फळबागेसाठी शून्यमशागत तण व्यवस्थापन
फळबागेसाठी शून्यमशागत तण व्यवस्थापन 
कृषी सल्ला

फळबागेसाठी शून्यमशागत तण व्यवस्थापन

प्र. र. चिपळूणकर

प्रत्येक हंगामापूर्वी मशागतीनंतर पेरणी केली जाते. फळबागेत एकदा लागवडीनंतर जमिनीमध्ये मशागत तुलनेने कमी करतात अथवा करत नाहीत. शून्य मशागत तंत्राचा उपयोग फळबागेत जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यात फळे हे उत्पादन दर्जानुसार विकले जात असल्यामुळे शून्य मशागत व तण व्यवस्थापनातून सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता या तंत्राने करता येते. परिणामी या पद्धतीचे महत्त्व आणखी वाढते. उत्तम दर्जा मिळण्यासाठी कोणताही फळबागायतदार फळबागेला भरपूर सेंद्रिय खत वापरण्याचा प्रयत्न करतो. हंगामी पिकांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा फळबागायतदार अधिक अभ्यासू असावेत, असे माझे मत होते. मात्र, त्यांच्यावर परंपरागत तंत्राचा पगडा आहे. दरवर्षी २० ते ३० हजार रुपये शेणखतावर खर्च करणे, बागेत आंतरमशागत केलीच पाहिजे, बाग तणमुक्त असली पाहिजे अशा धारणांमध्येच शेतकरी गुंतलेला आहे. वास्तविक नैसर्गिक संकटांबरोबर तेजीमंदीच्या चक्रानेही फळबागधारक भरडून निघत आहेत. फळबागेमध्ये शून्य मशागत व तणव्यवस्थापन तंत्र थोडाफार दिलासा देऊ शकेल. माझ्या मते, फळबागेत आंतरमशागतीची अजिबात गरज नाही. उलट तण वाढवून त्याचे नियोजन करावे. तण वाढण्यासाठी पावसाळा हा सर्वात उत्तम हंगाम. त्यामुळे तणे वाढवता येतील, अशा प्रकारे बहाराची वेळ निवडावी. फळबागेमध्ये बहुतेक ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर होतो. परिणामी फक्त पावसाळ्यात मधल्या पट्ट्यात तण वाढविता येते. पावसाळ्यात तणे ७५ ते ९० सेंमीपर्यंत वाढवावीत. त्यानंतर औजाराने झोपवून, ती तणनाशकाने मारून टाकावीत. पावसाळ्यात बागेत कामे करण्यासाठी आवश्यक तेवढ्या वाटेवर आधीच तणनाशकांची फवारणी करून ठेवावी. म्हणजे बागेमध्ये फिरतेवेळी सापांची भीती राहणार नाही. नवीन फळबाग असल्यास पहिल्या २ ते ३ वर्षांमध्ये झाडांची आळी स्वच्छ ठेवावीत. या तंत्राचा असा होईल फायदा

  1. बागेला शेणखत किंवा सेंद्रिय खत विकत आणून टाकावे लागणार नाही. सघन लागवडीतही तणाचा पट्टा वाढविता येईल, असे अंतर ठेवावे.

  2. तणांची मुळे जमिनीची मशागत करून देतील. वाढीच्या अवस्थेत व पुढे मेल्यानंतर कुजत असता बागेची आंतरमशागत आपोआपच होईल. खर्च वाचेल.

  3. शेणखड्ड्यातील खत, २ ते ४ प्रकारच्या वनस्पतीचे व फक्त जमिनीवरील भागाचे खत या तुलनेमध्ये नैसर्गिकपणे उगवणाऱ्या अगणित तणांच्या प्रकारापासून तयार झालेले खत. त्यात जमिनीवरील पाने, खोड यासह जमिनीखालील मुळांचे उत्तम दर्जाचे खत अधिक चांगले मानले जाते.

  4. तणे तणनाशकांच्या साह्याने मारल्यानंतर त्यांची मुळे हळूहळू आकसू लागतात. जमिनीत लहान मोठ्या पोकळ्या तयार होतात. त्यात हवा खेळती राहते. ती जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी गरजेची असते.

  5. तणे पुढील दीर्घ काळ जागेवर कुजत राहिल्यास त्याचे भरपूर फायदे आहेत. कुजण्याच्या क्रियेमध्ये जिवाणूंद्वारे विविध वाढ संवर्धक संजीवकांची निर्मिती केली जाते. हा कारखाना मुळाजवळ सुरू राहतो. त्यात तयार होणाऱ्या सेंद्रिय आम्लामुळे सामू उदासीन (७ च्या आसपास) राहण्यास मदत होईल. जमिनीची क्षारता कमी होईल.

