माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन 
मुख्य बातम्या

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. नुकतीच त्यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र आज (बुधवारी) पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले.  त्यांच्यावर आज निलंग्यात अंत्यसंस्कार होणार आहे.  निलंगेकर हे 1985 ते 86 या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत. शिवाजीराव निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी यावर यशस्वीपणे मातही केली. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला असला तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही. एक संघर्षशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने कोरोना विरूद्धची लढाई ते नक्कीच जिंकतील असा विश्वास निलंगेकर कुटूंबियांनी व्यक्त केला होता.  त्यांचे वय ९१ वर्षे असल्याने व पूर्वीचे आजार लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. रूग्णालयात उपचार सुरू असतांना डाॅ. निलंगेकर वृृत्तपत्रे, पुस्तके नियमित वाचत होते. 

मधुमेह, रक्तदाब, किडनीचा त्रास असतानाच कोरोनाची लागण झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते. वैद्यकीय नियम व निकषानुसार इतरांना त्यांच्या संपर्कात येऊ दिले जात नव्हते. दरम्यान, उपचाराच्या वेळी निलंगेकर कुटूंबिय व त्यांचे निकटवर्ती माधवराव माळी वेळोवेळी डाॅक्टारांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत होते. लातूरहून पुण्याला हलवल्यानंतर ते कोरोना विरुध्दची लढाई निश्चितच जिंकतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना होता.  मानसिकदृृष्ट्या ते खंबीर असल्याने कुटुंबियाचा हा विश्वास काही काळ खराही ठरला. त्यांचा १६ जुलै रोजी लातूर येथील खाजगी रुग्णालयात कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. त्यानंतर  कुटूंबियानी पुढील उपचारासाठी निलंगेकर यांना पुण्याला हलवले होते. त्यांचे चिरंजिव प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, डाॅ. शरद पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर हे देखील दरम्यानच्या काळात क्वारंटाईन होते. उपचार सुरू असतांनाही ते निलंग्यातील कोरोना विषयी परिस्थितीची विचारपूस सातत्याने करायचे. अगदी लातूरहुन निघण्यापूर्वीसुध्दा ते मोबाईलवरून अधिकार्‍यांशी बोलले होते. मात्र, किडनीच्या विकाराने बुधवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT