In the throes of rain Excessive damage to onions
In the throes of rain Excessive damage to onions 
मुख्य बातम्या

पावसाच्या तडाख्यात कांद्याचे अतोनात नुकसान

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसला आहे. देवळा, कळवण, इगतपुरी, निफाड व सिन्नर तालुक्यात कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान काढणीस आलेल्या उन्हाळ कांद्याचे झाले आहे. 

कांदा काढणीचा हंगाम जोमात असला, तरी मजूरटंचाईमुळे  उत्पादकांना अडचणी आहे. त्यात पूर्वमोसमीच्या तडाख्यात कांदा भिजल्याने शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट ओढवले आहे. अनेक ठिकाणी काढणीविना असलेला कांदा पावसामुळे भिजला आहे. त्यामुळे काढणीपश्‍चात कांद्याची प्रतवारी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे.

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या सिन्नर, देवळा, कळवण व निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाने हजेरी लावली. यातही पुन्हा कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर, द्राक्ष हंगाम आटोपल्यानंतर खरड छाटणी झालेल्या बागांमध्ये सुद्धा अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढलेला आहे.

निफाड तालुक्यातील शिंगवे परिसरात अनेक ठिकाणी गाजर काढणीचा हंगाम सुरू आहे. एकीकडे वाढते तापमान व झालेला पाऊस, यामुळे काढणीस आलेले गाजर पावसामुळे सडण्याची शक्यता आहे, अशी भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यासह गोदाकाठ परिसरात वीटभट्टी व्यावसायिकांना फटका बसला आहे. 

कांदा बियाणे उत्पादनात घटीची शक्यता 

सिन्नर तालुक्यातील उत्तरपूर्व भागात झालेल्या पावसामुळे कांदा बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असेच काढणीस आलेले बियाणे पावसात भिजल्याने उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा बियाणे उत्पादनात घट होणार आहे. देवळा तालुक्यातील विठेवाडी, सावकी शिवारात जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे कागदाने झाकलेला कांदाही भिजला. यासह हिरवी मिरची, टोमॅटो, कोंथिबीर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेवगा, टोमॅटो, मिरचीचा फुलोरा गळून ओढला आहे.

काढणीचे काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्याची प्रतवारी पूर्णपणे बिघडली आहे. हा कांदा टिकणार नाही. बाजारात पण कुणी घेईल की नाही, अशी समस्या आहे. - मंगेश कातकाडे, कांदा उत्पादक, नायगाव, ता. सिन्नर.

हाताशी आलेली कांदा व भाजीपाला पिके पावसामुळे हातातून गेली आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अगोदरच कोरोनामुळे नुकसान झाले आहे. नाहीतर शेतकरी उभा राहणार नाही.  - कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT