कोल्हापूर : वाढत्या उन्हामुळे गुजरातमधील बाजारपेठांमध्ये (Gujarat Jaggery Market) ग्राहकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका गुळाला (Jaggery Procurement) बसत आहे. गुजरातमधील गूळ विक्री (Jaggery Sell) मंदावली आहे. जितका गूळ लागेल तितकीच मागणी (jaggery Demand) गुजरातमधून येत असल्याने कोल्हापूर बाजार समितीत गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. सध्या गुळास (Jaggery Rate) क्विंटलला ३७०० ते ४ हजार रुपयांपर्यंतच दर मिळत आहे.
गूळ उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात हे गूळ खरेदीसाठीचे राज्य आहे. गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचे संकट कमी झाल्याने गुजरातमधील बाजारपेठाही एकदम खुल्या झाल्या. याच दरम्यान विविध सण आल्याने गुळाला चांगला उठाव होता. परिणामी, गुळाची चांगली विक्री झाली. ज्या वेळी गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येतो त्या वेळी दर चांगला मिळतो असा गूळ बाजाराचा अनुभव आहे. पण यंदा उन्हाची तीव्रता वाढल्याने तेथील बाजारपेठांत दिवसभर अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे गुळासह अन्य शेतीमालाची उलाढालही मंदावली आहे.
गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने दर ४२०० ते ४३०० पर्यंत जाण्याची अपेक्षा होती, परंतु वाढते ऊन ग्राहकांच्या गूळ खरेदीला अडथळे आणत आहे. एप्रिलच्या पूर्वार्धापर्यंत गुळाचा दर ४२०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. यामुळे गुजरातेतून कोल्हापूर परिसरातील गूळ बाजाराकडे गुळाची मागणी वाढली होती. गेल्या पंधरा दिवसांत उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर गुजरात बाजारपेठेतील गूळ खरेदीचे प्रमाण कमी आले आहे. लग्नसराई वेगात सुरू आहे. लग्नामध्ये प्रामुख्याने साखरेचा वापर वाढत असल्याने गूळ खरेदी कमी प्रमाणात होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. साहजिकच जादा गूळ शिल्लक राहू नये यासाठी गुजरातमधील व्यापाऱ्यांनी आवश्यक इतक्याच गुळाची खरेदी सुरू ठेवली आहे.
सध्या कोल्हापूर बाजार समितीत गुळाची आवक होत असली तरी एक दिवस आड सौदे निघत आहेत. ज्या गुऱ्हाळ चालकाकडे मुबलक ऊस आहे ते गुऱ्हाळ चालक उसाचे गाळप करून गूळनिर्मितीला प्राधान्य देत आहेत. यामुळे थोड्या-थोड्या प्रमाणात कोल्हापूर बाजार समितीत गुळाची आवक सुरू आहे. पण गुजरातेतून विशेष मागणी नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये गूळ खरेदीसाठी स्पर्धाही कमी आहे. यामुळे मे महिन्यामध्ये जितका गुळाला दर मिळायला हवा होता तितका मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कोल्हापुरातील ९५ टक्के गूळ हंगाम संपला आहे. कर्नाटक प्रमाणे कोल्हापुरातही काही गुऱ्हाळचालक बारमाही गुळाचे उत्पादन घेत आहेत. यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात गुळाची आवक सुरूच असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
आवकेत घट होण्याची शक्यता
कोल्हापूर बाजार समितीत एक दिवसाआड चार ते पाच हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. या गुळाचे सौदे एक दिवसाआड ३७०० ते ४ हजार रुपयांपर्यंत निघत आहेत. आणखी पंधरा दिवसांमध्ये गुळाच्या आवकेत पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस तरी गूळ बाजार समितीत येईल, अशी शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.