मोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत. वनोत्पादनामध्ये मोह अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून, तो औषधी आणि व्यावसायिक उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. त्याला हिंदी व इंग्रजीमध्ये महुआ या नावाने ओळखले जाते.
मोहाची फुले खाण्यायोग्य असून, त्यात मोठ्या प्रमाणात शर्करा, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळतात. गोडीमुळे फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारा पदार्थ म्हणूनही होतो. आदिवासी समाज त्वचारोग, डोकेदुखी, पित्त आणि दमा यावरील उपचारामध्ये फुलांचा वापर करतात. स्तनदा मातांच्या दुधात वाढीसाठी फुलांचा रस पूरक म्हणून दिला जातो.
फुलांची संरचना आदिवासी भागामध्ये मोहाच्या फुलांचा वापर गोडी आणण्यासाठी आणि मद्याच्या निर्मितीसाठी केला जातो. फुलांमध्ये सी जीवनसत्त्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे. त्यात कॅरेटिन असून अ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. फुलांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस अशी खनिजे, काही प्रमाणात प्रथिने आणि मेदही असतात. अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलामध्ये जिवाणुरोधक, कृमिघ्न, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे पुढे आले आहे. मोहाचे पारंपरिक उपयोग मोहाच्या झाडाला वर्षातून एकदा, साधारणपणे मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये फुले येतात. पक्व झाल्यानंतर फुले झाडापासून गळून पडतात. ताज्या फुलांमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अर्बीनोज आणि काही प्रमाणात माल्टोज, ऱ्हामनोज हे घटक असतात. त्यांची चव गोड असते. पारंपरिकरीत्या ताजी फुले झाडाखालून गोळा करून, ती सरळ सूर्यप्रकाशामध्ये दोन ते तीन दिवस वाळवली जातात. सामान्य वातावरणामध्ये पोत्यामध्ये साठवून ठेवली जातात.
औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये मोहाच्या फुलांचा वापर शीतकरणासाठी, वातनाशक, दुग्धवर्धक, स्तंभक म्हणून केला जातो. फुलांचा रस - यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टॉनिक म्हणून उपयुक्त. दाह होत असलेल्या त्वचेवर चोळल्यास गुणकारी. डोळ्यांच्या रोगामध्येही उपयुक्त. रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर. पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी याचे नस्य केले जाते. फुलांची भुकटी - फुलांची भुकटी हगवण, बृहदांत्र शोथावर स्तंभक म्हणून वापरली जाते. कच्ची फुले - स्तनदा मातांच्या दुधामध्ये वृद्धीसाठी उपयुक्त. भाजलेली फुले - कफ, खोकला आणि दम्यासाठी वापरली जातात. वंध्यत्व आणि दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो. तुपामध्ये तळून फुलांचा वापर मूळव्याधीच्या उपचारामध्ये केला जातो.
मोहाच्या फुलांचे मूल्यवर्धन बेकरी उत्पादनामध्ये ताज्या फुलांचा रस संपृक्त स्वरूपामध्ये स्वीटनर म्हणून वापरला जातो. ताज्या फुलांच्या गरापासून प्युरी आणि सॉस बनवता येतात. पक्व फुलांच्या गरापासून मध्यम आर्द्रतेचे जॅम, जेली, मार्मालेडसारखे पदार्थ तयार करता येतात.
मोहाचे लोणी
मोहाचे तेल व पेंड
ई-मेल -ramabhau@gmail.com (माजी संचालक, केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (सिफेट), लुधियाना, पंजाब.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.