soybean market
soybean market agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : शेतकऱ्यांनी महिनाभरात किती सोयाबीन विकलं?

Anil Jadhao 


पुणेः देशात यंदा १२० लाख टन सोयाबीन उत्पादन (Soybean Production) होईल. तर शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात १७ लाख टनांची विक्री केल्याचा अंदाज सोपानं व्यक्त केला. मात्र शेतकरी आणि काही जाणकारांना सोपाचा हा अंदाज मान्य नाही. तर देशातील सोयाबीन दर (Soybean Rate) सध्या स्थिर आहेत. 

देशातील सोयाबीन पिकाला यंदा पावसाचा मोठा तडाखा बसला. ऑक्टोबर महिन्यात सलग १५ ते २० दिवस पाऊस झाला. नेमकं याच काळात अनेक भागातील सोयाबीन काढणीला आलं होतं. यंदा बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पेरणीला उशीर झाला होता. हे सोयाबीन काढणीलाही उशीरा आलं. त्यामुळं पावसाच्या तडाख्यातून काहीसं वाचलं. मात्र सोयाबीनचं नुकसान वाढल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

पण सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएन ऑफ इंडिया अर्थात सोपानं देशातील सोयाबीन उत्पादनाचा १२० लाख ४० हजार टनांचा अंदाज कायम ठेवला. सोपाच्या मते मागील हंगामातील उत्पादन ११९ लाख टन होतं.

सोपानं मागील हंगामातील तब्बल २५ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याचं म्हटलंय. पण जाणकारांच्या मते मागील हंगामातील सोयाबीन १२ ते १५ लाख टनांच्या दरम्यान असेल. शिल्लक सोयाबीनचा सोपाचा अंदाज अनेक बाजार अभ्यासकांना मान्य नाही. देशात यंदा गाळपासाठी १३४ लाख टन सोयाबीन उपलब्ध असेल, असंही सोपानं सांगितलं. या अंदाजावरही शेतकऱ्यांसह काही जाणकार आक्षेप घेत आहेत.

सोपाच्या मते ऑक्टोबर महिन्यात १७ लाख टन सोयाबीन बाजारात आलं. म्हणजेच एवढ्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये विक्री केली. त्यापैकी ८ लाख टनांच प्रक्रिया प्लांट्सनी गाळप केलं. यातून साडेसहा लाख टन सोयापेंडचं उत्पादन झालं. त्यामुळं १२४ लाख टन सोयाबीन अद्याप शिल्लक असल्याचंही सोपानं म्हटलंय.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानं सोयाबीनची गुणवत्ता कमी झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांनी पावसात सापडलेलं सोयाबीन लगेच विकलं. मात्र दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखून धरलं. नेमकं याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दराने उचल खाल्ली. परिणामी देशातही सोयाबीन दर सुधारले.

मात्र सोयाबीनला ६ हजार रुपयांपेक्षा जास्त दराला आधार मिळताना दिसत नाही. सोयाबीन दराची कमाल पातळी ६ हजार रुपयांच्या दरम्यान मागील पंधरवाड्यापासून आहे. मात्र त्यापेक्षा जास्त वाढ होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल वाढत असलं तरी सोयापेंडचे दर मात्र काहीसे नरमले. त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात काहीशी कमी झाली. याचा परिणाम बाजारावर जाणवतोय.
…………
देशातील दरपातळी
देशात सोयाबीनला सध्या सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर कमाल दर ६ हजार ते ६ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी विक्रीसाठी थांबले आहेत. मात्र जागतिक सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता सोयाबीनला ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT