Sangli News : सांगली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या जत दुय्यम बाजार समिती आवारात रविवारपासून (ता. २५) बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. सौद्यांना पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशीच संखच्या प्रवीण अवरादी यांच्या बेदाण्याला उच्चांकी २७५ रुपयांचा दर मिळाला. सोमनिंग चौधरी यांच्या बेदाण्याला २५१ रुपयांचा दर मिळाला.
जत दुय्यम बाजार समिती आवारात बैदाणा सौदे दर शनिवारी व रविवारी सुरू राहणार आहेत. आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. या वेळी सभापती सुजय शिंदे, सचिव महेश चव्हाण, सभापती शकुंतला बिराजदार, अप्पासाहेब बिराजदार, सोमनिंग चौधरी, बंडू शिंदे, सरदार पाटील, बाळ निकम, भूपेंद्र कांबळे, सलीम पाच्छापुरे, मुन्ना पखाली, नीलेश बामणे, सनी महाजन आदी उपस्थित होते.
आमदार सावंत म्हणाले, की येथील बाजार समिती दहा वर्षांपासून आमच्या ताब्यात आहे. या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सुरुवातीस डाळिंब सौदे सुरू केले. त्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर आता नव्या संचालकांनी बेदाणा सौदा करण्याचा निर्णय घेतला. तो नक्कीच जतच्या दृष्टीने चांगला आहे.
हा व्यापारही चांगला वाढला पाहिजे, याकडे अधिकचे लक्ष द्यावे. सभापती शिंदे म्हणाले, की जत येथे बेदाणा सौदा सुरू केला. जतसह कर्नाटक सीमाभाग, तसेच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या भागांतील शेतकऱ्यांची सोय झाली.
या भागात उच्च प्रतीचा बेदाणा तयार होतो. आजवर सांगली, तासगाव येथे होणारा सौदा जतमध्ये सुरू झाल्याने भविष्यात येथील सौदा जागतिक पातळीवर चर्चेत येईल. त्यामुळे हा सौदा जगभर प्रसिद्ध होईल.’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.