डॉ. चंद्रकांत जायभाये, दिनेश कानवडे
अत्यंत गुणी, विविध पोषणमूल्यांनी भरपूर अशा लघू तृणधान्यांबाबत (भरडधान्ये) आपल्याला फार कमी माहिती आहे. भारत सरकारने पौष्टिक तृणधान्ये (Nutri Cereals) या वर्गात त्यांना अधिसूचित केले आहे. गरज आहे त्यांचे लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याची, त्यांचा दैनंदिन आहारात वापर वाढवण्याची. ग्राहकांच्या आरोग्याविषयीच्या विविध समस्या त्यातून कमी होतीलच शिवाय शेतकऱ्यांचे अर्थकारणही त्यातून वाढीस लागेल.
कोडो (Kodo Millet)
अन्य नावे - कोद्रा, पायगवत, भातगवत, खडक बाजरी.
संस्कृत - कादेरा, कन्नड- हर्का
सुमारे तीन हजार वर्षांपासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे ते असून ९० सेंमी.पर्यंत उंच वाढते. लघू पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वांत जाडे भरडे असू,न तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. १०० ते ११० दिवसांत ते परिपक्व होते. भारतात जवळपास १.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून ०.८४ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ४२९ किलो प्रति हेक्टर आहे.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व
यातील भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचनास अत्यंत हलके आहे. ॲन्टी ऑक्सिडेंटचे प्रमाण चांगले आहे. मधुमेही रुग्णांना आहारामध्ये भाताला पर्याय म्हणून कोडो धान्य वापरण्याची शिफारस केली आहे. यात लेसिथिनची मात्रा अधिक असल्याने मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. महिलांमधील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यापासून मुक्ततेसाठी या धान्याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. कोडो हे ग्लुटेन मुक्त असल्याने त्याची ॲलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त आहार आहे.
लागवड तंत्रज्ञान- ठळक बाबी
हलक्या, खडकाळ मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत येते. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत अधिक उत्पादन मिळते. चांगल्या निचऱ्याची जमीन उत्तम ठरते.
उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे हे पीक आहे. दुष्काळात तग धरून राहण्याची क्षमता आहे. त्यामुळे कमी आणि अनिश्चित पाऊस पडणाऱ्या ठिकाणी लागवडीस उपयुक्त.
वार्षिक पर्जन्यमान ४०० ते ५०० मिमी. असणाऱ्या प्रदेशात लागवड करतात.
हंगाम- खरीप. लागवड पेरणी पद्धतीने, बियाणे प्रमाण- १० ते १२ किलो प्रति हेक्टरी.
सुधारित जाती : जीपीके-३, जेके-१३, जेके-६५
आंतरपिके- कोडो अधिक मूग, कोडो अधिक तूर, कोडो अधिक सोयाबीन ही २ : १ या प्रमाणात फायद्याची.
उत्पादन- हेक्टरी- धान्य- १५ ते २० क्विं. तर कडबा- ३० ते ४० क्विं.
नाचणी (Finger Millet)
या पिकास नागली वा रागी नावानेही ओळखतात. आपल्या हाताची बोटे अर्धवट दुमटल्यावर जसा आकार होतो तशाच काहीशा प्रकारच्या आकाराची नागलीची कणसे पक्व झाल्यानंतर दिसतात.म्हणून त्यास इंग्रजीमध्ये फिंगर मिलेट म्हणतात. भारतासोबत आफ्रिका, मलेशिया, चीन व जपान आदी देशांमध्ये हे पीक घेतले जाते. हे एकदल वर्गातील पीक असून, मजबूत आणि काटक म्हणावे लागेल. साधारणतः १७० सेंमी. उंच वाढते. फुटव्यांची संख्या ४ ते ८ पर्यंत असते. डोंगर दऱ्यांत आणि उतारावर हलक्या जमिनीत लागवड केली जाते. अशा दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांचे मुख्य अन्न म्हणून नाचणीचा वापर होतो. महाराष्ट्रात त्याची जवळपास १.१२ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. सरासरी उत्पादकता १०६७ किलो प्रति हेक्टर आहे.
आरोग्यदायी महत्त्व
नाचणीतील पोषणद्रव्ये आपल्या दैनंदिन आहारातील गहू आणि भातापेक्षा सरस आहेत. यात तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास ते मदत करतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
नैसर्गिक कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत असल्यामुळे नाचणीच्या दैनंदिन सेवनामुळे ओस्टेओपोरोसिस या हाडाच्या आजारापासून संरक्षण मिळते.
