cotton procurement
cotton procurement  
ॲग्रोमनी

कापसाच्या दरात सुधाराची चिन्हे

अनिल जाधव

पुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३०० ते ५०० रुपये दर कमी केल्याने व्यापारी शेतकऱ्यांना यापेक्षाही २०० ते ४०० रुपये कमी देत आहेत. असे असले तरी चांगल्या दर्जाच्या कापसाचे दर पाच हजारांच्या खाली जाणार नाहीत आणि पुढील दोन महिन्यांत सहा हजारांचा टप्पा गाठतील, असा अंदाज शेतीमाल बाजार विश्‍लेषक आणि जाणकारांनी व्यक्त केला.  दरम्यान, ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रांत कापसाला ५३०० ते ५५५० रुपायांपर्यंत दर मिळत आहे. खासगी व्यापारी ४५०० ते ५२०० रुपये दर देत आहेत. जागतिक पातळीवर यंदा कापूस उत्पादनात घट होणार आहे, हे विविध अहवालांतून स्पष्ट झाले.  

भारत, अमेरिका, ब्राझील आणि पाकिस्तान या जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांत उत्पादनात मोठी घट येईल, असे ‘कॉटलूक’ने जाहीर केले. डिसेंबरमध्ये जाहीर केलेल्या अहवालात जागतिक कापूस उत्पादन २३९ लाख ८४ हजार टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये २५८ लाख २६ हजार टन कापूस उत्पादनाचा अंदाज होता. चीनने २०२० मध्ये कापसाची आक्रमक खरेदी केली. तसेच इतर देशांनीही कापसाचा साठा करण्यावर भर दिला. अमेरिका आणि चीन यांच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या कापूस आयातीचा भारताला लाभ मिळू शकतो. देशात यंदा १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाल्यानंतर ४०० लाख गाठी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पावसाने झालेले नुकसान, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि बदलत्या वातारणामुळे उत्पादकतेत घट झाली. त्यामुळे ‘सीसीआय’ने देशात ३७० लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. 

कापूस बाजाराचे जाणकार गोविंद वैराळे म्हणाले, की बोंड अळीमुळे कापसाच्या गुणवत्तेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सध्या जवळपास ५० टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकला नाही. कापसाचा मुख्य खरेदीदार ‘सीसीआय’ आहे. परंतु कापसाच्या लांबीनुसार सरकारने जाहीर केलेला हमीभाव ‘सीसीआय’ विविध कारणांनी नाकारत आहे. ‘सीसीआय’ने दर कमी केल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनीही २०० ते ३०० रुपयांनी दर पाडले आहेत. तसे पाहिले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढलेले आहेत. जागतिक उत्पादन घटले आहे आणि देशांतर्गत कापसाची मागणी वाढली आहे. असे असतानाही कापसाची भाव कमी होण्यामागे ‘सीसीआय’ने हमीभावाला दिलेली बगल हे महत्त्वाचे कारण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढलेले असल्याने पुढील काळातही दर वाढतील.   अनुकूल घटक

  • देशांतर्गत कापूस उत्पादनात घट
  • घरगुती कापूस मागणी चांगली
  • अमेरिका, ब्राझील, पाकिस्तानमध्ये उत्पादन घटणार
  • खाद्यतेलातील तेजीमुळे सरकीला मागणी
  • युरोपातील लॉकडाउन शिथिल झाल्यास निर्यातीला संधी
  • चीन कापसाची आयात सुरूच ठेवण्याची शक्यता
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वाढलेले दर
  • बाजार आणखी सुधारण्याचे संकेत
  • प्रतिक्रिया कापूस उत्पादनाच्या आकड्यांविषयी सध्यातरी सांगता येणार नाही. परंतु देशात जेवढे उत्पादन अपेक्षित होते, त्यापेक्षा कमी उत्पादन होईल. कापसाचे दर हे ५ हजार रेंजच्या खाली जाणार नाहीत. कापूस उत्पादन आणि बाजाराची स्थिती बघता पुढील दोन महिन्यांत हे दर ६ हजारांपर्यंत जाऊ शकतात. - दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषक

    अमेरिकेतून होणारी कापूस निर्यात आजपर्यंत ३५ टक्के अधिक आहे. साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत ही निर्यात वाढत असते. तर चीनची आयात थांबेल असे वाटत नाही. भारतीय कापूस आजही ५ ते ७ टक्के डिस्काउंटला उपलब्ध असल्याने निर्यात बऱ्यापैकी वाढतच राहील असे वाटत आहे. खाद्य तेलामधील तेजीमुळे सरकीला मागणी देखील चांगली आहे. परंतु पुरवठ्याचा विचार केला तर बोंड अळी, पांढरी माशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुढील काळात उत्पादनाचे अंदाज कमी होईल, असे बोलले जात आहे.  - श्रीकांत कुवळेकर, शेतीमाल बाजार विश्‍लेषक

    थंडी पडल्यामुळे देशातील कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे देशात ३६० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. कापसाची देशांतर्गत मागणी ही मजबूत आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने निर्यात प्रभावित झाली आहे. काही युरोपियन देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन केल्यानेही कापूस निर्यातीवर परिणाम झाला आहे.  - अतुल गणात्रा, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT