Akola News : दरवर्षी नवीन हंगामाच्या तोंडावर कमी होणारे तुरीचे दर यंदा आठ दिवसांत तब्बल २००० रुपयांपर्यंत घसरले आहेत. तूर उत्पादकांच्या दृष्टिने ही बाब चिंता वाढवणारी बनली आहे. नवीन तुरीची आवक सुरू झाल्याने व यंदा पीक चांगले दिसत असल्याने दर कमी झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. तरीही तूर हमीभावापेक्षा अधिक दराने बाजारात विकत असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षात तुरीची आवक कमी होती. त्यामुळे तुरीने दर चांगला मिळवला. संपूर्ण हंगामभर दर मिळत होता. यंदा पीक चांगले आहे. प्रामुख्याने देशात यंदा कर्नाटकसारख्या उत्पादक राज्यात तुरीचे बंपर पीक असल्याचे सांगितले जात आहे. तेथील तुरीची आवक सीमावर्ती बाजारपेठांमध्ये दिवसाला ५० हजार क्विंटलपर्यंत पोहोचल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे. या सर्व बाबींचा तुरीच्या दरांवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या शनिवारी (ता. १३) तुरीचा सरासरी भाव ९६७५ रुपये होता. या दिवशी किमान दर ८८०० व कमाल दर दहा हजारांच्या आसपास म्हणजेच ९८५० रुपये एवढा होता. मात्र, या आठवड्यात जसजशी नवीन तुरीची आवक सुरू झाली, तसा दरांवरील दबाव वाढत गेला.
गुरुवारी (ता. १९) येथील बाजारात तुरीला सरासरी दर ८००० पर्यंत मिळाला. किमान दरसुद्धा साडेसात हजारांपर्यंत खाली आला आहे. तर शुक्रवारी (ता. २०) किमान ७०००रुपये, कमाल ८२०५ आणि सरासरी दर ७६५५ रुपयांपर्यंत घसरला. आठवडाभरात सरासरी दरात तब्बल २००० रुपयांची ही मोठी घसरण झाली आहे. तुरीच्या हंगामाची स्थानिक भागात आता सुरुवात झाली आहे. येत्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात हा हंगाम वेग घेणार आहे. सध्या दर दोन दिवसांत तुरीचे दर कमी होत असल्याने मोठ्या आवकेच्या काळात नेमके तुरीचे दर किती राहतात याबाबत शेतकरी आता साशंक बनले आहेत.
अद्याप हमीभावापेक्षा जादा दर
बाजारात सध्या तुरीला सरासरी ८००० रुपयांचा दर मिळत आहे. हा दर हमीभावापेक्षा (७५५०) अद्याप तरी जास्त आहे. येत्या काळात तुरीचे दर घसरले तर शासकीय खरेदीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाऊ शकते.
तुरीचे आठवड्यातील दर
तारीख किमान कमाल सरासरी
१३ डिसेंबर ८८०० ९८५० ९६७५
१६ डिसेंबर ७५०० ९६०० ८७००
१९ डिसेंबर ७००० ८६७० ८०००
२० डिसेंबर ७००० ८२०५ ७६५५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.