पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या मंदिराबाहेर संत नामदेव पायरीजवळ श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात करताना `रयत क्रांती`चे अध्यक्ष सदाभाऊ खोत
पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या मंदिराबाहेर संत नामदेव पायरीजवळ श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात करताना `रयत क्रांती`चे अध्यक्ष सदाभाऊ खोत 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन 

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार आंदोलनाची सुरुवात शनिवारी (ता.१) पंढरपुरातून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी श्री विठ्ठलाला आणि रासपचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रभागा नदीला दुग्धोभिषेक करीत केली. तत्पूर्वी मध्यरात्रीच पंढरपूर-सातारा, पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर रस्त्यावर टायर जाळून सरकार विरोधी घोषणा देत ‘रयत’च्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. त्याशिवाय शनिवारी जिल्ह्यातील तिसंगी, वाघोली, पेनूर येथेही आंदोलन झाले. त्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, तर कुठे ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक करून लक्ष वेधले. 

माजी मंत्री खोत यांनी सकाळी आठच्या सुमारास पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिराबाहेरील संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत सरकारविरोधी जोरदार घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनीही पंढरपुरात चंद्रभागा नदीला दुग्धाभिषेक करुन लक्ष वेधले. दूध दरवाढीसाठी या दोन्ही माजी मंत्र्यांनी अशा पद्धतीने श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले.  

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पंढरपूर- सातारा महामार्गावर आणि पंढरपूर-मंगळवेढा महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. त्याशिवाय शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात विविध भागात हे आंदोलन सुरुच राहिले. सकाळी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे कार्यकर्त्यांनी स्वतः दुधाने आंघोळ करत रस्त्यावर दूध ओतले.

मोहोळ तालुक्यातील पेनूर, वाघोलीतही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. वाघोली गावातील श्री महादेव मंदिरात पिंडीला दुग्धाभिषेक करत लक्ष वेधले. त्याशिवाय जिल्ह्यातील अनेक भागांत दिवसभर हे आंदोलन सुरुच होते. काही गावात दूध संस्थानी स्वतःहून दूध संकलन बंद ठेवले. काही गावात शेतकऱ्यांनी बकरी ईद सणामुळे मुस्लिम बांधवांना दूध वाटून अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले.    ‘एक मुका, एक बहिरा अन् एक आंधळा’ राज्यामध्ये रोज १ कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होते. ६० लाख लिटर दूध पिशवी बंदमध्ये विक्री होत आहे. ५० लाख लिटर दूध अतिरिक्त असून, त्याची दूध भुकटी तयार केली जाते. सध्या गाईच्या दुधाला २० रुपये लिटर भाव आहे. फडणवीस सरकारने दूध उत्पादकांना ५ रुपये थेट अनुदान दिले, भुकटीला ५० रुपये निर्यात अनुदान दिले. याच धर्तीवर सरकारने दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे आणि दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री खोत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

पण सध्याचे तीन पक्षाचे सरकार आहे, कोणाचा पायपोस कोणाला नाही, हे तिन्ही पक्ष म्हणजे एक मुका, एक बहिरा आणि एक आंधळा आहे, मग कारभार कसा होणार, अशी टीकाही खोत यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT