्य मर्यादा आहेत. त्यातच सद्यःस्थितीत शेतीसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर याकडे आजही तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. 

सध्या पीक उत्पादकता काढताना क्षेत्र हेच प्रमाण धरले जाते. मात्र, ही उत्पादकता घेण्यासाठी त्या पिकाला त्याच्या वाढीच्या काळात एकरी अथवा हेक्टरी किती पाणी दिले गेले किंवा एक किलो धान्य उत्पादनासाठी किती पाणी वापरले याबाबतची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पाण्याचा अमर्याद व अनावश्यक वापर सुरू असल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सूक्ष्म सिंचन व प्रामुख्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ५० टक्के पाण्याची बचत होत असल्याचे प्रयोगाच्या निष्कर्षावरून सिद्ध झाले आहे. धान पिकाला खूप पाणी लागते हा समज दूर होऊ लागला आहे. 

पिकाला गरजेनुसार व पीक वाढीच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केल्यास पाणी बचतीसोबतच धानाचे भरपूर उत्पादन मिळू शकते. पाण्याची कमी उपलब्धता लक्षात घेऊन ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करून पश्चिम विदर्भामध्येसुद्धा धानाचे पीक घेणे शक्य आहे काय, हे पडताळून पाहण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे धान लागवड तसेच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागातील अखिल भारतीय तण व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर या वर्षीपासून सदर प्रयोगाची सुरुवात करण्यात आली.  

ठिबक सिंचनाद्वारे धान पिकामध्ये पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खतांच्या मात्रा किती प्रमाणात, किती दिवसाच्या अंतराने व किती वेळा विभागून द्याव्यात इत्यादींबाबतचा शास्त्रोक्त अभ्यास या प्रयोगातून केला जात आहे. तसेच रासायनिक खतांची कार्यक्षमता, पाणीवापर कार्यक्षमता व पाणीबचत, धान पिकाची उत्पादकता व प्रतिहेक्टरी एकूण आर्थिक मिळकत या बाबी तपासल्या जाणार आहेत. पारंपरिक पद्धतीने आज एक किलो कच्चा धान पिकविण्यासाठी ३००० ते ३५०० लिटर पाणी लागते. ठिबक पद्धतीने एक किलो कच्चा धान पिकविण्यासाठी ८०० ते ९०० लिटर पाणी लागते. 

फर्टिगेशन 

  • नत्रयुक्त खतासाठी युरिया आणि पोटॅशसाठी पांढरे म्यूरेट ऑफ पोटॅशचा वापर
  • स्फुरद जमिनीतून
  • खतमात्रा : १२०: ६०: ६० किलो नत्र, स्फुरद, पालाश/ हेक्टरी
  • रासायनिक खतांची विभागणी : पीक वाढीच्या अवस्थेनुसार ७ दिवसाच्या अंतराने व १४ दिवसांच्या अंतराने विभागून देण्यात आले. 
  • प्रयोगाअंतर्गत धान लागवडीसंबधी महत्त्वाच्या बाबी

  • धानाचे वाण : परभणी - आविष्कार
  • लागवड : २२ जून
  • लागवडीची पद्धत : पेरीव पद्धत (२०x १० सेंमी)
  • ठिबक सिंचनाची मांडणी : इनलाइन ठिबक (१६ मिमी)
  • ठिबक नळी ः २ लिटर प्रतितास क्षमता
  • दोन ड्रिपरमधील अंतर ः ४० सेंमी
  • ठिबक सिंचन गरजेनुसार मोजून एका ठिबक नळीवर चार ओळींप्रमाणे मांडणी
  • (अधिक माहितीसाठी संपर्क -  संजय सरोदे, मो. ७८८७६३११५२)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

    Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    SCROLL FOR NEXT