Cotton Sowing  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Sowing: कापूस लागवड जोमात; तुरीचा पेरा १८ टक्क्यांनी पिछाडीवर

Kharif Crop Sowing : देशात मागील दोन आठवड्यांमध्ये बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला. गेल्या आठवड्यापर्यंत देशातील खरिपाचा पेरा मोठ्या प्रमाणात माघारलेला होता.

Team Agrowon

Pune News : देशात मागील दोन आठवड्यांमध्ये बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला. गेल्या आठवड्यापर्यंत देशातील खरिपाचा पेरा मोठ्या प्रमाणात माघारलेला होता. पण २१ जुलैपर्यंतचा विचार करता, देशात ७३३ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला.

मागील हंगामात याच काळातील पेरणी ७२५ लाख हेक्टरवर होती. खरिपात आतापर्यंत तांदूळ, भरडधान्ये आणि तेलबिया पिकांच्या लागवडीत वाढ दिसते. तर कडधान्याचा पेरा जवळपास १० टक्क्यांनी कमी आहे. कापूस लागवडही काही प्रमाणात घटलेली दिसते.

यंदाचा जून महिना कोरडाच गेला. त्यामुळं खरिपाच्या लागवडी कमालीच्या पिछाडीवर पडल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यातच धान्य आणि भाजीपाल्याची बाजारातील आवक कमी होऊन दर वाढल्याने चिंतेचे वातावरण होते.

त्यातही पुढील वर्षी निवडणुका असल्याने सरकारच्याही तोंडचं पाणी पळालं. पण जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली. सध्या बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही वेग आला.

देशात गेल्यावर्षभरात तांदळाच्या भावात ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तांदूळ लागवडीला पसंती दिल्याचे दिसते. त्यातच जुलैमध्ये पाऊसमान चांगले असल्याने भात लागवड जवळपास तीन टक्क्यांनी वाढून १८० लाख हेक्टरवर पोचली.

खरिपातील महत्वाच्या भात उत्पादक उत्तर प्रदेशातील भात लागवड ४ लाख हेक्टरने वाढून ३९ लाख हेक्टरवर पोचली. मध्य प्रदेशातील लागवडीत सर्वाधिक ७ लाख हेक्टरने वाढ झाली. मध्य प्रदेशात २० लाख हेक्टरवर भात पीक आहे. तर पंजाब, हरियाना, महाराष्ट्र, आसाम आणि गुजरातमध्ये भात लागवड कमी झाली.

कापूस लागवडीचा विचार करता, आतापर्यंत क्षेत्र केवळ ३० हजार हेक्टरने कमी दिसते. चालू हंगामात ऐन लागवडीच्या काळातही कापसाचे भाव दबावात आहेत. कापसाचा भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहे.

सात महिने कापूस ठेऊनही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. यामुळे लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण जुलैच्या दोन आठवड्यांमध्ये कापूस लागवडीने चांगला वेग घेतला. त्यामुळे देशात आतापर्यंत जवळपास ११० लाख हेक्टरवर कापूस पीक आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक जवळपास ४० लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. पण महाराषट्रातील क्षेत्र काहीसे कमी दिसते. राजस्थानमध्ये सर्वाधिक २३ टक्क्यांनी लागवड वाढली. तर आंध्र प्रदेशातील लागवड सर्वाधिक ५८ टक्क्यांनी कमी झाली.

तेलंगणातही कापूस लागवड यंदा ३५ टक्क्यांनी तर पंजाबमध्ये ३२ टक्क्यांनी कापसाखालील क्षेत्र कमी झालं. यंदा गुजरातमध्येही कापूस लागवड १० टक्क्यांनी वाढली. सोबतच मध्य प्रदेश, हरियाना आणि तेलंगणातही कापूस लागवड वाढ झाली.

कडधान्याचा पेरा यंदा जवळपास १० टक्क्यांनी घटल्याचे दिसते. कडधान्याचा पेरा ८६ लाख हेक्टरपर्यंतच पोचला. कडधान्यामध्ये तुरीच्या लागवडीत झालेली घट जास्त आहे. तुरीखालील क्षेत्र १८ टक्क्यांनी घटले. मुगाची लागवडही दोन टक्क्यांनी कमी झाली असून उडदाचे क्षेत्रही जवळपास १० टक्क्यांनी घटले आहे.

तुरीची लागवड आतापर्यंत २७ लाख हेक्टरवर पोचली. तूर उत्पादनात महत्वाच्या महाराष्ट्रात लागवड सात टक्क्यांनी पिछाडीवर असून ९ लाख ६० हजार हेक्टरवर पोचली. तर कर्नाटकातील तूर लागवड तब्बल ४१ टक्क्यांनी कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT