पुणे : पुणे जिल्हा बँकेचा चालू वर्षाचा एकूण ५६ हजार १५४ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात करण्यात आला. यात कृषी कर्जासाठी ७३९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी २१ टक्के एवढे आहे. हा पतआराखडा जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अग्रणी बँकेसह सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्याच्या अहवालाचे प्रकाशन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके यांच्या हस्ते सोमवारी (ता.२) करण्यात आले. या वेळी बँक आॅफ महाराष्ट्र परिमंडल पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापक संजय मणियार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी रोशन महाजन, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक काशीनाथ डेकाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद बेडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपसरव्यवस्थापक श्री. इंगळे, सहायक सरव्यवस्थापक श्री. जाधव आदी उपस्थित होते.
या वेळी दिनेश डोके म्हणाले, की पतपुरवठा आराखडा ५६ हजार १५४ कोटी रुपयांचा असून, मागील वर्षापेक्षा तो पंधरा टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिक क्षेत्रासाठी ३१ हजार १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही एकूण पतपुरवठ्याच्या ६२ टक्के अधिक आहे.
कृषी कर्जासाठी ७३९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी २१ टक्के एवढे आहे. कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंिद्रय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह ४१ बँकेच्या एक हजार ६१५ शाखांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी ३१ जानेवारी २०१७ अखेर पीक कर्जासाठी २४४१ कोटी रुपयांचे वाटप करून ६५ टक्के उद्दीष्टपूर्ती केली आहे.
पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी १३ हजार १०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्या व्यवसायासाठी १४ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.