वैशालीताईंनी तयार केला ‘गोधन' ब्रॅंड
वैशालीताईंनी तयार केला ‘गोधन' ब्रॅंड  
महिला

वैशालीताईंनी तयार केला ‘गोधन' ब्रॅंड

Sudarshan Sutaar

सोलापुरातील सौ. वैशाली कुलकर्णी यांचे वय वर्षे ६३. पोस्टातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांना निवृत्तिवेतनही मिळते. परंतु या वयातही विश्रांती न घेता त्यांनी देशी गाईचे संवर्धन केले. दूध, तूप, गोमूत्र अर्क तसेच विविध उत्पादनांची त्या निर्मिती करतात. भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) हे सौ. वैशाली विठ्ठल कुलकर्णी मूळ गाव. सोलापुरातील सात रस्ता परिसरात वैशालीताईंचे घर आहे. सन १९७६ च्या सुमारास जुनी अकरावी झाल्यानंतर वैशालीताईंना पोस्ट खात्यामध्ये नोकरी मिळाली. सरकारी नोकरी असल्याने घरच्यांनी नोकरी स्वीकारण्यास सांगितले. परंतु वैशालीताईंना आणखी शिकायचं होतं. पुढे लग्न झाल्यानंतर त्यांनी नोकरी बरोबर शिक्षणही सुरू ठेवले. त्यांचे पती विठ्ठल हे सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये नोकरीस होते. परंतू १९९५ च्या सुमारास ही मिल बंद पडली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी वैशालीताईंवरच आली. पण त्यातूनही त्यांनी बी.एस्सी. रसायनशास्त्र ही पदवी मिळवली. नोकरी बंद झाल्याने विठ्ठल कुलकर्णी यांनी भंडारकवठे येथील शेतीमध्ये पूर्णवेळ लक्ष देण्यास सुरवात केली. त्यांनी दोन मुली, एक मुलगा यांचे शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण केले. मुलींचीही लग्ने झाली. सध्या मुलगा पुण्यात प्रिंटिंगचा व्यवसाय करतो.

देशी गाईंचे संवर्धन गाईंच्या संवर्धनाबाबत वैशालीताई म्हणाल्या, की नोकरी आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचा लहान उद्योग असावा असे माझ्या मनात यायचे. सन २००६ मध्ये मी पोस्ट खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. थोडे दिवस घरी आराम केला. रसायनशास्त्रातील पदवी घेतल्याने  मला औषधेनिर्मिती विषय चांगला माहित होता. गेल्या काही वर्षात सेंद्रिय शेती, आयुर्वेदाला आलेले महत्व लक्षात घेऊन देशी गाईंच्या संगोपनाचा विचार सुरू झाला. पुर्वी आमच्या घरी गाई होत्या. माझ्या एका मुलीने पंचगव्य प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे मी देशी गाईंचे संवर्धन आणि शेण, मूत्रापासून उत्पादने विकसित करायचे ठरविले. त्यासाठी मी देखील विविध उत्पादनांच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. मी गोपालनास २०१२ साली सुरवात केली. दरम्यानच्या काळात गाईंचे संगोपन आणि उत्पादनांची माहिती, अभ्यास केला. टप्प्याटप्प्याने देशी गाईचे शेण, मूत्रापासून सौंदर्यप्रसाधने, साबण निर्मितीस सुरवात केली.

गोठ्यामध्ये पन्नास देशी गाई व्यवसायवाढीबाबत वैशालीताई म्हणाल्या, ‘‘मला स्वतःच्या आर्थिक ताकदीवर गोपालन आणि प्रक्रिया उद्योग सुरू करणे शक्य नव्हते. परंतु निर्धार पक्का होता. या दरम्यान, पंढरपुरातील श्री गोपाळ गोशाळेचे राधा गिरिधारीदास यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सहकार्याने  सोरेगाव येथे दोन एकर शेत जमीन भाडेतत्त्वावर घेतली. या भागात पुरेसे पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता आहे. सन २०१२ मध्ये गाईचा गोठा आणि प्रक्रिया उत्पादन सुरु केले. मला एका खासगी बॅंकेकडून कर्ज मिळाले. त्यातून गाई आणि प्रक्रिया यंत्रांची खरेदी केली. सुरुवातीला दहा खिल्लार गाई घेऊन शेण, गोमुत्रापासून प्रक्रिया उत्पादनाला सुरवात केली. सध्या माझ्याकडे ५० देशी गाई आणि १५ वासरे आहेत. प्रामुख्याने गीर, साहिवाल, देवणी गाईंचे मी संगोपन करते. गीर गाय सरासरी प्रतिदिन ८ ते १० लिटर, साहिवाल गाय ८ लिटर आणि देवणी गाय ४ लिटर दूध देते. तयार केला ‘गोधन' ब्रँड

  • वैशालीताईंना सुरवातीला प्रक्रिया उत्पादन आणि विक्रीमध्ये अडचणी आल्या. पण बदलत्या जगानुसार व्यावसायिक पातळीवर उतरण्याची तयारीही त्यांनी ठेवली. यातूनच उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘गोधन'' ब्रँड तयार केला. येत्या काळात या ब्रॅंडची त्या नोंदणी करणार आहेत.
  • दररोज १०० लिटर दूध उत्पादन होते. या दुधाचे पारंपरिक पद्धतीने शुद्ध तूप बनविले जाते. तीन हजार रुपये प्रति किलो दराने तूप विक्री होते.
  • शहरी ग्राहकांची गरज लक्षात घेऊन फुलझाडांसाठी शेणखताची अर्धा किलोचे पॅकेट तयार केले आहे. त्यास चांगली मागणी आहे. दरमहा सहा हजार रुपये शेणखत विक्रीतून मिळतात.
  • पंचगव्य आधारित साबण, फेसपॅक, धूप व अगरबत्ती, केशतेल, शाम्पू, सुगंधी उटणे अशी उत्पादनांची निर्मिती. यासोबत नस्य, दंतमंजन, पंचगव्य त्रिफळा चूर्ण आणि गोमूत्र अर्काचेही उत्पादन.
  • अगदी २५ रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतची विविध उत्पादने. ८ ते १० मि.लि.पासून २००, ५०० मि.लि.पर्यंत आकर्षक पद्धतीच्या पॅकेट, बाटलीबंद उत्पादनांची विक्री.
  • मिळवली राज्यातील बाजारपेठ वैशालीताईंनी देशी गोपालनातून सहा जणांना वर्षभर रोजगार मिळवून दिला  आहे. या शिवाय उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रतिनिधी ठेवले आहेत. अवघ्या चार वर्षांत त्यांनी सोलापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद भागातील बाजारपेठही मिळवली. देशी गाईची शुद्ध, गुणवत्तेची उत्पादने आणि स्वतः उत्पादन प्रक्रियेत लक्ष दिल्यामुळे  ग्राहकांना त्यांची उत्पादने पसंतीस उतरली आहेत. आज मजुरी, कच्चा माल अन्य खर्चासह सगळा खर्च जाऊन त्यांना दरमहा सरासरी वीस हजारांचा निव्वळ नफा मिळतो, असे त्या सांगतात. संपर्क ः सौ.वैशाली कुलकर्णी ः ७५८८५७३८०२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT