नगर : राज्यात मक्याचे क्षेत्र (Maize Acreage Maharashtra ) वाढत आहे. मात्र पुरेसे उत्पादन (Maize Production) निघत नाही. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. खरिपात (Kharif Maize Sowing) राज्यातील सात जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या (Food Security Mission) भरडधान्य विकास योजनेतून उपक्रम राबवला जात असून प्रती हेक्टरवर सहा हजार रुपये खर्च केले जातील. चारशे हेक्टरवर आंतरपीक प्रात्यक्षिकही असेल.
राज्यात खरिपात मक्याचे ८ लाख ३८ हजार सरासरी क्षेत्र आहे. मागील वर्षी साधारणपणे पावणे नऊ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र गेल्या काही वर्षाचा विचार केला तर सुधारित बियाणांचा वापर करूनही मक्याच्या उत्पादनात फारशी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे मक्याचे अधिक उत्पादन घेणाऱ्या नगरसह नाशिक, धुळे, जळगाव, सांगली, औरंगाबाद, जालना या सात जिल्ह्यात यंदा कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (भरडधान्य) योजनेतून उत्पादन वाढीसाठी उपक्रम राबवले जात आहेत.
एकूण पाच हजार ५५४ हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. त्यात ३ हजार ७०० सुधारित तंत्रज्ञानावर आधारित सलग पीक प्रात्यक्षिके, मका व सोयाबीन आंतरपिकांचे २०० हेक्टरवर तर मका व तुरीच्या आंतरपिकांचे २०० हेक्टरवर प्रात्यक्षिके केली जाणार आहे. प्रती हेक्टरवर सहा हजार रुपये खर्च केले जाणार असून त्यात बियाणे व अन्य बाबी दिल्या जातील. प्रात्यक्षिकांवर २ कोटी ४६ लाख तर प्रमाणिक बियाणे वाटपावर १ कोटी ४५ लाख रुपये खर्च होणार आहेत. १४५४ हेक्टरवर प्रमाणित बियाणे वितरण होणार असून त्यासाठी प्रती हेक्टर १० हजार रुपये खर्च केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना पीक निघेपर्यंत कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील. गेल्या काही दिवसापासून लष्करी आळीचा मक्यावरही प्रादुर्भाव होत आहे. त्यावर उपायही कृषी विभागातून सांगितला जाईल.
सात जिल्ह्यातील पीक प्रात्यक्षिके (हे.) आणि निधी (रु.)
जिल्हा/बियाणे..... हेक्टर.... निधी
नगर...
नियमित..... ३६०... २१ लाख ६० हजार
प्रमाणित..... १२४... १२ लाख ४० हजार
नाशिक...
नियमित..... १०६०.... ६३ लाख ६० हजार
प्रमाणित.....३८२ .....३८ लाख २० हजार
धुळे
नियमित..... ३५०..... २१ लाख
प्रमाणित.....१२१.....१२ लाख १० हजार
जळगाव
नियमित..... ७७०...... ४६ लाख २० हजार
प्रमाणित.....२७८...... २७ लाख ८० हजार
सांगली
नियमित..... ३०० ....... १८ लाख
प्रमाणित.....१०२ ..........१० लाख २०
औरंगाबाद
नियमित..... ९३०............५५ लाख ८० हजार
प्रमाणित.....३३३........ ४४ लाख ७० हजार
जालना
नियमित..... ३३०........... १९ लाख ८० हजार
प्रमाणित.....११४.......... ४४ लाख ७० हजार
लाभार्थी निवडीची खबरही नाही
मका विकास कार्यक्रम राबवताना ज्या भागात मका उत्पादकांची संख्या अधिक आहे त्या भागातील शेतकऱ्यांची निवड करणे अपेक्षित आहेत. मात्र नगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून शासनाच्या अशा उपक्रमाचा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे बोजवारा उडाला आहे. मक्यासह अन्य प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी निवडी केल्या असे सांगितले जात आहे.
वरिष्ठ पातळीवरूनच निवडी केल्याचेही अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनाच या निवडीची खबरही नाही. कृषी विभागाच्या योजनांच्या प्रसिद्धीचाच नगर जिल्ह्यात मोठा अभाव आहे. गेल्यावर्षीही असे प्रात्यक्षिके राबवली, कोट्यवधी रुपये खर्च केले, पण उत्पादन वाढीसाठी काहीही फायदा झाल्याचे दिसत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.