अकोला ः राज्यात सध्या सोयाबीन उत्पादकतेचा (Soybean Productivity) मुद्दा चर्चेला आलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अमेरिका व इतर देशांच्या तुलनेत आपली कमी उत्पादकता (Low Yield Of Soybean) अधोरेखित करीत कृषी विद्यापीठांच्या कामगिरीवर बोट ठेवले होते. त्यानंतर हा विषय गाजत आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रत्यक्षात सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) घेणाऱ्या शेतकऱ्यांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नवीन तंत्रज्ञान, नवे वाण शेतकऱ्यांना हवे आहेत. आपणही स्पर्धा करू शकतो, असा ठाम विश्वास या शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.
निंभारा येथील प्रयोगशील शेतकरी गणेश नानोटे म्हणतात, ‘‘ मी एकूण क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करतो. माझी उत्पादनाची सरासरी सहा ते सात क्विंटलपर्यंत आहे. एमसारखे तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध झाले तर जागतिक स्तरावरील उच्चांकी उत्पादनात स्पर्धा करण्यात आपला शेतकरी समर्थ आहे.’’
तामशी (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील तरुण शेतकरी गणेश काळे म्हणाले, ‘‘अमेरिकेसारखा देश ३० क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन घेते. आपण सरासरी पाच ते सहा क्विंटलच्या पुढे जात नाही. नवनवीन वाण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घेणे आवश्यक आहे. मी दरवर्षी ३० ते ३२ एकरात सोयाबीनची लागवड करीत असतो. सरासरी एकरी पाच ते सहा क्विंटलचा उतारा आहे.’’
वाशीम जिल्ह्यातील शेलू खडसे येथील प्रयोगशील शेतकरी विष्णू खडसे म्हणाले, ‘‘गेल्या हंगामात ९३०५ या वाणापासून एकरी ९ क्विंटलपर्यंत उतारा आला. त्यामुळे यंदाही याच वाणाची लागवड केली आहे. यावर्षी आठ एकरांत टोकण केली. वाढलेला खर्च पाहता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची खूप गरज आहे.’’
मंगरूळ नवघरे (जि. बुलडाणा) येथील शेतकरी तथा सोयाबीन उत्पादनात देशपातळीवर सन्मान झालेले विजय अंभोरे म्हणाले, ‘‘सोयाबीन संशोधनाच्या बाबतीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेले कसबे डिग्रस संशोधन केंद्र (सांगली) आघाडीवर आहे. त्यांनतर मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) यांचा सोयाबीन संशोधनात नंबर लागतो.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कामगिरी सोयाबीन संशोधनात आंबा हा वाण सोडला तर फारशी चमकदार दिसत नाही.’’
कसबे डिग्रस येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद देशमुख यांच्या अथक प्रयत्नांतून त्यांनी मागील सहा, सात वर्षांत फुले अग्रणी, फुले कल्याणी, फुले संगम, फुले किमया तसेच आता इतर वाणापेक्षा दीड पट जास्त उत्पादन देणारे फुले दुर्वा हे अतिशय चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. मी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथे शेती करतो. सात आठ वर्षांपासून सोयाबीनचे चांगले उत्पादन काढत आहे. हे सर्व नवीन संशोधित केलेले वाण, विद्यापीठांनी दिले म्हणूनच शक्य झाले आहे. मागील वर्षी २०२० मध्ये मी केडीएस ७२६ फुले संगम या वाणाचे हेक्टरी ४५ क्विंटल उत्पादन घेतले. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, नवीन वाण हे शेतकऱ्यांपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोचलेले नाहीत.
’’मंत्र्यांचे विधान काळजी पूर्वक वाचले तर कृषी विद्यापीठांसोबत शेतकऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नकळतपणे प्रश्नचिन्ह उपस्थित तर केले नाही ना, असे वाटते. भारतीय शेतकऱ्यांची तुलना अमेरीकन शेतकऱ्यांशी करताना तेथील हवामान, जमिनीची सुपीकता, पायाभूत सुविधा, शेतीसाठी अमेरिकन सरकार देत असलेले भरघोस अनुदान याचाही विचार व्हायला हवा.प्रफुल्ल सुलताने, गुंज, ता. लोणार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.