Jalgaon News : देशात उत्तर भारतातील कापूस लागवड यंदा स्थिर आहे. परंतु देशात इतरत्र लागवड कमी होईल, असे दिसत आहे. देशात मागील हंगामात १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा ही लागवड १२६.५० लाख हेक्टरपर्यंत राहू शकते, असाही अंदाज आहे.
यातच उत्तर भारतातील कापूस पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. पंजाब, हरियानामध्ये कापूस पिकाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात मागील किंवा २०२२-२३ मध्ये कापूस लागवड ४२ लाख हेक्टरवर झाली होती.
मागील वर्षी राज्यात १८ जुलैअखेर ३८ लाख ७८ हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. यंदा १८ जुलै अखेर ३८ लाख ३३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड राज्यात झाली आहे.
त्यात काहीशी घट होवून लागवड ४० लाख हेक्टरवर स्थिरावेल, असे दिसत आहे. लागवडीचे आकडे येतच आहेत. परंतु लागवडीची मुदत महाराष्ट्र व इतर भागात संपली आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात कोरडवाहू कापूस लागवड झाली आहे.
तेलंगणातही जुलैच्या मध्यापर्यंतच लागवड झाली आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटकातील ९५ टक्के कापसाखालील क्षेत्र कोरडवाहू असते. तर फक्त पाच टक्के क्षेत्राला सिंचनाची व्यवस्था आहे. पाऊस उशिरा आल्याने महाराष्ट्रातील लागवडीला फटका बसला आहे.
राज्यात सर्वाधिक कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात केली जाते. जिल्ह्यात यंदा साडेपाच लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित होती. परंतु ही लागवड १५ जुलैपर्यंत चार लाख ४५ हजार हेक्टरवर झाली आहे. ही लागवड यंदा कमीच राहील, असेही संकेत आहेत.
उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थानमध्ये एप्रिलमध्येच कमाल क्षेत्रात कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तेथे लागवडीत घट फारशी झालेली नाही. तेथे कापसाखालील ९५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. तेथील कापूस पीक तीन महिन्यांचे झाले आहे.
त्यात पुढील काही दिवसांत वेचणी शक्य आहे. परंतु पावसाने तेथे पूर्व भागातील हंगामाला फटका बसला आहे. गुजरातमध्ये सुमारे ५५ टक्के व मध्य प्रदेशातील ५० टक्के कापसाखालील क्षेत्रही ओलिताखाली आहे.
उत्पादनावर परिणाम शक्य
देशात महाराष्ट्र व तेलंगणा ही राज्ये कापूस लागवडीत व उत्पादनातही अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून ८५ ते ९० लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) अपेक्षित असते. तर तेलंगणात ५० ते ५१ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. पण याच राज्यांतील कापूस पिकाची लागवड व इतर बाबींविषयी समाधानकारक चित्र नाही. यामुळे पुढे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असाही अंदाज आहे.
प्रमुख राज्यांमधील २०२३-२४ मध्ये अपेक्षित कापूस लागवड (लाख हेक्टरमध्ये)
महाराष्ट्र---४०
गुजरात---२४
तेलंगणा---१९
उत्तर भारत---१४
देशात उत्तर भारतात कापूस लागवडीत घट दिसत नाही. परंतु कोरडवाहू कापूस हंगामाला पावसाच्या लहरीपणामुळे उशीर झाला आहे. लागवडीत मोठी घट होणार नाही. परंतु महाराष्ट्र, तेलंगणातील क्षेत्र काहीसे कमी होताना दिसत आहे.- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.