Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Onion Market : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली. पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाहीत, याचीही काळजी घेतली.
Onion
Onion Agrowon

Nashik/Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली. पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाहीत, याचीही काळजी घेतली. सरकारने प्रतिटन ५५० डाॅलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्काची खुट्टी मारून ठेवली. त्यामुळे आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक देशांच्या तुलनेत महाग झाला. यामुळे कागदोपत्री निर्यात उठवली असली तरी प्रत्यक्षात निर्यातीला लगाम लावलेला आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने कांदाप्रश्नी घेतलेले विविध निर्णय आणि हस्तक्षेपामुळे शेतकरी, निर्यातदार व व्यापारी अडचणीत आहेत. त्यामुळे मते मिळविण्यासाठी केंद्राने ही डिप्लोमसी केली. मात्र एकीकडे हा निर्णय म्हणजे निर्यात मागे घेतल्याचा दिखावा तर दुसरीकडे आडकाठी असल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे तूर्त बाजारात ३०० ते ६५० रुपयांची दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Onion
Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ४० टक्के निर्यात शुल्क अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून लादण्याची इतिहासात पहिलीच वेळ होती. त्यानंतर पुन्हा शुल्क मागे घेत प्रतिटन ८५० डॉलर किमान निर्यातमूल्य लागू केले. त्यानंतर हा निर्णय मागे घेत लेट खरीप हंगामात कांद्याची आवक होत असताना निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली. पहिल्यांदाच दीर्घकाळ निर्यातबंदी राहिली.

कांदा उत्पादकांचा रोष शमविण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित या संस्थेला ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र अपेक्षित निर्यात झाली नाही, शेतकऱ्यांना लाभ नसल्याने त्याचा मतांवर परिणाम होण्याचा धोकासमोर होता. दरम्यान, गुजरातच्या २ हजार टन पांढऱ्या कांदा निर्यातीला परवानगी दिल्याने केंद्रावर टीकेची झोड उठली. आता निर्यात खुली झाली असली तरी कामकाजास वेग येणार नाही, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. हा निर्णय लोकसभेच्या तोंडावर मतांच्या फायद्यासाठी शेवटच्या तीन टप्प्यांतील १४ लोकसभा मतदार संघ समोर ठेवून घेतलेला आहे. मात्र निर्यात वाढणार नसल्याने दरवाढीची अपेक्षा धूसर आहे.

परवानगी नावाला, मात्र आडकाठी कायम

केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार प्रतिटन किमान निर्यातमूल्य ५५० डॉलर असणार आहे. त्यामुळे प्रतिकिलो किमान ४५ रुपयांप्रमाणे व्यवहार करणे बंधनकारक असेल. सोबत केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाने वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागास अतिरिक्त ४० टक्के शुल्क निर्यातदारांना द्यावे लागणार आहे.

एकंदरीत किमान निर्यातमूल्य आणि निर्यातशुल्क असे प्रतिकिलो ६३ ते ६४ रुपयांपर्यंत आयातदारांना बिले करून विक्री करावी लागणार आहे. केंद्राने निर्यातीस परवानगी दिली मात्र निर्यात मूल्य व निर्यात शुल्क लादून एक प्रकारे आडकाठी घातली आहे. त्यामुळे कुठल्याही अटी-शर्ती शिवाय निर्यातबंदी खुली व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Onion
Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?
सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली. मात्र त्यातही किमान निर्यातमूल्य लागू केले आहे. सरकारने कोणत्याही अटी-शर्ती शिवाय कांद्याची निर्यात खुली करावी. नुकसानभरपाई म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दरातील तफावत भरपाई द्यावी.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
कांदा उत्पादक पट्ट्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी स्पष्ट दिसत आहे. ती कमी करण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे. सरकारने पुन्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.
अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णयाचे स्वागत आहे. मात्र यावर जे निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये शिथिलता आणण्याची गरज आहे. त्याचा फायदा कांदा उत्पादक व निर्यातदारांना होणार आहे.
विकास सिंग, कांदा निर्यातदार, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com