soybean cake
soybean cake  
मुख्य बातम्या

पशुखाद्य दरात वाढ

Abhijeet Dake

सांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या सोयाबीन, मका, भुईमुगाचे नुकसान झाल्याने कच्च्या मालाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी पशुखाद्याचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा फटका पशुपालकांना बसत आहे. सध्या पशुखाद्याच्या दरात प्रति किलो दोन ते सहा रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला पशुपालनाची जोड देत अतिरिक्त उत्पन्नाचे साधन केले. तर बहुतांश शेतकऱ्यांचा हाच मुख्य व्यवसाय बनला. जातिवंत दुधाळ जनावरे खरेदी करून या व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला प्रपंच चालवत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून पशुपालन व्यवसाय विविध संकटाच्या फेऱ्यात सापडला आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुधन सांभाळणे मुश्कील बनले आहे. त्यात आता पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालक हवालदिल झाला आहे.

पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरीप हंगामातील पिकाच्या माध्यमातून मिळतो. पीक चांगले असल्याने दर्जेदार पशुखाद्य तयार करता येते. या दरम्यान पशुखाद्याचे दर कमी होतात. खाद्याच्या मागणीतही वाढ होते. असा दावा पशुखाद्य तयार करणाऱ्या कारखानदारांनी केला. गतवर्षी आलेल्या महापूराचा फटका पशुखाद्य उद्योगाला बसला होता. डिसेंबर २०१९ मध्ये पशुखाद्याच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर खाद्य तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती उतरल्याने पशुखाद्याचे दर कमी झाले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु पशुखाद्याचे दर काही काळ स्थिर राहिल्यानंतर  दरात वाढ झाली. त्यामुळे दूध उत्पादकांना खाद्य दरात वाढ होत असल्याने मोठा फटका बसत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी उत्पादनात घट झाली. त्यामुळे खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कमी पडू लागला आहे. पावसाने सोयाबीन, भुईमूग, मका, ज्वारी पिकांचा दर्जा घसरला. त्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले. गतवर्षीच्या महापुराने दूध उत्पादक शेतकरी संकटात आहेत. त्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने प्रारंभी दुधाच्या मागणीत मोठी घट झाली. त्यातच दूध दर देखील खालावले. या साऱ्या संकटांमुळे दूध उत्पादकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालकांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपायला तयार नसल्याचे चित्र आहे. खाद्य निर्मितीत ३० टक्क्यांनी घट जानेवारी २०२० पासून खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुस्थितीत सुरु झाला होता. त्यामुळे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरु झाले होते. परंतु यंदा गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाले. पिके पाण्याने कुजून गेली. त्यातही पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारी पिकेही वाया गेल्याने उत्पादनातही घट झाली. परिणामी कच्चा माल कमी पडू लागल्याने   खाद्य निर्मितीत ३० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज व्यापारी आणि पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या कारखानदारांनी व्यक्त केला आहे.

ताळमेळ कसा घालायचा? एका जनावराला एकावेळी अंदाजे तीन ते साडेतीन किलो म्हणजेच दोन वेळेचे सहा ते सात किलो खाद्य दिले जाते. दोन महिन्यांपूर्वी खाद्यासाठी १२० ते १३० रुपये खर्च यायचा. आता हाच खर्च २०० ते २१० रुपये झाला. सरासरी एक दुभत्या जनावरापासून दोन्ही वेळचे दूध २० लिटर धरले तर दहा दिवसांचे बिल ४५०० ते ४८०० रुपये होते. यातून सर्व खर्च वजा केला तर हाती ७०० ते ७५० रुपये राहतात. यामुळे उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा?

पशुखाद्याचे दर (रुपये/किलो)

पशुखाद्य सप्टेंबर  नोव्हेंबर
सरकी पेंड २०.५०     २४
सोयाबीन पेंड   २८ ३६
सरकी डिओसी पेंड   २३   २५
शेंग डिओसी पेंड २८  ३०
गोळी पेंड   २० २२
गहू भुसा १५     १८
भात कोंडा    ६.५०   ८.२५

प्रतिक्रिया  लॉकडाऊन झाल्यापासून दुधाच्या दरात सुमारे प्रतिलिटरला सहा रुपयांनी कमी आहेत. सातत्याने खाद्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसत नाही. दुधाच्या दरात वाढ झाल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत. - प्रितम पाटील, दूधगाव, ता. मिरज. पशुखाद्य महागले आहे. दूध उत्पादन वाढीसाठी खाद्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खाद्य महाग झाले असले तरी सध्या दर्जेदार खाद्य मिळत नाही. दहा दिवसांचा दुधाच्या बिलाचा हिशोब केला असता यामध्ये खाद्यासाठी दोन हजार, चारा, आरोग्याचा खर्च २००० रुपये, निव्वळ नफा ७५० रुपये मिळाला. या पैशातून ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न आहे. - बापू खरगे, विठलापूर, ता. आटपाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT