मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला अाहे. या भुकंपामुळे सुमारे २२६ हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी (ता.२०) झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलनुसार ७.१ एवढी होती.
१९८५ मध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये तब्बल १० हजार लोकांचा बळी गेला होता. त्या भूकंपाच्या स्मृती या भूकंपामुळे पुन्हा ताज्या झाल्या असून, मेक्सिकन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भूकंपाच्या जबरदस्त हादऱ्याने मध्यवर्ती भागातील किमान शेकडो इमारती कोलमडून पडल्या आहेत. या भूकंपाचा धक्का सुमारे २ कोटी लोकांना बसला आहे. भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम सुरू आहे.
या भूकंपामुळे एकट्या मेक्सिको सिटीमधील ११७ लोकांचा मृत्यू झाला अाहे, अशी माहिती नागरी सुरक्षा एजन्सीचे प्रमुख लुईस फिलीप प्युंटे यांनी ट्विटरद्वारे दिली अाहे.तसेच मेक्सिकोच्या दक्षिण भागात ५५ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त अाहे.