Sugar Export
Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर दबावात

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर ः साखर उद्योगातील (Sugar Industry) विविध संस्थांनी येत्या हंगामात जादा साखर उत्पादनाचे (Sugar Production) अंदाज वर्तविल्याने आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर (Global Market Sugar Rate) दबावात आले आहेत. शुक्रवारी (ता. २८) मार्च न्यूयॉर्क जागतिक वायदेबाजारात साखर दर १७.५८ पौंड प्रति सेंट अशा नीचांकी पातळीवर बंद झाला. डिसेंबर वायदे बाजारात लंडन रिफाइंड व्हाईट साखर ५१५.६० डॉलर प्रति टन दरावर बंद झाला. शुक्रवारी न्यूयॉर्क वायदेबाजारात साखर एक महिन्याच्या नीचांकी आणि लंडनची साखर दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली.

साखरेचा पुरवठा वाढल्याने साखरेच्या किमती दबावाखाली आहेत. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) मंगळवारी (ता. २५) नवा अंदाज व्यक्त केला आहे. या मध्ये साखर उत्पादनवाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार जागतिक पातळीवर हंगाम २०२२-२३ चे साखर उत्पादन गेल्या हंगामापेक्षा ४.५ टक्क्यांनी वाढून १८१.९ दशलक्ष टन होईल. जागतिक साखर बाजारपेठेत ५.६ दशलक्ष टन जादा साखर असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतातही यंदा उच्चांकी साखर उत्पादनाचा अंदाज आहे. ३६.५ दशलक्ष टन (३६५ लाख टन) साखर उत्पादन यंदा अपेक्षित आहे. गेल्या हंगामापेक्षा हे उत्पादन २ टक्क्यांनी जास्त आहे. यंदा भारतात ऊस क्षेत्रातही सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात साखरेचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये साखर उत्पादन नसल्याने याचा मोठा फायदा भारतीय साखरेला झाला होता.

यंदा मात्र ही परिस्थिती कायम राहील, अशी शक्यता कमी असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. यंदाही भारत व ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात तीव्र स्पर्धा निर्माण होणार आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने दोन्ही देशातून जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात साखर येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.

स्टोनएक्स या संस्थेने ब्राझीलमध्ये येत्या दोन वर्षांत साखर उत्पादनात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. याचा मोठा फटका भारताला बसू शकतो. भारताने खुल्या निर्यातीला पायबंद घातल्याने याचे परिणाम जागतिक बाजारपेठेत कशाप्रकारे होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारतातून अमर्याद साखर जागतिक बाजारपेठेत येणार नसल्याने जागतिक बाजारपेठेत दर काही प्रमाणात स्थिर राहू शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

भारतीय कारखानदारीसाठी हे वर्ष आव्हानात्मक आहे. जादा साखर उत्पादनाच्या अंदाजामुळे कारखान्यांना निर्यात करताना समयसूचकता बाळगावी लागणार आहे. पुढील वर्षासाठी काही कारखानदारांनी गेल्या महिन्यात उच्च दराने साखर निर्यातीसाठी करार केले आहेत. सरकारने कोटा जाहीर करताच निर्यातीची प्रक्रिया तातडीने सुरू होण्याची शक्यता आहे.
अभिजीत घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT