Pune News: सरकारने पिवळा वाटाणा आयातीवर बंधने घालण्याची गरज होती. मात्र पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्राने ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे कडधान्य उत्पादकांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे. पिवळा वाटाणा आयात कायम राहून देशातील हरभरा, तूर, मसूर, मुगाच्या भावावरील दबावही कायम राहणार आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
गेले वर्षभर कडधान्य बाजारावर पिवळा वाटाण्याने दबाव आणला होता. पिवळा वाटाणा जवळपास सर्वच कडधान्याला पर्याय म्हणून वापरला जातो. त्यातही हरभऱ्याऐवजी पिवळा वाटाण्याचा वापर जास्त असतो. त्यामुळे कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळा वाटाण्याची आयात खुली केली. त्यानंतर पिवळा वाटाण्याची आयात विक्रमी पातळीवर पोचली. आतापर्यंत जवळपास ३५ लाख टनांच्या दरम्यान पिवळा वाटाणा आयात झाल्याचा अंदाज आहे. यामुळे सर्वच कडधान्यांमधील तेजी कमी होण्याला मदत झाली.
पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीची मुदत ३१ मे रोजी संपणार होती. पिवळा वाटाण्यामुळे आधीच देशात हरभरा, तूर, मसूर आणि मुगाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. देशात पिवळा वाटाण्याचा साठाही आहे. यामुळे हरभरा आणि तुरीच्या भाववाढीवरही दबाव आहे. त्यामुळे सरकारने पिवळा वाटाणा आयातीवर शुल्क लावावे, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांचीही होती. देशात कडधान्याचे उत्पादन चांगले झाल्याचा अंदाजही दिला आहे. त्यामुळे सरकार ३१ मे नंतर पिवळा वाटाणा आयातीवर शुल्क लागू करेल, असा अंदाज होता. पण सरकारने सर्वांनाच धक्का दिला.
पण केंद्राने एक दिवसाआधीच मुदतवाढ दिली. केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आयात आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुक्त ठेवली आहे. आयातीवर कोणतेही शुल्क नाही आणि बंधन नाही. तसेच हरभरा आणि तुरीची आयातही सुरूच आहे. याचा दुहेरी दबाव देशातील हरभरा आणि तुरीच्या भावावर येणार आहे. त्यामुळे सरकारने पिवळा वाटाण्याची मुक्त आयात बंद करून आयात शुल्क लागू करावे, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांनी केली आहे.
सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत पिवळा वाटाणा कोणत्याही शुल्काविना आयात करण्यास परवानगी दिली आहे. यावरून स्पष्ट दिसते, की सरकार भाववाढ होणार नाही याची काळजी घेत आहे. ग्राहकांना डाळी स्वस्त मिळाव्यात, अशी सरकारची इच्छा आहे.राहुल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया, नवी दिल्ली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.