  6. कुजतेवेळी तयार होणाऱ्या डिंकासारख्या पदार्थामुळे बागेची निचरा शक्ती वाढेल. पोकळ्यातून पाणी लवकर निचरा झाल्यामुळे जलद वाफसा येईल.

  7. रासायनिक खते पिकांपर्यंत पोचण्यासाठी जिवाणू मदत करतात. सेंद्रिय खत भरपूर झाल्यामुळे जिवाणूंचे कार्य उत्तम प्रकारे चालते व रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

  8. जमिनीवर तणांच्या आच्छादनामुळे मूलस्थानी जलसंवर्धन, बाष्पीभवनाच्या वेगावर नियंत्रण, जमिनीच्या जलधारणा क्षमतेत वाढ होते. मोकळ्या जमिनीपेक्षा तणांच्या मुळांच्या जाळ्यात जास्त पाणी साठविले जाते. ते कोरडवाहू शेतीमध्ये जास्त उपयोगी राहू शकते.

  9. अतिरिक्त उपलब्ध अन्नद्नव्ये तणांद्वारे खाल्ल्यामुळे झाडांना आवश्यक संतुलित पोषणद्रव्ये उपलब्ध होतात. अतिरीक्त नत्र व खतांच्या वापरामुळे आकर्षित होणाऱ्या रोग किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. परिणामी कीडनाशकांच्या फवारण्याची संख्या कमी ठेवता येते. तणांशी स्पर्धा करून पिकांना गरजेची अन्नद्रव्ये मिळवावी लागत असल्याने ती अधिक सशक्त बनतात. ती जास्त काटक बनतात.

  10. उत्पादनाचा दर्जा चांगला राहिल्याने दर चांगला मिळू शकते. पर्यायाने उत्पन्नात वाढ होते.

वर नमूद केलेले तंत्र आंबा, डाळिंब, द्राक्ष, सीताफळ, मोसंबी, संत्रा, केळी अशा बहुतांश सर्व बागेत थोडेफार स्थानिक परिस्थितीनुसार बदल करून वापरता येतात. प्रथम थोड्या क्षेत्रावर प्रयोग करून आपल्या बागेसाठी तंत्र विकसित करून घ्यावे. सुरुवातीला काही अडचणी येतील. त्यावर उपायही शोधत राहावा. यातून येणाऱ्या अडचणी व त्या सोडवण्याचा सराव होत जाईल. त्यातून प्रचंड आत्‍मविश्‍वास विकसित होतो. असे झाल्यानंतर पूर्ण क्षेत्रामध्ये तंत्र लागू करण्याचे प्रयत्न करावेत. या तंत्रातून खर्चामध्ये बचत होण्यासोबत उत्पादन चांगले मिळते. दर्जा चांगला राहिल्याने दर चांगला मिळून उत्पन्नातही बऱ्यापैकी वाढ होते. या शेती तंत्रामध्ये अनेक कामे, पर्यायाने कष्ट कमी होतात. हे तंत्र वर्षानुवर्षे फुकटामध्ये जमिनी सुपीक करणारे आहे. हे वाचायला थोडे सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षामध्ये आपल्या डोक्याला भरपूर चालना देणार आहे. थोडक्यात, हे तंत्र जमिनीसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही आरोग्यदायी ठरणारे आहे.

उसासाठी शून्यमशागत तण व्यवस्थापनाविषयीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कापूस व तूर पिकांसाठी नियोजन ः कापूस व तूर विदर्भ, मराठवाड्यात सर्वात मोठे क्षेत्र असणारी व अर्थशास्त्राची महत्त्वाची पिके आहेत. ही दीर्घ कालावधीची (जवळपास दोन हंगामाचा) पिके असून, त्यांच्या दोन ओळीत जास्त अंतर (९० ते १८० सेंमी पर्यंत) ठेवले जाते. या पिकांची सुरुवातीची वाढ हळू असते. यामुळे मधल्या पट्ट्यात मूग, उडीद, सोयाबीन यासारखे मिश्र पीक घेण्याची प्रथा आहे. कापूस काकर मारून टोकण पद्धतीने तर तूर सरता लावून घरचे बी पेरले जाते. मिश्रपिकांच्या पेरणीसाठी संपूर्ण जमिनीची पूर्वमशागत करावी लागते. क्षेत्र, जमीन धारणा मोठी असल्याने जमिनीला सेंद्रिय खतांचा वापर तुरळक होतो किंवा होत नाही. सर्व जमिनीची पूर्वमशागत कोळपणी किंवा डवरणी, भांगलणी अशी पारंपरिक पद्धतीचा अवलंब होतो. बहुतांशी पिके कोरडवाहू असल्यामुळे परतीचे पाऊस कसे पडतात, त्यावर उत्पादकता अवलंबून असते. परिणामी सरासरी उत्पादन कमी. काहीवेळा नापिकीही सहन करावी लागते. या सर्व परिस्थितीमध्ये नव्या तंत्राच्या माध्यमातून सुधारणा करावयाची आहे. शक्य तितकी शाश्‍वतता आणावयाची आहे.

