Jalgaon News : खानदेशात मागील आठवड्यात पपई काढणीचा मुहूर्त अनेक भागांत करण्यात आला. परंतु आवक सध्या रखडत सुरू आहे. शेतकऱ्यांना २० रुपये प्रतिकिलो दर जागेवरच्या खरेदीत मिळत आहे.
पपईची काढणी नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांतही सुरू झाली आहे. यंदा सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांना जागेवर प्रतिकिलो २० रुपये दर मिळाला आहे.
तर काही शेतकऱ्यांना २१ रुपये दरही मिळाला आहे. मागील हंगामातही सुरुवातीला २० ते २१ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळत होता. सध्या फेब्रुवारीत लागवड केलेल्या पपई बागांमधून आवक सुरू आहे. पण खानदेशात कमाल क्षेत्रातील बागांची लागवड मार्च व एप्रिल महिन्यात झाली होती. या बागांमधून आवक पुढील महिन्याच्या मध्यात सुरू होईल. दिवाळीला आवकेचे प्रमाण आणखी वाढेल.
फेब्रुवारीत खानदेशात अल्प म्हणजे सुमारे एक हजार ते ११०० हेक्टरवर पपई बागांची लागवड झाली होती. खानदेशात एकूण पपईची लागवड सुमारे साडेसात हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार ३०० हेक्टरवर पपई बागा आहेत.
शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ७०० हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे. या पाठोपाठ धुळ्यात सुमारे एक हजार हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे १५०० हेक्टरवर पपई बागा आहेत.
काही शेतकऱ्यांनी १७ ते २० महिने सतत उत्पादन देणाऱ्या पपई वाणांची लागवड केली आहे. या बागांत विषाणूंची समस्यादेखील नसते. तर काही शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी मागणी असलेल्या आणि कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पपई वाणांची लागवड केली आहे. अधिक कालावधीत उत्पादन देणाऱ्या वाणांच्या बागांमध्ये पपईची काढणी रखडत सुरू आहे. कारण फळे पक्व होण्यास विलंब लागत आहे. यामुळे अनेक शेतकरी सुरुवातीच्या चांगल्या दरांचा लाभ मिळवू शकत नसल्याची स्थिती आहे.
प्रतिदिन १८ ट्रक मालाची काढणी
खानदेशात सध्या प्रतिदिन १८ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची काढणी सुरू आहे. सर्वाधिक आवक नंदुरबार जिल्ह्यात होत आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यातही जामनेर, पाचोरा, चोपडा, यावल भागांत पपईची आवक होत आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी १७ ट्रक पपईची आवक झाली होती. यंदाही तशीच स्थिती आहे. यंदा मात्र दर्जेदार पपई काढणीवर आली आहे. मागील हंगामात अतिपाऊस व रोगराईमुळे पपईच्या पिकात मोठी हानी झाली होती. पपईची आवक पुढील पंधरवड्यात वाढेल, असे संकेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.