वरखेडे-लोंढे बॅरेजला `नाबार्ड`चा अर्थपुरवठा
चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव व भडगाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बॅंकेकडून (नाबार्ड) अर्थपुरवठा होणार आहे. या संदर्भात नुकतीच ‘नाबार्ड''चे महाव्यवस्थापक टी. लक्ष्मीनारायण यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
वरखेडे- लोंढे प्रकल्पाच्या कामाला २०१३ पासून सुरवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील बळिराजा संजीवनी योजनेतील १०८ आणि प्रधानमंत्री सिंचन प्रकल्प योजनेतील २६ प्रकल्प मे २०१९ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली होती. त्यात वरखेडे- लोंढे बॅरेजचाही समावेश आहे. या कामासाठी वित्त विभागाची परवानगी यापूर्वीच मिळाली होती. त्यामध्ये ५२६.६४ कोटीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा समावेश आहे.
वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प पाहणीवेळी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व ‘नाबार्ड''चे तांत्रिक सल्लागार आर. एस. चौधरी, अधीक्षक अभियंता अनंत मोरे, कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे, प्रकल्पाचे कंत्राटदार प्रकाश पाटील, सहायक कार्यकारी अभियंता सचिन पाटील आदी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी आतापर्यंत १०८ कोटीचा निधी खर्च झाला आहे. राहिलेल्या ४१८.२६ कोटीसाठी काही रक्कम ‘नाबार्ड'' देणार आहे.
या पाहणीदरम्यान ‘नाबार्ड''च्या अधिकाऱ्यांनी वरखेडे बॅरेज प्रकल्पाचा कालवा भोरस गावाकडून जाणार असल्याने भोरसला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाला १३ वक्राकार दरवाजे येणार आहेत. सध्या हे दरवाजे तयार करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. एका वक्राकार दरवाजाची लांबी १२ मीटर तर, उंची १५ मीटर आहे. पावसाळा संपताच नदीपात्रातील कामे देखील अशाच पद्धतीने युद्धपातळीवर केली जाणार आहेत.