काढणी झालेले सोयाबीन शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे भिजले.
काढणी झालेले सोयाबीन शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे भिजले.  
मुख्य बातम्या

राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळ

टीम अॅग्रोवन

पुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी; विदर्भातील अकोला, नागपूर जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सावंतवाडीत सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काढणी केलेल्या सोयाबीन, कापूस, भात आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

परतीचा पाऊस मार्गी लागल्यानंतर उन्हाचा पारा वाढला होता. शुक्रवारी (ता. १८) सायंकाळनंतर आणि शनिवारी (ता. १९) सकाळपासून पावसाने सुरवात केली. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागांत दिवसभर संततधार सुरू होती, त्यामुळे कमाल तापमानात घट झाली असून, रात्री हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता.

दोन दिवसांपासून कोकणातील अनेक भागांत शुक्रवारपासून पावसाचे वातावरण तयार झाले. सिंधुदुर्गमधील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांतही मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या. सावंतवाडीनंतर देवगड येथे ९५, वैभववाडी ६०, लांजा ६०, दोडामार्ग ४५, कणकवली ४४, राजापूर ५२ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. शनिवारीही (ता. १९) दिवसभर अनेक भागांत हवामान ढगाळ असून पावसाच्या काही ठिकाणी तुरळक सरी बरसत होत्या.

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बेल्हे येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. नगर, नाशिक, सोलापूरमध्ये पावसाने तुरळक ठिकाणी चांगली हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागांत पाऊस पडला. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या परिसरातही हवामान काही प्रमाणात ढगाळ होते.

मराठवाड्यातही बहुतांशी भागांत ढगाळ हवामानामुळे मुसळधार पाऊस पडला. नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील जवळपास वीसहून अधिक मंडळांत मुसळधार पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ९६, खानापूर ८१, शहापूर ७२, मरखेल ८९ मिलिमीटर पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर परिसरातील अनेक भागांत शेतातील काढणीस आलेल्या कापसाचे नुकसान झाले. नांदेडमधील देगलूर परिसर आणि उस्मानाबादमधील वाशी परिसरात झालेल्या अतिपावसामुळे काढणी केलेल्या सोयाबीन पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस स्वरूपाचा पाऊस पडला. इतर भागातही पावसाच्या सरी बरसत होत्या. नागपूरमध्येही पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. तर अमरावती, वाशीम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांच्या परिसरात हवामान अंशतः ढगाळ असून अधूनमधून ऊन पडत होते.     पाऊस दृष्टिक्षेपात

  • सावंतवाडी येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद
  • डोकेवाडी (ता. भूम) येथील आंबेमोहोळ नदी दुथडी भरून वाहिल्याने लेंढी नदीला पूर
  • देगलूर, वाशी परिसरात अतिपावसामुळे सोयाबीन पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान  
  • खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथील तुकाराम चौगुले, सोमा चौगुले यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू  
  • आज, उद्या पावसाचा अंदाज कायम अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तसेच, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे, त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून आज आणि उद्या राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

    Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

    Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

    Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    SCROLL FOR NEXT