ऊस तोडणी
ऊस तोडणी 
मुख्य बातम्या

दुष्काळग्रस्तांना ‘कोयत्या’चा आधार

Suryakant Netke

नगर ः यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. खरीप पिके वाया गेली, रब्बीची आशाही संपली. चारा-पाण्याचा प्रश्‍न आताच गंभीर होत असल्याने जनावरे जगवायची चिंता असलेल्या दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्यभरात ऊसतोडणी मजुरांच्या संख्यते सुमारे तीस ते चाळीस टक्के म्हणजेच तीन लाखांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे दीड लाखावर उसलेली उचल यंदा पन्नास हजारावर आली आहे. काही मजुरांनी तर त्याहीपेक्षा कमी पैशांत ऊसतोडणी करण्याची तयारी दर्शवली आहे. आताचा गावात पाणी प्यायला नसल्याने मजुरांचे वेगाने साखर करखान्याकडे स्थलांतर होत असल्याने दिवाळीच्या तोंडावर गावेही ओस पडू लागली आहे. राज्यात आणि राज्याबाहेर जाणारे साधारणतः पंधरा लाख मजूर असतात. त्यातील दहा लाख मजूर राज्यातील दोनशे साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी करतात. सर्वाधिक पाच ते सहा लाख मजूर बीड जिल्ह्यातील आहेत, तर त्याला जोडूनच असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नेवासा. कर्जत तालुक्‍यांतील काही भागांतील मजूर ऊसतोडणी करतात. याशिवाय जळगाव, चाळीसगाव, जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी भागातील मजूरही ऊसतोडणी करू लागले आहेत. मागील दोन वर्षांच्या काळात नगरसह राज्यातील पावसाची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे मजुरांच्या संख्येत पंधरा ते वीस टक्के घट झाली होती. यंदा मात्र परिस्थिती पुन्हा पालटली आहे. राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. पाऊस नसल्याने खरिपाची पिके वाया गेली; रब्बीतही परतीचा पाऊस नसल्याने पिके येतील याची शक्‍यता मावळली आहे. बाजरी नाही, ज्वारी जागेवरच करपत असल्याने चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. भरवशाच्या विहिरींनी सप्टेबर-आक्‍टोबरमध्येच तळ गाठल्याने पिण्याचे पाणी नाही, रोजगाराचे साधन नाही, अशा स्थितीत गावात राहायचे कसे, याची चिंता लागलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणीचा मार्ग पत्कारला आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगितले जात असले, तरी हुमणीची बाधा, पाणी नसल्याने उत्पादनात घट या कारणाने सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील काही कारखाने साधारण पाच महिने तर नगर, मराठवाडा व अन्य भागातील कारखाने चार महिन्यांंपेक्षा जास्त काळ चालण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे मार्चनंतर गावी आलेल्या मजुरांच्या रोजगार, पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर होणार आहे. उचलीत मोठी घट मजुरांना दरवर्षी मुकादमामार्फत साखर कारखान्यांकडून आगाऊ रक्कम (उचल) दिली जाते. तरुण पिढी ऊसतोडणी करायला तयार नसल्याचे कारण पुढे येत असल्याने आपसूकच उचलीचे दर वाढून दीड लाखावर गेले. यंदा मात्र मजुरांची संख्या तीस ते पस्तीस टक्‍क्‍यांनी वाढली असल्याने मुकादम उचल द्यायला तयार नाहीत. गावांत राहून करायचे तरी काय असा, प्रश्‍न असलेल्या शेतकऱ्यांनी ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला असून, उचलीचे दर दीड लाखावरून पन्नास हजारावर आले आहेत. काही तरुणांनी तर त्याहीपेक्षा कमी रकमेवर ऊसतोडणी करण्याची तयारी दाखवत कारखाने गाठायला सुरवात केली आहे.  बैलाचे दर वाढले ऊसतोडणी कामगार ऊसवाहतुकीसाठी किमती बैलाची खरेदी करतात. बहुतांश जोड्या लाखाच्या घरात आहेत. यंदा तोडणी मजुरांची संख्या वाढल्याने बैलजोड्यांचे दर वीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. किमती बैलांसोबत इतर जनावरे जगवण्यासाठीच तोडणीला जाण्याचा अनेक सुशिक्षित तरुणांनी निर्णय घेतला आहे. शिवाय टायर  वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचाही वापर वाढू लागला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT