राज्यातील ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध
राज्यातील ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध 
मुख्य बातम्या

राज्यातील ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध

टीम अॅग्रोवन

पुणे: आदर्श गाव योजनेत सहभागी होण्यासाठी तीन जिल्ह्यांमधून आलेल्या नव्या प्रस्तावांना राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यभर आता ९३ गावांना आदर्श होण्याचे वेध लागले आहेत.  राऊतवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा), गोवले (माणगाव, रायगड) आणि केरा (दोडामार्ग, सिंधुदुर्ग) या तीन गावांचा समावेश आदर्श गाव योजनेत नुकताच झाला आहे. ‘आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती’चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी या गावांना भेटी दिल्यानंतरच योजनेत सहभागाला अंतिम मंजुरी दिली गेली. आदर्श गाव करण्यासाठी राज्यात अनेक गावांमध्ये धडपड सुरू आहे. मात्र, त्यासाठी गावातील एकोपा व गावकऱ्यांची चिकाटी महत्त्वाची समजली जाते. या तीन गावांमधील गावकऱ्यांनी प्रथम ग्रामसभा बोलावून गावाला आदर्श गाव योजनेत गाव निवडीचा ठराव केला होता. धुळे जिल्ह्यातून देखील एका गावाचा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे आला आहे. त्यामुळे लवकरच चौथ्या गावाचाही समावेश आदर्श गाव योजनेत होण्याची शक्यता आहे.  हिवरेबाजार किंवा राळेगणसिद्धीप्रमाणेच या गावांमध्ये देखील ग्रामविकासाचा सप्तसूत्री कार्यक्रम राबविण्याचा संकल्प तेथील गावकऱ्यांनी केला आहे. यात नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान, लोटाबंदी, बोअरवेल बंदी आणण्याचे ठराव या गावांनी केले आहेत.  आदर्श गाव योजनेत समावेश होण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या आत असावी लागते. गावाचे महसुली क्षेत्र अडीच हजार हेक्टरपर्यंत असावे लागते. त्यासाठी तलाठ्याकडून सिंचन व महसुली क्षेत्राचे प्रमाणपत्र जोडावे लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली.  पाणलोटाची कामे करण्यासाठी या गावांमध्ये कृषी, तसेच इतर विभागांकडून मदत केली जाते. याशिवाय सदर गावांना क्षेत्रानुसार प्रतिहेक्टरी १२ हजार रुपये अनुदान मिळते. आदर्श गावांमध्ये गावकऱ्यांकडून विविध ४० बाबींवर कामे केली जातात.  पाण्याचा ताळेबंद, आरोग्य, शिक्षण, वनीकरण, व्यसनमुक्ती, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, सामाजिक सलोखा, पीकरचनेतील बदल अशा प्रमुख बाबी यशस्वीपणे राबविल्या तरच गावाला आदर्श गावाचा दर्जा मिळतो.  ‘‘राज्यात कोठाडे, निवडुंगवाडी, पिंपळगाव कवठा, दवणगाव, पिंपळसकवडा, खोर अशी वीसपेक्षा जादा गावे आदर्श झाली आहेत. श्री.पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ९३ गावांना आदर्श करण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे,’’ अशी माहिती आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे उपसंचालक महादेव निंबाळकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT