पिक कापणी प्रयोग
पिक कापणी प्रयोग 
मुख्य बातम्या

विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडूनच पीककापणी प्रयोगाचा प्रयत्न

टीम अॅग्रोवन

परभणी ः वैतागवाडी (ता. सोनपेठ) शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गुरुवारी दुपारी कापूस पीककापणी प्रयोगाच्यावेळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तसेच कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांच्या अनुपस्थितीत केवळ विमा कंपनीचे प्रतिनिधी पीककापणी प्रयोगाची प्रक्रिया करत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी हा प्रयोग बंद पाडला. पीककापणी प्रयोगाअंती येणाऱ्या उत्पादनाच्या नोंदी व्यवस्थित न घेतल्यामुळे गेल्या वर्षीच्या खरीप पीकविमा परताव्यापासून जिल्ह्यातील अनेक मंडळांतील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले असतानाच यंदाही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.   पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षांच्या नोंदी घेताना संबंधित कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविल्यामुळे गतवर्षीच्या खरिपात पिकांचे नुकसान होऊनही जिल्ह्यातील अनेक मंडळांतील शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित राहिले. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पीकविमा नुकसान भरपाईसाठी पीककापणी प्रयोगाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षाच्या नोंदी घेणे आवश्यक आहे. परंतु विविध विभागांचे कर्मचारी पीककापणी प्रयोगाच्या बाबतीत अनास्था दाखवत असल्याचे गुरुवारी (ता. १) उघडकीस आले. गुरुवारी सायंकाळी या घटनेच पंचनामा करण्यात आला असून, शनिवारी (ता. ३) या शेतामध्ये ग्रामस्तरीय पीककापणी समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पीककापणी प्रयोग घेण्यात येणार आहे, असे तहसीलदार जीवराज डापकर यांनी सांगितले.

पीकविमा परताव्यातील गैरप्रकाराची चौकशी करून शेतकऱ्यांना पीक परतावा देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवार (ता. २९) पासून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली कदम यांच्यासह शेतकरी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयापुढे उपोषणास बसले आहेत. 

तर दुसरीकडे गुरुवारी (ता. १) वैतागवाडी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात महसूल विभागातर्फे आयोजित कापूस पीककापणी प्रयोगास ग्रामस्तरीय पीककापणी समितीतील सरपंच, पोलिस पाटील यांच्यासह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक होती. परंतु केवळ विमा कंपनीचे दोन प्रतिनिधी, तसेच सरपंचांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पीककापणी प्रयोगाचे सोपस्कार करत असल्याचा प्रकार मरगळवाडी (ता. सोनपेठ) येथील शेतकरी राम मरगळ यांच्या निर्दशनास आला. ही बाब गंभीर असल्यामुळे तत्काळ तालुका प्रशासनाला माहिती देण्यात आली. परंतु संबंधित मंडळ अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वासमक्ष पीक कापणी प्रयोग घेण्यात यावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पीककापणी प्रक्रिया थांबविण्यास भाग पाडले. यानंतर गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या वेळी राम मरगळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांची अनुपस्थिती पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्यासाठी पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षाच्या वस्तुनिष्ठ नोंदी घेऊन तक्त्यामध्ये माहिती भरणे आवश्यक असते. परंतु कृषी, महसूल, ग्रामविकास विभागांचे कर्मचारी तसेच ग्रामस्तरीय पीककापणी प्रयोग समितीतील सरपंच, पोलिस पाटील, प्रगतिशील शेतकरी हे पीक कापणी प्रयोगाच्या वेळी उपस्थित राहत नसल्याचे याआधी तसेच यंदाही आढळून आले आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत विमा कंपनीचे प्रतिनिधी परस्पर पीककापणी प्रयोग घेत असल्याचे उघडीस आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्तरीय समितीतील सदस्यांनादेखील या बाबतीत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

कंपन्यांनी काढलेले निष्कर्ष ठरतात अंतिम गेल्या दोन वर्षांपासून खासगी विमा कंपन्यांमार्फत पीकविमा योजना राबविली जात आहे. त्यामुळे या कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील पीककापणी प्रयोगास उपस्थित राहत आहेत. विमा कंपन्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी पीककापणी प्रयोगाच्या बाबतीत कितपत कुशल आहेत याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी काढलेले उत्पादनाचे निष्कर्षच अंतिम ठरविण्यात आल्यामुळे गतवर्षीच्या हंगामात अनेक मंडळांतील शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही. 

प्रतिक्रिया पीकविमा कंपनी प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत पीककापणी प्रयोग घेणे, तसेच कर्माचाऱ्यांसह ग्रामस्तरीय पीककापणी समितीतील सदस्यांनी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. घटनास्थळाचा पंचानामा करण्यात आला. सर्वांसमक्ष आज पीककापणी प्रयोग घेतला जाणार आहे. - जीवराज डापकर, तहसीलदार, सोनपेठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT