Grape Export Agrowon
ॲग्रोमनी

जागतिक बाजारपेठेत द्राक्ष निर्यातीला मोठा वाव

भारतीय शेतीच्या अर्थव्यवस्थेत अन्नधान्य, भाजीपाला आणि फलोत्पादनाचे मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत. महाराष्ट्रात प्रगतिशील शेतकऱ्यांचे पीक म्हणून द्राक्षाला ओळखले जाते. त्यामुळे देशात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातून द्राक्ष निर्यात होते. मात्र त्यामध्ये वाढीला चांगली संधी आहे. भारतील द्राक्षांना विदेशात चांगली मागणी आहे. ही संधी साधण्यासाठी द्राक्ष लागवड आणि व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल? भारतीय बाजार नियोजन आणि निर्यात अधिक जोमाने कशी होईल, याचा घेतलेला आढावा...

टीम ॲग्रोवन

प्रा. केशव दास,

संशोधक व आंतरराष्ट्रीय व्यवसाय विकासक

भारतीय द्राक्ष बागायतदार जागतिक पातळीवर उत्पादकतेत अग्रेसर आहेत. आपले शेतकरी द्राक्षाचे हेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन घेतात. शेतकऱ्यांना निर्यात प्रोत्साहनासाठी द्राक्ष बागायतदार संघ, उद्योग संघटना, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, आदी संस्थांचा पाठिंबाही आहे. परंतु चिली, पेरू आदी देशांची द्राक्ष निर्यात ही भारतापेक्षा तिप्पट आहे. तीन दशकांच्या निर्यात अनुभवानंतरही, तसेच इतर पूरक गोष्टी उपलब्ध असून, ही भारत एकूण द्राक्ष उत्पादनाच्या फक्त आठ टक्के निर्यात करतो. देशात सरासरी २१ लाख टन द्राक्ष उत्पादन होते. जागतिक क्रमवारीत भारत सध्या नवव्या क्रमांकावरच रेंगाळलेला आहे. ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडते. भारतातील द्राक्ष उत्पादक बऱ्यापैकी अन्न सुरक्षा नियमावली पाळतात. महाराष्ट्र राज्याचा एकूण राष्ट्रीय द्राक्ष उत्पादनात ८० टक्के वाटा आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतच द्राक्ष उत्पादन केंद्रित झालेले आहे. जागतिक द्राक्ष उत्पादनाच्या क्रमवारीत भारत अग्रेसर असला, तरी निर्यातदारांच्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर राहणे आपणास भूषणावह नक्कीच नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा लागणार आहे.

थॉमसन सीडलेस द्राक्षे ही युरोपियन लोकांची पसंतीची द्राक्ष जात आहे. एकूण द्राक्ष निर्यातीत या द्राक्षांचा वाटा ५० टक्के आहे. युरोपियन संघामधील विविध देशांतील सरकार तसेच चोखंदळ ग्राहक हे नेहमीच उत्तम गुणवत्ता, एकाच आकारमानाची फळे, दर्जेदार पॅकेजिंग आणि अन्न सुरक्षा नियमाचे कोटेकोर पालनासाठी आग्रही असतात. भारतीय द्राक्ष बागायतदार जास्त उत्पादनाची परीक्षा तर आरामात उत्तीर्ण होतो, परंतु निर्यातीसाठी फक्त एवढीच गोष्ट पुरेशी नसते. द्राक्ष निर्यात योग्य करण्यासाठी आणखी काही कौशल्य अपेक्षित आहेत.

द्राक्ष उत्पादन आणि निर्यात एवढी गुंतागुंतीची का?

द्राक्ष उत्पादनाच्या बरोबरीने बागेतून काढणी केल्यानंतर द्राक्ष घडांची शास्त्रीय पद्धतीने वर्गवारी करणे, पॅकिंग करून थंड केल्यानंतर मोठ्या शीतगृहात निर्यातीसाठी तयार ठेवणे, इत्यादी प्रक्रिया कराव्या लागतात. यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. पुढे ही द्राक्षे वारंवार कौशल्यपूर्वक साठवून त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, परदेशी आयातदारांशी संपर्क साधणे, त्यांना द्राक्ष तपासणीसाठी बोलावणे, निर्यातीसाठी लागणारी कागदपत्रे तयार करणे आदी निर्यात व्यवस्थापनाची आवश्यक कौशल्ये द्राक्ष निर्यातीसाठी फार महत्त्वाची असतात. द्राक्ष पिकाची निर्यातीशी तुलना केल्यास वरील कौशल्यांमुळे निर्यात जरा जास्तच गुंतागुंतीची असते. सामान्य शेतकऱ्याला या सर्व बाबींची पूर्तता करणे थोडे कठीण असते.

ही गुंतागुंत कोण सोडवतो?

द्राक्ष निर्यातीच्या व्यापारात जोखीम जास्त आणि नफासुद्धा जास्त असतो. शेतकऱ्यांची द्राक्षे अन्न संचालन कंपन्या पुढील प्रक्रिया करण्यासाठी उचलतात आणि निर्यातीची संपूर्ण साखळी पूर्ण करतात. आपण महिंद्रा आणि महिंद्रा, सह्याद्री, टाटा समूह, युरोफ्रेश इत्यादी कंपन्यांविषयी ऐकलेच असेल. निर्यातीचे धनुष्य या कंपन्या योग्य पद्धतीने पेलतात आणि कार्यपूर्ती करतात. काही कंपन्यांची परदेशातही शीतगृहे असून त्या निर्यात व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा दुवा असतात.

द्राक्ष निर्यातीत विविध टप्प्यांवर झालेले मूल्यवर्धन

३५ टक्के

पॅकिंगकर्ते व निर्यातदार

०८ टक्के

विदेशी आयातदार

१० टक्के

पुरवठा आणि दळणवळणकर्ते

३२ टक्के

किरकोळ व्यापारी

१५ टक्के

उत्पादक शेतकरी

भारताच्या तुलनेत चिली, पेरू, दक्षिण आफ्रिका व इतर युरोपीयन देशांमधील आयातदार द्राक्ष उत्पादकांशी थेट व्यवहार करतात. या मूल्यसाखळीतील आयातदार व भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकरी यांची सांगड घातल्यास आपण अधिक नफा मिळवू शकतो, हे इतर देशांनी दाखवून दिले आहे. युरोपियन द्राक्ष आयातदार बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवून आहेत, ते याच कारणांमुळे.

भारतीय द्राक्ष उत्पादक हे उत्पादनात अग्रेसर आहेत मात्र बाजारपेठेतील स्पर्धा पाहता तेथे टिकून रहाण्यासाठी मोठे परीक्षण करण्याची गरज आहे. मूल्यसाखळीतील विविध घटकांचा तंत्रशुद्ध अभ्यास व सर्व घटकांची पुनर्मांडणी केली असता आपण निश्‍चितच घवघवीत यश संपादन करू शकतो. भारतीय भौगोलिक परिस्थिती तुलनात्मकदृष्ट्या भक्कम असून, पुढचा प्रवास हा अधिक योजनाबद्ध केल्यास भारतीय द्राक्ष बागायतदार निर्यातीत यशाचे शिखर गाठेल यात शंका नाही.

भारत आणि युरोपियन संघाच्या व्यापार चर्चेचे महत्त्व

द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असूनही भारत निर्यातीच्या यादीत नवव्या स्थावरून अव्वल स्थानावर कसा येऊ शकेल या संदर्भात आगामी भारत-युरोपियन युनियनमधील व्यापार चर्चा फार महत्त्वाची असेल. सद्य:स्थितीतील द्राक्ष व्यापाराची रचना आहे त्या क्रमवारीत न ठेवता त्यातील घटकांचा क्रम थोडासा नावीन्यपूर्णरीत्या बदलला तर द्राक्ष निर्यातीला प्रचंड चालना मिळेल. लेखात निर्देश केलेल्या मूल्यसाखळीमध्ये काही बदल करावे लागतील. थेट शेतकऱ्यांना जास्त फायदा कसा होईल, याला प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी विदेशी आयातदार, त्यांच्याशी निगडित संस्था, कंपन्या आदींचा थेट भारतीय द्राक्ष बागायतदार, अॅग्रीगेटर्स, बचत गट यांच्याशी संपर्क घडवून आणणे दोघांच्याही फायद्याचे ठरेल. विदेशी आयातदार भारतीय द्राक्षे अधिक खरेदी करतील आणि त्यांच्या देशातील फळे भारतात सोईनुसार पाठवितील. द्वीपक्षीय चर्चेत या सर्व गोष्टींचा तपशीलवार अभ्यास अपेक्षित आहे. उदा. सुझुकी या जपानी कंपनीने मारुतीसारखी मोठी कंपनी भारतात उभारण्यास मदत केली. यातूनच पुढे भारताचे जागतिक वाहन बाजारात चांगले नाव झाले आहे.

आयातदारांसाठी धोरणात्मक बदलांची गरज

भारतीय बाजारपेठेत १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा असून सुद्धा चोखंदळ विदेशी गुंतवणुकदार भारतात येण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. त्यांनी स्वतंत्रपणे केलेल्या पाहणीत जरी द्राक्ष बाजारपेठ खूप मोठी असली, शेतीमाल मुबलक उपलब्ध असला तरी फळ संकलन, छाटणी, शास्त्रोक्त पद्धतीने पॅकेजिंग, शीतगृहातील साठवणूक व नियोजनबद्ध वाहतुक सुविधा याविषयी भारतात खूप सुधारणा करण्यासारख्या आहेत.

पुढे होऊ घातलेल्या मुक्त व्यापार चर्चेत भारत सरकारकडून विदेशी आयातदार व निगडीत संस्थांना भारतीय बाजारपेठांत कर, जकात, उपकर इ. मुक्त प्रवेश देण्याविषयी साधकबाधक चर्चा/ करार करून तसे धोरण जाहीर करतील, ही अपेक्षा आहे. तसे केल्यास युरोपियन आयातदार कंपन्या भारतात द्राक्ष उत्पादक क्षेत्रात हरित गुंतवणूक करतील. त्यातून मूल्य साखळीतील थेट दुवा प्रस्थापित करतील. गरज आहे ती करमुक्त प्रवेशाचे 'गाजर' दाखवायची. बिगर हंगामी काळात भारतीय बाजारपेठ युरोपीय संघासाठी करमुक्त आणि खुली करण्यात यावी, हा परवाना फक्त काही ठरावीक हरित निवेशकांना भारतीय मूल्य साखळीत उपयुक्त भर घालण्यासाठीच असावा.

भारतीय बाजारपेठेला चांगली संधी ः

युरोपीय द्राक्ष हंगाम जून ते नोव्हेंबर या दरम्यान असतो. तर भारतीय द्राक्ष हंगाम डिसेंबर ते मे असा असल्यामुळे भारतीय द्राक्ष बागायतदारांना ही गोष्ट पूरक आहे. याचा फायदा दोन्ही बाजारपेठांना होऊ शकतो. सध्या विदेशी द्राक्षांवर आयात कर हा ४७ टक्के आहे. किरमिजी सीडलेस द्राक्षे ३२५ रुपये प्रति किलो दराने विकली जातात, ती २५० रुपयांपर्यंत भारतीय ग्राहकांना मिळू शकतील. याचप्रमाणे स्पॅनिश व इटालियन थॉमसन सीडलेस द्राक्षांनाही भारतीय स्थान मिळू शकेल. हंगाम आणि मागणी काळ वेगळा असल्यामुळे भारतीय द्राक्ष बागायतदार आणि त्यांचा विदेशी साथी हे एकमेकांस पूरक ठरू शकतील. भारतीय शेतीमालाला युरोपियन बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबिज करता येईल. फक्त गरज आहे ती काही गोष्टींचा धोरणात्मक पाठपुरावा करण्याची.

उत्तम गुणवत्ता व वेळेवर पुरवठा देण्यासाठी भारतीय द्राक्ष बागायतदार उच्च प्रतीची नवनवीन जातींची द्राक्षे कमी खर्चात उत्पादन करेल. निर्यात आणि विदेशी गुंतवणूकीतून अंदाजे दोनशे दशलक्ष अमेरिकन डॉलरचे परकीय चलन गुंतवणूक म्हणून भारतात येईल. मूल्य साखळीतील शेवटचा आणि महत्त्वाचा दुवा असलेला द्राक्ष उत्पादक हा आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

SCROLL FOR NEXT