नैसर्गिक लोहाचाही उत्तम स्रोत असल्यामुळे गर्भाचा विकास होण्यास आणि स्तनदा मातांसाठी नाचणीचे सेवन अत्यंत आरोग्यदायी आहे.
हृदयरोग, आतड्याचे व्रण यासाही प्रतिरोध होण्यास मदत होते.
गहू व मक्याप्रमाणेच नाचणीमध्येही विघटन न होणारे तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील स्निग्धांचे संतुलित शोषण होते.
धान्यात असलेली अमिनो आम्ले ‘ॲन्टी ऑक्सिडंट’चे काम करतात.
आयुर्वेदिकदृष्ट्या नाचणी शीतल आहे. त्यामुळे पित्तशामक असून, रक्तातील उष्ण दोष कमी करते.
स्थूल व्यक्तींसाठी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सेवन नियमित करावे.
वाण- फुले नाचणी, दापोली सफेद, फुले कासारी
बाजरी
या पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांत चांगली माहिती उपलब्ध आहे. तथापि काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे.
जमीन निचरा होणारी अनुकूल ठरते. सामू साडेसहा ते साडेसात असावा. पेरणीपूर्वी जमीन भुसभुशीत करून दाबून घट्ट केलेली असावी.
बियाणे ३ ते ३.५ किलो प्रति हेक्टरी वापरावे.
वाण : संकरित- फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, बीबीएच- ३, एचबी- १२००
सुधारित- धनशक्ती
पिकाचे एकूण महत्त्व
लोहाचे प्रमाण चांगले असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
ग्लुटेन मुक्त असल्याने त्याची ॲलर्जी असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.
बाजरीपासूनचे पोल्ट्रीखत लेअर पक्ष्यांना दिल्यास अंड्यांमधील अनावश्यक कोलेस्टेरॉलचे प्रमाण मका खाद्य वापराच्या तुलनेत कमी असते.
हवामानात तग धरून राहण्याची क्षमता अन्य पिकांच्या तुलनेत चांगली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी चांगले आहे. पाऊस उशिरा, कमी व अनियमित झाला तरी अन्य तृणधान्यांपेक्षा धान्य व चारा यांचे उत्पादन अधिक मिळते.
सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांत सूत्रकृमी नियंत्रणासाठी फेरपालट म्हणून बाजरी महत्त्वाची आहे.
बुलडाणा केंद्रात दुर्मीळ वाणांचे संकलन
लघू तृणधान्य ‘मायनर मिलेट्स’ प्रकारातील अनेक धान्ये दुर्लक्षित राहिली आहेत. तरीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील संशोधन केंद्राने त्यांचे महत्त्व जाणले. त्यानुसार कुलगुरू डॉ. विलास भाले, संशोधन संचालक विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रप्रमुख डॉ. चंद्रकांत जायभाये व सहायक प्राध्यापक डॉ. दिनेश कानवडे या पिकांतील संशोधनात गुंतले आहेत. विशेष म्हणजे विविध भागांतून संकलित केलेल्या मिलेटच्या दुर्मीळ नमुन्यांचे वा वाणांचे संकलन वा जर्मप्लास्म पाहण्यास मिळतात. नाशिक (इगतपुरी, सुरगाणा, कळवण) नगर (अकोले) मेळघाट, चिखलदरा, अमरावती, मध्य प्रदेश आदी भागांतील वाड्यावस्त्यांना भेटी देत डॉ. कानवडे यांनी हे अवघड संकलन केले आहे. केंद्राच्या प्रक्षेत्रावर २०१८ पासून त्यांची लागवड केली जात आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातूनही स्थानिक वाण संकलित केले. त्यांचा अभ्यास व वापर करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्यात येत आहेत.
केंद्रात संकलित झालेले नमुने
(जर्मप्लाझ्म)
नाचणी- २७४
वरई-६१
कोदो-१० राळा- १००
बर्टी- ६४
केंद्रात लागवडीखाली असलेली ‘मिलेट्स’
राळा- पीएस ४, लेपाक्षी, प्रसाद
वरई- फुले एकादशी
फुले नाचणी बर्टी- फुले बर्टी
दिनेश कानवडे ८८३०६३६८७८ (लेखक कृषी संशोधन केंद्र, बुलडाणा येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.