Wrong administration, boat to farmers
Wrong administration, boat to farmers 
मुख्य बातम्या

Solapur News : चूक प्रशासनाची, बोट शेतकऱ्यांकडे

Sudarshan Sutaar

सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून अपात्र असतानाही लाभ घेतला म्हणून आयकरदात्या शेतकऱ्यांकडून सन्मानाने दिलेला निधी आता वसुली मोहीम राबवून परत घेतला जातो आहे. त्यासाठी राज्यातील दोन लाखांवर शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. अर्ज भरून घेताना आयकरची माहिती न मागितल्यामुळेच हा प्रकार घडला असताना, या सगळ्या प्रकारात चूक प्रशासनाची असून, बोट मात्र शेतकऱ्यांकडे दाखवले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.    

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसाह्य व्हावे, यासाठी वार्षिक सहा हजार रुपये देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी केंद्राने स्वतंत्रपणे पोर्टल सुरू करून त्यावर नोंदणी करून लाभ दिला. त्यासाठी काही नियम आणि अटीही घातल्या. या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी  राज्याच्या महसूल प्रशासनावर सोपवली. त्यानुसार तहसील आणि तलाठ्यांवर यासंबंधीच्या अर्जाची छाननी करून, त्रुटी शोधून पात्र लाभार्थी ठरवण्याचे अधिकार दिले. पण या यंत्रणेने विशेष लक्ष दिले नाही, जीआरमधील अटी-शर्तींना पोर्टलमध्ये स्थान न देण्यात आल्यामुळेच आता पुन्हा एकदा अपात्र लाभार्थी बाहेर काढण्याचे कामही त्यांच्यावरच सोपवले, यावरून योजनेच्या अंमलबजावणीतील गोंधळ समोर आला आहे.

प्रशासनावर नामुष्की वास्तविक, पोर्टलवरील अर्जातही त्रुटी आहेत. अर्ज भरताना आयकरदाते वा सरकारी नोकर आहात का, असा स्वतंत्र उल्लेख हवा. पण तो नाही, शिवाय पुढे तलाठी वा तहसीलस्तरावरही त्याच वेळी त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे, पण ती केली गेलीच नाही. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या आदेशामध्ये आयकरदात्यांसंबधी स्पष्ट निर्देश असतानाही ही नावे या यादीत आलीच कशी, हा प्रश्न आहे. आता राज्यातील आयकर भरणाऱ्या दोन लाखावर शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आता मात्र याचे सर्व खापर संबंधित आयकरदात्या शेतकऱ्यांवरच फोडले जात आहे. आधी सन्मान करून निधी दिला, पण आता नोटिसा बजावून अवमान करून तो परत घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

यांना बजावल्या नोटिसा नोटिसा बजावलेल्या शेतकऱ्यांमध्ये आयकर भरणारे शेतकरी, स्वत:हून अपात्र ठरलेले, पात्र नसतानाही लाभ घेतलेले, सुरुवातीस लाभ घेऊन जमीन विक्री केलेले आणि मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी त्या त्या तहसीलस्तरावर त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यात आता पुढे तलाठ्यांकडे  त्या देण्यात  येऊन संबंधितांकडून रक्कम वसूल केली जात आहे.  

सोलापुरात पावणेदोन कोटीची वसुली एकट्या सोलापूर जिल्ह्यात आयकर भरणाऱ्या १३ हजार ६५६ शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १३ कोटी २४ लाख रुपयांची वसुली केली जाणार आहे. त्यापैकी २६९८ शेतकऱ्यांकडून १ कोटी ८२ लाख रुपयांची वसुलीही करण्यात आली आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांकडूनही वसुलीचे काम तातडीने करा, अशा सूचना प्रत्येक तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

किसान सन्मान निधीसाठी अर्ज भरतेवेळी मला आयकर संदर्भातील माहिती विचारण्यात आली नाही. इतरांप्रमाणेच माझा अर्ज भरला गेला. मात्र मलाही नोटीस आली आहे. माझ्याकडे फक्त साडेतीन एकर शेती आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून काजू उद्योग आहे. खरंतर प्राप्तिकर भरण्याइतपत माझा उद्योग मोठा नाही. पण बँक आयटी रिटर्नशिवाय कर्जच देत नाही.  मग काय करणार, केवळ या एका कारणामुळे मला वसुलीची नोटीस आली आहे. आता आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी काय करावे. - सुनील शिंदे, शेतकरी, नांदवडे, ता, चंदगड, जि. कोल्हापूर

शासनाच्या निर्देशानुसार आम्ही किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थी शोधून नोटिसा पाठवल्या आहेत. प्रत्येक तहसीलस्तरावर अशा याद्या तयार केल्या आहेत. रक्कम वसुलीच्या सूचना दिल्या आहेत, याबाबत अधिक काय बोलणार. - अजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT