Discussions on food inflation are baseless
Discussions on food inflation are baseless 
मुख्य बातम्या

अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधार

टीम अॅग्रोवन

पुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला असून, कांदा आणि टोमॅटोने या चर्चांना फोडणी दिली, असे म्हणावे लागेल. मात्र या चर्चांमध्ये सरकारच्याच आकड्यांकडे सोईस्कर डोळेझाक केली गेली. सध्याची भाववाढ रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेसाठी आदर्श मानलेल्या वाढीच्या तुलनेत कमी असतानाही अर्धवट माहितीचा आधार घेऊन चुकीचे चित्र निर्माण केले गेले. अन्नधान्य, कांदा आणि टोमॅटोमधील भाववाढ फारच कमी किंवा उणे असल्याचे, सरकारच्या आकड्यांवरून स्पष्ट झाले.   

केंद्र सरकार दर महिन्याला अन्नधान्य किरकोळ महागाई निर्देशांक म्हणजेच कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्स जाहीर करत असते. सप्टेंबर २०२० मध्ये हा निर्देशांक १६१.६ होता, तर सप्टेंबर २०२१ मध्ये म्हणजेच मागील महिन्यात १६२.७ होता. याचाच अर्थ असा की महागाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ०.६८ टक्के, म्हणजेच एका टक्क्यापेक्षाही कमी वाढ झाली. हा निर्देशांक ऑगस्ट २०२० मध्ये १५७.८ वरून ऑगस्ट २०२१ मध्ये १६२.७ वर आला. याचाच अर्थ ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी महागाई वाढली. तर जुलै २०२० मध्ये निर्देशांक १५६.७ वरून २०२१ मध्ये १६२.९ वर पोहोचला. ऑगस्टमध्ये महागाईत ३.९६ टक्के वाढ झाली. म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ४ टक्क्यांपेक्षा महागाई जास्त नव्हती. त्यामुळे अन्नधान्याच्या महागाईत मोठी वाढ झाली आणि त्यावरून पेटवलेले रान हे वस्तुस्थितीला धरून नाही, हे सरकारच्या आकड्यांवरून स्पष्ट होते. 

मागील चार महिन्यांतील महागाई निर्देशांकाचा विचार केल्यास सप्टेंबरमध्ये १६१.६, ऑगस्टमध्ये १६२.७, जुलैमध्ये १६२.९, जूनमध्ये १६१.३ आणि मे महिन्यात १६९.४ निर्देशांक होता. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत महागाई कमी होती. त्यामुळे महागाई वाढली नसल्याचे स्पष्ट होते. 

अन्नधान्याच्या घाऊक महागाई निर्देशांबद्दल पाहू, सप्टेंबर २०२० मध्ये अन्नधान्याचा घाऊक महागाईतील वाढ ८.३७ टक्के होती. ती सप्टेंबर २०२१ मध्ये उणे ४.६९ टक्क्यांवर खाली आली. म्हणजेच अन्नधान्यातील घाऊक महागाई ही उणे आहे. 

सरकारी आकडे हे अन्नधान्य, कांदा आणि टोमॅटोत भाववाढ झाली नाही हे सांगतात. मात्र कुठल्यातरी अतार्किक गोष्टींचा आधार घेऊन अन्नधान्य, कांदा आणि टोमॅटोत मोठी भाववाढ झाली, ग्राहकांचे अर्थकारण बिघडले, एक किलो कांदा खरेदी केला तर आयकर विभागाच्या धाडी पडतील, सणांमध्ये उपाशी राहावे लागले, या केवळ अवास्तव चर्चा आहेत, हे स्पष्ट झाले. सध्याची अन्नधान्य, कांदा आणि टोमॅटोतील भाववाढ ही रिझर्व्ह बॅंकेने ठरविलेल्या स्वीकारहार्य भाववाढीच्या दरापेक्षा खूपच कमी असून, उणे महागाई म्हणजेच निगेटिव्ह इन्फ्लेशन आहे.

कांद्यात उणे भाववाढ आता महागाईच्या चर्चेत सर्वाधिक भाव खाणाऱ्या कांद्याबद्दल पाहू. सप्टेंबर २०२० मध्ये कांद्याचा घाऊक महागाईतील वाढ उणे ३१.६४ होतो, तो सप्टेंबर २०२१ मध्ये उणे १.९१ टक्क्यावर आल्याचे केंद्रानेच स्पष्ट केले. म्हणजेच कांद्याची घाऊक भाववाढ ही उणे मध्येच आहे. तर कांद्याचा किरकोळ महागाई निर्देशांक म्हणजेच कंबाइंड इंडेक्स सप्टेंबर २०१४ मध्ये २००.९ होता. तो सप्टेंबर २०२१ मध्ये २१२.९ वर पोहोचला. म्हणजेच मागील सात वर्षांतील कांदा भाववाढीचा चक्रवाढ दर (सीएजीआर) हा ०.८३ टक्का आहे. म्हणजेच कांदा दरात एक टक्क्यानेही वाढ झाली नाही. गेल्या वर्षातील महागाई दराशी तुलना पाहू, ज्यानुसार सरकार महागाईवर भाष्य करते. सप्टेंबर २०२० मध्ये कांद्याचा महागाई निर्देशांक २३५.५ होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा महागाईचा दर हा उणे ९.६ टक्के आहे, हे सरकारच्याच आकड्यांवरून स्पष्ट होते. तर ऑगस्ट महिन्यात कांदा महागाई निर्देशांक २२०.८ होता. म्हणजेच कांद्याची महागाई ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात उणे ३.५८ टक्क्यांनी कमी झाली. म्हणजेच कांद्याची महागाई ही गेल्या वर्षातील दराशी तुलना केली किंवा २०१४ मधील दराशी तुलना केली तरी उणे मध्येच आहे. याचाच अर्थ असा होतो की कांदा महागाईच्या बातम्या किंवा चर्चा या निराधार आहेत, हे सरकारच्या माहितीतून स्पष्ट होते.

टोमॅटोतील भाववाढीची सत्यता आता टोमॅटोतील भाववाढीची सत्यता पाहू, सप्टेंबर २०१४ मध्ये टोमॅटो भाववाढीचा निर्देशांक १८९.९ होता. तो सप्टेंबर २०२१ मध्ये १३७.३ वर आला. म्हणजेच भाववाढीचा दर (सीएजीआर) हा उणे ४.५३ टक्के आहे. सरकारच्या सूत्रानुसार मागील वर्षाच्या तुलनेतील वाढ पाहू. सप्टेंबर २०२० मध्ये महागाईचा निर्देशांक २५३ होता. याचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उणे ४५.७३ टक्के भाववाढ होती. म्हणजेच यंदा भाववाढ निम्म्याने कमी झाली. तर ऑगस्ट महिन्यात टोमॅटो भाववाढ निर्देशांक १४५.४ होता. याचे गणित पाहिल्यास ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील कांद्याची भाववाढ ही उणे ५.५७ टक्के होती. म्हणजेच २०१४ मधील दराशी तुलना केली, गेल्या वर्षीच्या केली किंवा ऑगस्ट महिन्यातील दराशी तुला केली तरी टोमॅटोची भाववाढ ही उणे मध्ये आहे, हे सरकारच्या आकड्यांवरून स्पष्ट होते. मात्र नैसर्गिक आपत्तींमुळे अगदी काही दिवसांसाठी टोमॅटोतील उच्चांकी दरवाढ पुरवठा सुरू होताच खाली आली आहे. मात्र चर्चा याच दरांवर होते. 

महागाईबद्दल रिझर्व्ह बॅंकेचे मत प्रत्येक वेळी महागाई अर्थव्यवस्थेला मारक ठरतेच असे नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या मते २ ते ६ टक्के हा महागाईचा दर विकासासाठी स्वीकारहार्य आहे. २ टक्क्यांपेक्षा कमी महागाई म्हणजेच वस्तूंना पुरवठ्यापेक्षा कमी मागणी आणि ६ टक्क्यांपेक्षा जास्त महागाई म्हणजेच वस्तूंना पुरवठ्यापेक्षा अधिक मागणी स्थिती असते. त्यामुळे सरासरी ४ टक्के महागाई दर हा आदर्श मानला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT