फळमाशी नियंत्रणासाठी घरगुती सापळा
फळमाशी नियंत्रणासाठी घरगुती सापळा 
कृषी सल्ला

फळमाशी नियंत्रणासाठी घरगुती सापळा

डॉ. बी. बी. गायकवाड, डॉ. एच. एस. गरुड, डॉ. एस. व्ही. भावर

भारतामध्ये फळमाशीच्या सुमारे १६ प्रजातींची नोंद झाली असून, त्यापैकी दोन प्रजाती हंगामनिहाय फळांचे आणि फळभाज्यांचे नुकसान करतात. पेरू, आंबा, चिकू, द्राक्ष, अंजीर, डाळिंब, बोर, लिंबूवर्गीय फळे अशा फळांसोबत कलिंगड, दोडकी, काकडी, भोपळा, घोसाळी, तोंडली, कारली, पडवळ इ. वेलवर्गीय फळभाज्यांचे फळमाशीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वेळीच नियंत्रण न केल्यास ३० ते ४० टक्के फळांचे नुकसान होते. फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून, घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते. जीवनक्रम : चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि माशी. अंडी ः फळमाशीची मादी टोकदार अंडनलिकेच्या साह्याने फळांच्या सालीवर छिद्रे पाडून त्याखाली अंडी घालते. एका छिद्रात १ ते १५ अंडी असू शकतात. एक मादी एका महिन्याच्या कालावधीत सुमारे १५० ते २०० अंडी घालते. अंडी १ मिमी लांबीची आणि पांढऱ्या रंगाची असतात. ही अंडी हवामानापरत्वे एक आठवड्यात उबतात. अळी ः अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिवळसर रंगाच्या व मागील बाजूस निमुळत्या असतात. त्यांना पाय नसतात. अळ्यांची वाढ एक ते तीन आठवड्यांत पूर्ण होते. अळीचा कालावधी उन्हाळ्यात व पावसाळ्यात ६ दिवस असतो. परंतु, तापमान कमी असल्यास तो २९ दिवसांपर्यंत वाढू शकतो. पूर्ण वाढलेल्या अळ्या फळाला छिद्रे पाडून बाहेर पडतात. जमिनीवर खाली पडून जमिनीत ८ ते १६ सेंमी खोलीवर कोषावस्थेत जातात. कोष ः कोष रेशमी कवचाचे आणि दोन्ही बाजूस निमुळते असतात. त्यांचा रंग पिवळसर तांबूस असतो. कोषावस्थेचा कालावधी उन्हाळ्यात ६ दिवस, तर तापमान कमी होत गेल्यास ४४ दिवसांपर्यंत वाढतो. जमिनीत कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यानंतर त्यातून माश्या बाहेर पडतात आणि पुढे अंडी घालण्यास सुरू करतात. अशा प्रकारे जीवनक्रमाचा कालावधी छोटा असल्यामुळे हवामानानुसार आणि फळांच्या उपलब्धतेनुसार फळमाशीच्या वर्षभरात अनेक पिढ्या तयार होतात. ही कीड जवळपास वर्षभर आढळून येते. मात्र, मोठ्या प्रमाणावर मे ते जुलै या कालावधीत आढळते. वर्षभर फळांची उपलब्धता असल्याने फळमाशींचा प्रादुर्भाव सुरू राहतो. नुकसानीचा प्रकार : या अळ्या फळातील गर खातात. कीडग्रस्त फळे सडून पडतात. मादीने अंडी घालण्यासाठी फळांच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून फळांत सूक्ष्म रोगकारक घटकांचा शिरकाव होतो, त्यामुळे संपूर्ण फळ सडून जाते. बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात. पण, आतून सडलेली असतात. फळे परिपक्व होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे स्थानिक अथवा निर्यातीसाठी विक्री करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जपान, युरोपियन देशांमध्ये आंबा निर्यात करण्यापूर्वी या किडींच्या नियंत्रणासाठी उष्ण वाफेची प्रक्रिया करावी लागते. नियंत्रणाचे उपाय : १. बागेत झाडाखाली जमीन हिवाळ्यात नांगरावी, कुदळणी करावी किंवा चाळून घ्यावी. यामुळे सुप्तावस्थेतील कोष उघडे पडून नष्ट होतील किंवा पक्षी वेचून खातील. २. बागेत झाडांखाली पडलेली फळे आणि फळमाशी कीडग्रस्त फळे गोळा करून खोल पुरून नष्ट करावीत. प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ३. फळमाशीचा प्रादुर्भाव फळे पक्व झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणावर होतो. फळे पूर्ण पक्व होण्यापूर्वी थोडी अगोदर काढावीत. ४. फळमाशीच्या नरास आकर्षित करणाऱ्या मिथील युजेनॉल व क्यूलुअर सापळ्याचा बागेत वापर करावा. फळमाशीसाठी सापळा ः फळमाशीचे नर आणि मादी कोषातून बाहेर पडल्यानंतर मादीला जननक्षम होण्यासाठी किमान एक ते दोन आठवडे लागतात. फळमाशीचे नर मात्र लवकर जननक्षम होतात. त्यांना जगण्यासाठी ठरावीक प्रकारचे खाद्य लागते. हे खाद्य ठरावीक वनस्पतींच्या फुले, फळे, पाने किंवा काही बियांमध्ये आढळून येते. अशा खाद्याच्या गंधाकडे फळमाशीचे नर आकर्षित होतात. तुळशीच्या पानामध्ये, फुलांमध्ये आणि बियांमध्ये नराला आकर्षित करणारी रासायनिक द्रव्ये असल्याचे आढळून आले आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी मिथील युजेनॉल किंवा क्यूल्युअरसारख्या रासायनिक द्रव्याचा वापर करण्याचे शास्त्र त्यातून विकसित केले आहे. या द्रव्याचा उपयोग करून सापळे तयार केले जातात. फळमाशांना आकर्षित करण्यासाठी मिथील युजेनॉल किंवा क्यूल्युअर हे रासायनिक द्रव्य वापरावे. रुंद तोंडाच्या बाटलीमध्ये किंवा जाळीदार डब्यात सापळा तयार करावा. त्यामध्ये लोखंडी तारेला किंवा खिळ्याला कापडी वात गुंडाळून बोळा तयार करावा. तो बोळा मिथील युजेनॉलच्या द्रावणात बुडवून ठेवावा किंवा त्यावर २-३ मिलि द्रव्य ओतून त्यामध्ये चांगले मुरवावे. या गंधाकडे फळमाशी आकर्षित होऊन सापळ्यामध्ये अडकते. फळमाशीच्या नियंत्रणास मदत होते. डॉ. बी. बी. गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ ः कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT