'Hey mom, let's get plenty of money, grain'
'Hey mom, let's get plenty of money, grain' 
मुख्य बातम्या

‘हे आई, भरपूर धन-धान्य पिकू दे’ : वेळा अमावस्यानिमित्त भूमातेचे पूजन

टीम अॅग्रोवन

लातूर, उस्मानाबाद : कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीचा सामना करीत शेतकरी अडचणीत येत आहे. अशात या वर्षी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याला परतीच्या पावसाने थोडासा दिलासा दिला. त्यामुळे रब्बी हंगामात शेते हिरवीगार झाली आहेत. त्यातच बुधवारी (ता.२५) वेळ अमावास्या आली. जिल्ह्यात व परिसरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने बळिराजाने ऋण फेडण्यासाठी भूमातेची मनोभावे पूजा केली. ‘हे आई भरपूर धन-धान्य पिकू दे’, अशी प्रार्थनाही शेतकऱ्यांनी यावेळी केली. 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा सण आहे. सकाळपासूनच शेतकरी शेताकडे निघाल्याने गावागावाच्या शिवारातील रस्ते फुलल्याचे चित्र राहिले. यावर्षी परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले; पण जलसाठे पाण्याने भरली गेली. त्यामुळे रब्बी समाधानकारक येईल,  अशी आशा शेतकऱ्यांना आहे. 

गेल्या दोन तीन दिवसांपासून घरोघरी वेळ अमावास्येची जोरदार तयारी सुरू होती. सकाळी ११.१७ वाजता वेळ अमावास्येला सुरुवात झाली. प्रत्येक शेतात कडब्याची कोप तयार करुन त्यात लक्ष्मीची, पांडवांची पूजा करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने वनभोजनाचा आनंद घेतला जातो. 

आंबिल, भज्जी, खिरीचे वनभोजन

वेळ अमावस्येचे वैशिष्ट्य म्हणजे तुरीच्या शेंगापासून तयार केलेली भज्जी (भाजी) व ताकापासून तयार केलेली आंबिल, भाकरी, खीर, गुळाची पोळी, तिळाची पोळी, उंडे, धपाटे असे भोजनाचा मेनू असतो. या निमित्ताने शेतकऱ्यांनी आप्तेष्टांना बोलवत वनभोजनाचा आनंद घेतला. हिरवीगार रान बहरली होती, तर शहरात मात्र शुकशुकाट राहिला.

उस्मानाबादमध्ये शेते बहरली; गावांत शुकशुकाट

शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २५ ) काळ्या आईची मनोभावे पुजा करून वेळ अमावशा सण साजरा केला. दुपारी एकनंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला. त्यामुळे शहरी भागात अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र होते.

यंदा ख्रिसमसच्या दिवशी वेळ अमावशा असल्याने शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोठी पर्वनी मिळाली. डोक्यावर घोंगडे पांघरून, अंबिलाच्या मडक्याला कारभारणीचं मंगळसूत्र घालुन पायी चालत शेतकरी पांडव पुजेच्या कोपीत मडक ठेवतो.  बैलांना सजवून बैलगाडीतून सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा घेण्यात आली. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधूनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले.

दुपारी बारानंतर शेतकऱ्यांनी कुटुंब पाच पांडवाची विधीवत पुजा केली. शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आली. ज्वारी, हरभरा, गहू , करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनींनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमूूकल्यांना मिळाला.

बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन या पासून बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) या विविध ताकदवर्धक पदार्थासह अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला. उत्तरपूजेनंतर गवताच्या पेंड्या पेटवून शेत शिवारात फिरवण्यात आल्या. सांयकाळी शिवारातील लोंढा गावाकडे परतत असल्याचे चित्र दिसून आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT