कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान तयार झाले आहे. आज (ता. ६) कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्र, कर्नाटक ते मालदीव परिसर या भागांतही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर पाकिस्तान, हिमालय या भागांतही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पंजाब व हरियानाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तामपानावर झाला आहे.

कोकणात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. भिरा येथे १७.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत थंडी गायब झाली असून, किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या वर गेला आहे. निफाड येथे १२.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी येथे किंचित थंडी आहे. त्यामुळे परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात ११.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, नांदेड येथील किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. विदर्भातील बहुतांशी भागातून थंडी परतली आहे. त्यामुळे किमान तामपान वाढू लागले आहे. अकोला, वर्धा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. उर्वरित अमरावती, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथील किमान तापमानही कमी झाले आहे.

मंगळवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १९.० (२), अलिबाग २०.२ (३), रत्नागिरी १८.४ (-१), भिरा १७.५ (२), डहाणू १९.३ (२), पुणे १३.५ (२), नगर १३.७ (१), जळगाव १२.८, कोल्हापूर १६.३, महाबळेश्वर १६.२ (२), मालेगाव १५.२ (४), नाशिक १३.८ (३), निफाड १२.०, सांगली १४.६, सातारा १२.४ (१), सोलापूर १५.६ (-२), औरंगाबाद १५.० (२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ११.८, परभणी शहर १२.४ (-३), नांदेड १५.५ (१), उस्मानाबाद १०.७, अकोला १७.७ (२), अमरावती १७.४(१), बुलडाणा १७.८, चंद्रपूर १६.४, गोंदिया १६.० (१), नागपूर १६.० (१), वाशीम १३.६, वर्धा १६.८ (२), यवतमाळ १७.४ (१) राज्यात शनिवारीही पावसाची शक्यता ढगाळ हवामानाचा प्रभाव तीन ते चार दिवस राहणार आहे. राज्यात गुरुवारी (उद्या) आणि शुक्रवारी हवामान ढगाळ राहणार आहे. शनिवारी (ता. ९) दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही हवामान ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT