Survive the sweetness of hapus rate
Survive the sweetness of hapus rate 
मुख्य बातम्या

हापूसचा दराचा गोडवा टिकून 

राजेश कळंबटे

रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा कोकणच्या हापूसवर झाला आहे. उत्पादन घट झाली असून, या वर्षी सरासरी उत्पादन ३० टक्केच आहे. त्यामुळे आज (रविवारी) वाशी मार्केटमध्ये १५०० ते ४००० रुपये प्रतिपेटी दर मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये यंदा पाचशे रुपये पेटीमागे चढे दर आहे; मात्र टाळेबंदीचे धोरण पुन्हा एकदा आंबा व्यावसायिकांपुढे आव्हानात्मक ठरणार आहे. 

यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावली. पुरेश थंडी न पडल्यामुळे पालवी आलेल्या झाडांना मोहोरच आला नाही. या परिस्थितीला सामना करत असतानाच डिसेंबर, फेब्रुवारीत अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचा सामना करावा लागला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक फवारण्यांवर खर्चही करावा लागला आहे. मार्च महिन्यात येणारे हापूसचे उत्पादन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुलनेत पाच ते दहा टक्केच आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आलेल्या उष्णतेच्या वादळामुळे फळगळ आणि हापूसमधील साका वाढीचे प्रमाण अधिक होते. त्याचा दर्जावरही परिणाम झाला होता. 

हवामानातील बदलांचा सामना करत बागायतदारांच्या हाती कमी उत्पादन लागले आहे. दर्जेदार आंब्याला चांगला दर मिळत आहे. याच कालावधीत आखाती देशांसह युरोपमध्येही निर्यात सुरू झाल्याने आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या फळ बाजारात दररोज १८ ते २० हजार पेटी वाशी मार्केटमध्ये जात आहेत. फक्त गुढीपाडव्याला मुहूर्ताच्या दिवशी ३४ हजार ही सर्वाधिक पेटी गेली. त्यानंतर पुन्हा आंबा पेटी जाण्याचे प्रमाण घसरले आहे. 

एप्रिल महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून सरासरी ६० हजार पेटी जाते. त्याचा फायदा दरावर झाला आहे. पाच डझनच्या पेटीचा दर मुंबईत पाचशे रुपयांनी वधारला आहे. स्थानिक बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे दर वधारलेले आहेत. त्यामुळे निर्यातही कमी झाली आहे. पहिल्या टप्प्यात उत्पादनाचा बहर ओसरला असून, दुसऱ्‍या टप्प्यातील आंबा २० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या हापूसची आवक घटली आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत दर चढेच राहील, असा बागायतदार अंदाज व्यक्त करत आहेत. 

आतापर्यंतच्या इतिहासात एवढा दर केव्हाच मिळाला नसल्याच्या प्रतिक्रिया बागायतदार व्यक्त करत आहेत. यंदा उत्पादन कमी असले तरी दर अधिक आहेत; मात्र अखेरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनही कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत कडक लॉकडाउन झाला, तर त्याचा परिणाम कोकणातून वाशीसह विविध बाजारांत जाणाऱ्‍या आंबा वाहतुकीवर होऊ शकतो. तसेच ग्राहकच नसल्यामुळे दरही घसरू शकतात. गतवर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तसे झाले तर पुन्हा आंबा काढणीसाठी बाहेर पडणाऱ्‍या कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्‍न येतो. गतवर्षी काही बागायतदारांनी आंबाच झाडावरून काढला नव्हता. पडून वाया गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

दरम्यान, काही बागायतदारांनी याचा फायदा घेऊन घरोघरी थेट हापूस विक्रीचा फंडा राबवला होता. कोरोनाच्या इष्टापत्तीचा फायदा काही बागायतदार सकारात्मकतेने उचलत आहेत. त्यामुळे वाशीतील बाजारात जाणाऱ्‍या एकूण मालावर परिणाम झाल्याचे तेथील व्यावसायिक कबूल करतात. सुमारे वीस टक्के माल मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांत जात आहे. अनेक परजिल्ह्यांतील व्यावसायिक थेट कोकणात येऊन बागायतदारांच्या घरी जाऊन आंबा खरेदी करत आहेत. 

हापूसचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
रत्नागिरी ६५ हजार
सिंधुदुर्ग  ३० हजार २४०

या वर्षी हंगामात २० ते २५ टक्केच उत्पादन राहील. त्यामुळे दर टिकून राहतील. बागायतदारांना हा हंगाम सर्वांत वाईट जाणार आहे. दरवर्षी पाडव्याला १ लाख पेटी जाते. यंदा ती अवघी ३५ हजार आहे.  - डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष कोकण आंबा उत्पादक प्रक्रिया संघ 

हंगामाच्या तोंडावर पडलेल्या पावसामुळे आंबा डागी झाला आहे. चांगल्या फळाला दर आहे. मात्र टाळेबंदी कडक झाली तर वाहतुकीचा प्रश्‍न उद्‍भवू शकतो.  - सचिन दाभोळकर, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग 

हापूसची आवक कमी असून, ग्राहकांकडून मागणी वाढलेली आहे. परिणामी, हापूसचे दर तुलनेत अधिक आहेत. त्याचा फायदा नक्कीच बागायतदारांना होऊ शकतो.  - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती नवी मुंबई 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT