गेल्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.
नाशिक, पुणे विभागांमध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण वगळता पावसाची शक्यता जवळजवळ नाही.सांगली भागामध्ये कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, पाचगाव, माळवा या भागांमध्ये येत्या रविवारी व त्यानंतर एक-दोन दिवस वातावरण ढगाळ होईल. अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे.सोलापूर विभागामध्ये सोलापूर, नान्नज, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, तांदुळवाडी, होटगी, अक्कलकोट व जवळपासच्या भागामध्ये वातावरण ढगाळ होऊन, रविवार ते बुधवारपर्यंत रिमझिम किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे.तापमान सर्वच भागामध्ये दुपारी ३०-३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील, तर पहाटेचे तापमान १५-१८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. वरील वातावरणाचा अंदाजानुसार ज्या ठिकाणी ढगाळ व पावसाचा अंदाज आहे, अशा ठिकाणी भुरी वाढण्याची शक्यता दिसते. त्याच्या नियंत्रणासाठी मागील आठवड्यामध्ये सुचवल्याप्रमाणे सल्फर (८० डब्ल्यूजी) ५०० ते ८०० ग्रॅम प्रतिएकर फवारावे.नुकतीच सल्फरची फवारणी झालेली असल्यास ट्रायकोडर्मा किंवा बॅसीलस सबटिलिस हे जैविक नियंत्रक घटक भुरीच्या नियंत्रणासाठी फवारावे. या वर्षीच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये झालेल्या सर्व प्रात्यक्षिकांमध्ये ज्या ठिकाणी फळधारणेनंतर सल्फर आणि जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, अॅम्पिलोमायसीस, बॅसिलस सबटिलीस फवारलेले होते, त्या ठिकाणी आज भुरी चांगल्या प्रकारे नियंत्रित झालेली दिसते.सध्याच्या वातावरणामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी कटाक्षाने टाळावी.नाशिक, पुणे विभागातील ढगाळ वातावरण राहणार असले तरी पावसाची शक्यता नाही. अशा वेळी भुरीसाठी करावयाच्या फवारण्या शेतकऱ्यांनी घडावर कागद चढवण्यापूर्वी करून घ्याव्यात.