नंदुरबारमध्ये जाळपोळ, तणाव
नंदुरबार : मराठा आरक्षण मागणीसाठी सोमवारी (ता.३०) आयोजित नंदुरबार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी बंदचे आवाहन करणाऱ्यांनी काही ठिकाणी टायर जाळले. काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली, परंतु पोलिस प्रशासन आणि आंदोलक नेत्यांनी संयमाची भूमिका घेतल्याने आंदोलन चिघळले नाही. दरम्यान, रास्ता रोको व ठिय्या आंदोलन ऐनवेळी रद्द करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्यातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंदचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला होता. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबार आगारातील सर्व बसफेऱ्यादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा सुरू असल्या, तरी केवळ शिक्षक उपस्थित होते. दवाखाने व औषध दुकाने सुरू होती.
सकाळी बंदचे आवाहन करणाऱ्या जमावाने बसस्थानक परिसर, नाट्यगृह, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली यासह ठिकठिकाणी टायर जाळले. यामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जमावातील काहींनी रस्त्यावरील उभ्या वाहनांना लक्ष्य करून वाहनांची तोडफोडदेखील केली. पोलिसांनी आणि आयोजक नेतृत्वाने संयमाची भूमिका घेतली.