  • मिश्रपिकाचे उत्पादन लवकर मिळते. ते शेतकऱ्यांना आर्थिक बळ देत असल्याने मिश्रपिकाचे महत्त्व वादातीत आहे. तरीही शेतकऱ्यांनी अजिबात मिश्रपीक घेऊ नये, अशी सुधारणा मी सुचवतो. त्याऐवजी एकूण जमिनीची विभागणी करून मूग, उडीद, सोयाबीनसारख्या पिकांसाठी वेगळे आणि कापूस, तुरीसारख्या पिकांसाठी वेगळे क्षेत्र ठेवण्यास सुचवतो.
  • कापूस, तूर पिके १५० ते १८० सेंमी ओळीत घेऊन मध्ये ९० ते १२० सेंमीच्या पट्ट्यात तण वाढवावे, मोठे करावे. पावसाळ्याच्या शेवटी झोपवून तणनाशकाने मारून टाकावे. तणांच्या आच्छादनामुळे दीर्घ काळ ओलावा टिकून राहतो. तुरीला जास्त दिवस फुले व शेंगा लागून दाणे चांगले भरतील. दोन पावसांत खंड पडला तरीही पीक तग धरून राहील. तसेच कापसाला जास्त दिवस फुले, पात्या मिळतील. उत्पादनात वाढ मिळेल.
  • पारंपरिक पद्धतीत मिश्रपिकांमुळे संपूर्ण जमीन पूर्वमशागत, डवरणी व भांगलणी करावी लागते. इथे फक्त मिश्र पिकांच्या क्षेत्राची मशागत (हलकी एखाददुसरी वरवरची पाळी) करून पेरणी यंत्राने पेरणी करता येईल.
  • कापूस व तूर फक्त काकर मारून टोकण (डोबणे) पद्धतीने पेरणी करावी. कापसाचे बी महाग असल्याने टोकण केली जाते. तुरीचे घरचे असल्याने पेरणी नेहमीच दाट केली जाते.
  • हंगामाअखेर ९० ते १२० सेंमी झाडे वाढतात. तूर अगर कापूस हे वाव दिल्यास खूप वाढू शकतात. १५० ते १८० सेंमी वरील झाडे एकमेकांना भिडू शकतात. तशी ती वाढविण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तणांच्या पट्ट्यांचे फायदे फळबागेप्रमाणेच येथेही मिळतात. या व्यतिरिक्त कापूस व तूरीसाठी काही अधिक फायदे आहेत.
  • या दोन्ही पिकाखाली खूप मोठे क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा कोरडवाहू शेतीला कोणत्यातरी सरकारी योजनेतून किमान संरक्षित पाण्याची सोय केल्याशिवाय त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढणार नाही. अशा प्रत्येक क्षेत्रासाठी शेततळे, वीज, पंप, ठिबक अशा साधनांची उपलब्धता ही तुलनेने अशक्य गोष्ट आहे. वरील तंत्रज्ञानामध्ये तणाच्या मुळाच्या जाळ्यात इतके पाणी साठवले जाते की, पाऊस गेल्यानंतरही झाडांना गरजेइतका ओलावा पुढे ५० ते ६० दिवस मिळतो. पीक चांगल्या प्रकारे वाढून उत्पादन देत असल्याचा अनुभव काही शेतकऱ्यांनी कळवला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर व सरकारवरही एक रुपयाचाही बोजा पडत नाही. जमिनीला उच्च दर्जाचे सेंद्रिय खत मुबलक मिळते. वर्षानुवर्षे जमिनीची सुपीकता वाढत जाते. पुढील वर्षी तणाच्या पट्ट्यात पीक, पिकाच्या पट्ट्यात तणाचा पट्टा असे नियोजन करावे. दुसऱ्या वर्षापासून अत्यंत सुपीक जमीन मिळाल्याने पीक आणखी उत्तम येऊ शकेल. मुळात खर्च कमी झाल्यास नापिकी झाली तरी नुकसानीचे प्रमाण कमी राहते. प्रत्येक झाडाच्या पाण्याची सोय त्याच्याच मुळापाशी करणे या तंत्रातून शक्य होते. परिणामी कोरडवाहू क्षेत्रातही काही प्रमाणात तरी शाश्वतता आणता येते.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

    Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

    Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

    Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

    Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

    SCROLL FOR NEXT