Soybean arrivals on the backdrop of Diwali
Soybean arrivals on the backdrop of Diwali 
मुख्य बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनची आवक वाढती

टीम अॅग्रोवन

पुणे : दिवाळीचा  सण आणि रब्बी पेरणी तोंडावर आल्याने बाजार समित्यांत चालू आठवड्यात सोयाबीनची आवक वाढली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक कमीच असून प्रक्रिया प्लांट्सची थेट खरेदीही वाढली आहे. देशभरातील बाजार समित्यांमध्ये १२ ते १३ लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक होत आहे. महाराष्ट्रात सरासरी ३५०० ते ५००० रुपये, मध्य प्रदेशात ४००० ते ५५०० रुपये आणि राजस्थानमध्ये ४७०० ते ५४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. देशभरातील बाजार समित्यांत बुधवारी (ता. २७) आतापर्यंतची सर्वाधिक आवक झाल्याचा दावा जाणकारांनी केला. राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने सोयाबीन काढणीच्या कामाला विलंब होत होता. मात्र आता सर्वंच भागांत सोयाबीन मळणीने वेग घेतला आहे. यंदा हंगामाच्या प्रारंभीच चांगले दर असल्याने शेतकऱ्यांना दराची आशा होती. मात्र, केंद्राच्या विविध निर्णयांनी दर घसरले. त्यामुळे पुढील काळात तरी दर वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीन मागे ठेवत होते. मात्र दिवाळीचा सण आल्याने बाजारात आवक वाढत आहे. परंतु ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आहे. 

यंदा सोयाबीन हंगामालाच उशीर झाला. त्यातच अनेक शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने गरजेपुरते सोयाबीन विकताना दिसत आहेत. लातूर बाजार समितीत दिवाळीच्या १० दिवस आधीपासून ७० ते ८० हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती. मात्र सध्या ३० ते ४० हजार क्विंटलचीच आवक होत असल्याचे बाजार समित्याच्या सूत्रांनी सांगितले. तसेच अकोला बाजार समितीतही यंदा आवक निम्मीच आहे. 

प्रक्रिया प्लांट्सची खरेदी वाढली गेल्या हंगामात सोयाबीनमधील तेजीने व्यापाऱ्यांना चांगला लाभ झाला. हा दर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया प्लांट्सवर मिळाला. त्यातच बाजार समित्यांपेक्षा येथे अधिक दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी बाजार समित्यांऐवजी थेट प्रक्रिया प्लांट्सना पुरवठा करत आहेत. लातूर विभागात प्लांट्सची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच अकोला, वाशीम, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये प्लांट्सना थेट विक्री वाढली आहे. यामुळे बाजार समित्यांतील आवकेचा आकडा कमी दिसत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

गरजेनुसार विक्री गेल्या हंगामातील दर पाहता यंदा शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीला प्राधान्य दिल्याचे दिसते. मागील आठवड्यापर्यंत आवक सर्वंच बाजार समित्यांमध्ये कमीच होती. परंतु दिवाळीच्या सणामुळे चालू आठवड्यात आवक वाढली आहे. दिवाळीनंतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आवक वाढण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे, मात्र शेतकरी काय निर्णय घेतात यावर ही आवक अवलंबून आहे. त्यातच आता खरिपाचाही पेरणी सुरू होणार असल्याने त्यामुळेही आवक वाढेल, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर लातूर बाजार समितीत ४० हजार ते ५० हजार पोते सोयाबीनची आवक होत आहे. चालू आठवड्यात आवक वाढली. मात्र अपेक्षेप्रमाणे नाही. गेल्या वर्षी याच काळात ७० ते ८० हजार शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा असल्याने १० किंवा २० टक्क्यांपर्यंतच सोयाबीनची विक्री करत आहेत. त्यातच प्रक्रिया प्लांट्सचीही थेट खरेदी वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीत आवक कमी दिसत आहे. सध्या बाजार समितीत सोयाबीनला ४३०० ते ४९०० रुपये दर मिळत आहे.  - अशोक अग्रवाल, सोयाबीन व्यापारी, लातूर 

अकोला बाजार समितीत यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत विचार करता आवक समान असल्याचे चित्र आहे. दर मात्र गेल्या वर्षी ४००० ते ४२०० रुपयांवर होते. यंदा ४९०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पावसामुळे यंदा सोयाबीनची काढणी खोळंबली होती. मात्र पाणी कमी झाल्यानंतर दिवाळीनंतर आवक वाढले.  - ओमप्रकाश गोयंका, अध्यक्ष, ग्रेन्स असोसिएशन अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT