चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद मुंबईत
चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद मुंबईत 
मुख्य बातम्या

चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद २९पासून मुंबईत

टीम अॅग्रोवन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईतील आयआयटी पवई येथे येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१९ या काळात चौथ्या ‘जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील सुमारे पन्नास देशांतील १ हजाराहून अधिक तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन परिषदेची माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन पुढाकार आणि कन्व्हर्जन्स सोसायटी (डीएमआयसीएस) यांच्या सहकार्याने ही परिषद होणार आहे. या जागतिक परिषदेचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पवईमधील आयआयटीच्या परिसरात होणार आहे. परिषदेच्या आयोजनात भारत सरकार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्था, विविध राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, संयुक्त राष्ट्र संघटनेअंतर्गत यूएनडीपी, युनिसेफ, युनिस्केप, यूएनएसडीआर, जागतिक आरोग्य संघटना (WHO) इत्यादी संस्था, त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील एफआयसीसीआय व सीआयआय या संस्थांसह विविध विद्यापीठे, तांत्रिक संस्था सहभागी होणार आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. परिषदेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, एक हजाराहून जास्त सदस्यांनी नोंदणी केलेली आहे. या परिषदेत संशोधन प्रबंध वाचण्यासाठी सुमारे पाचशेपेक्षा जास्त संशोधकांनी आपले प्रबंध परिषदेदरम्यान मान्यतेसाठी पाठविलेले आहेत. यामध्ये शंभरपेक्षा जास्त प्रबंध हे परदेशांतील सुमारे ५० देशांतील संशोधकांनी सादर केलेले आहेत. आजअखेर यापैकी २५ पेक्षा जास्त प्रतिनिधींनी प्रत्यक्ष परिषदेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. या देशांमध्ये  बांगलादेश, अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, नेपाळ, नेदरलँड, स्पेन, कॉस्टारिका, ब्राझील, थायलंड, आइसलॅन्ड, साउथ आफ्रिका, फिलिपिन्स, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश आहे, अशी माहिती अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई यांनी दिली. या परिषदेमध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयातील ४० जागतिक दर्जाच्या व्याख्यात्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे व्याख्याते या परिषदेदरम्यान विविध विषयांवरील विशेष सत्रामध्ये आपली व्याख्याने देणार आहेत. या परिषदेमध्ये पाच विशेष सत्रांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ‘महापौर आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन’, ‘तरुण आणि आपत्ती व्यवस्थापन’, ‘संशोधक व नावीन्यपूर्ण उत्पादन करणारे घटक’, ‘आपत्ती व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा वापर’ आणि ‘प्रसार माध्यमे व आपत्ती व्यवस्थापन’ या विविध विषयांवरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या संस्था सहभागी होणार आहेत. या परिषदेदरम्यान आपत्ती व्यवस्थापनातील विविध पैलूंवर आधारित ७० पेक्षा जास्त स्टॉल असलेले प्रदर्शन उभारण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्था व कंपन्या यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांकडून त्यांच्या नावीन्यपूर्ण उत्पादनांचेही प्रदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेची सांगता १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या परिषदेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रतिनिधीही उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT