नगर : खरेदी केंद्रांवर विकता येणार एकरी ३० किलो मूग 
नगर : खरेदी केंद्रांवर विकता येणार एकरी ३० किलो मूग  
मुख्य बातम्या

नगर : खरेदी केंद्रांवर विकता येणार एकरी ३० किलो मूग 

टीम अॅग्रोवन

नगर  ः मुगाची हमीभावाने खरेदी करता यावी, यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू केली खरी, मात्र शासनाने कळवलेल्या उत्पादकतेनुसार जिल्ह्यामध्ये हेक्टरी ७५ किलो म्हणजे एकरी अवघा तीस किलो मूग प्रत्येक शेतकऱ्याला या खरेदी केंद्रांवर विकता येणार आहे. शासनाने सांगितल्यानुसार राज्यात सर्वांत कमी मुगाची उत्पादकता नगर जिल्ह्यात आहे; तर सर्वाधिक वाशीममध्ये हेक्टरी ६२५ किलो आहे. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या खरेदी केंद्रांकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.  

मूग, उडीद, सोयाबीनची बाजारात आवक सुरू झाली की त्या मालाला दर्जा नसल्याचे कारण सांगून दर पाडले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची किमान हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्यात पावणेतीनशे खरेदी केंद्रे यंदा सुरू केली जात आहेत. त्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे दिली आहे. फेडरेशनने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी बाजार समित्या, संस्थांकडून प्रस्ताव मागितले. आलेल्या प्रस्तावांना वरिष्ठ पातळीवरून मान्यताही दिली.

हमीभावाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडीद, मुगाची विक्री करण्यासाठी अगोदर ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पहिल्या वर्षी नोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र, गेल्या वर्षी नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्यांनी नोंदणी केली त्यांनीही केंद्राकडे पाठच फिरवली. 

या खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी अगोदर शेतकऱ्यांकडून आॅनलाइन नोंदणी केली जात आहे. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडून किती माल खरेदी करायचा, हे ठरवण्यासाठी संबंधित धान्याची उत्पादकता कृषी विभागाच्या माहितीनुसार निश्चित केली जाते. त्यानुसार यंदाची मुगाची उत्पादकता निश्चित केलेली आहे. त्यात सर्वांत कमी नगर जिल्ह्यामध्ये हेक्टरसाठी (अडीच एकर) ७५ किलो निश्चित केली आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला एकरी अवघा तीस किलो मूग खरेदी केंद्रांवर विकता येणार आहे.

यंदा पुरेसा पाऊस नसल्याने पाणीसाठवण झालेले नसले तरी अल्प पावसावरच मुगाचे चांगले पीक आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकरी किमान तीन ते चार क्विंटल उत्पादन निघालेले असताना राहिलेला मूग विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरेदी केंद्रे सुरू करणाऱ्यांचीही यामुळे अडचण झाली आहे. 

अवघ्या पाच शेतकऱ्यांची नोंदणी  जिल्ह्याचा विचार करता आॅनलाईन नोंदणीसाठी एक महिन्याचा कालावधी उलटला तरी आतापर्यंत मूग व सोयाबीनची अवघ्या पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ केलेली असून आता सोयाबीनची आॅक्टोबर महिनाअखेर; तर १५ आॅक्टोबरपर्यंत मूग, उडदाची नोंदणी करता येणार आहे. सध्या चार ठिकाणी केंद्रे सुरू असून पाचव्या केंद्रालाही मान्यता आल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT