Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : दर पाडण्यासाठीच वायदे बंदीला ‘सोपा’चे समर्थन

‘सोपा’ ही सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांची संघटना आहे. त्यामुळे प्रक्रियाकामी लागणारा कच्चा माल स्वस्तात मिळावा, अशी अपेक्षा त्यांना असते. त्याच कारणामुळे ‘सोपा’ने सातत्याने दर कमी कसे होतील या पातळीवर प्रयत्न चालविले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : शेतकऱ्यांऐवजी प्रक्रिया उद्योजकांच्या (Processing Industry) व्यापक हिताला प्राधान्य देत सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (Soybean Processors Association Of India) (सोपा) वायदे बाजारातील सोयाबीन व्यवहार बंदीचे (Soybean Future Ban) समर्थन केले आहे; मात्र या बंदीमुळे सोयाबीन दरात (Soybean Rate) सातत्याने घट होत असल्याने ती उठविण्यात यावी, अशी मागणी परिवर्तन ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीने (Parivartan Organic Farner Producer Company) थेट ‘सेबी’कडे केली आहे.

कामरगाव येथील परिवर्तन ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढेकळे यांनी ‘सेबी’ अध्यक्ष माधवी पुरी बुच यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की ‘सोपा’ ही सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांची संघटना आहे. त्यामुळे प्रक्रियाकामी लागणारा कच्चा माल स्वस्तात मिळावा, अशी अपेक्षा त्यांना असते. त्याच कारणामुळे ‘सोपा’ने सातत्याने दर कमी कसे होतील या पातळीवर प्रयत्न चालविले आहेत. त्याच प्रयत्नातून सोपाने गेल्या वर्षीपासून वायदे बाजारात बंदी घालण्यात आलेल्या सोयाबीन व्यवहाराचे देखील समर्थन केले आहे.

यापूर्वीदेखील सोपाने सोयाबीन वायदा बंद राहावा याकरिता सेबीसमोर आपली बाजू मांडली आहे. कारण त्यांना प्रक्रियाकामी सोयाबीन कमी दरात हवे असते. त्यामुळेच आज सोयाबीन ५२०० क्विंटलवर आले आहे. नव्या सोयाबीनची आवक बाजारात झाल्यानंतर हे दर आणखी खाली येतील. सोपाची अपेक्षा आहे, की त्यांना ४००० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन मिळावे; मात्र प्रक्रिया उद्योजकांचे हित जपणाऱ्या सोपाने शेतकरी हिताकडे मात्र या व्यवहारात पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे, की कोणत्याही पक्षाचे मत विचारात घेण्यापूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे.

‘सोपा’ने यापूर्वी देखील नव्या सोयाबीनची आवक बाजारात होण्यापूर्वी उत्पादनाच्या आकड्यात वाढ दर्शविण्यावर भर दिला आहे. दर पडावे याकरिता गेल्या वर्षीचा शिल्लक साठादेखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. या वर्षी पावसामुळे उत्पादकता प्रभावित होण्याची अपेक्षा असताना सोपा मात्र पीकस्थिती चांगली असल्याचा दावा करीत आहे. या सर्व प्रकारावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. शेतकऱ्यांकडून कमीत कमी दरात सोयाबीन खरेदी करता यावे आणि प्रक्रिया उद्योजकांनी त्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कमवावा यावर सोपाचा भर राहिला आहे.

दुसरीकडे सोयाबीन वायद्यामुळे बाजारभावात पारदर्शकता राहते, व्यापाऱ्यांना मनमानी दरात सोयाबीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे सोयाबीन वायदा पुन्हा पूर्ववत करावा, अशी मागणी ढेकळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरुवातीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने बियाणे खरेदी केले. त्यामुळे त्यांनी चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विकावे, अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे, असे ढेकळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

परिवर्तन ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीसोबत ३३४ शेतकरी जुळले आहेत. जे सोयाबीन, हरभरा या पिकांत काम करतात. आमची कंपनी एनसीडीईएक्स सोबत २०१७ पासून काम करत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजार दरासंदर्भातील जोखीम कमी करणे शक्य होते. भविष्यात शेतीमालाचे दर काय राहतील, याची माहिती होत असल्याने विक्रीबाबत निर्णय घेता येतो; मात्र ‘सोपा’ला हेच नको आहे.
ज्ञानेश्‍वर ढेकळे, अध्यक्ष, परिवर्तन फार्मर प्रोड्यूसर कंपनी, कामरगाव, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT