गोदावरी नदीकाठी असलेले व स्वच्छ, सुंदर करंजगाव
गोदावरी नदीकाठी असलेले व स्वच्छ, सुंदर करंजगाव  
ग्रामविकास

स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगाव

मुकुंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात नवी ओळख तयार करीत आहे. गावातील सर्व घटक गट-तट, भाऊबंदकी, जाती-धर्म विसरून गावाच्या प्रगतीसाठी एकत्र झटतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारर्निर्मिती अशा विविध क्षेत्रांत गावाने विधायक उपक्रम हाती घेतले आहेत. याच धर्तीवर ‘स्मार्ट ग्राम’ अशी ओळखही नावारूपास आली.   ग्रामस्थांची वज्रमूठ गोदावरी काठी असल्याने १९६९ सालच्या महापुरात गाव विस्थापित झाले. स्आपलं गाव इतरांपेक्षा वेगळं असावं, शक्य तेवढ्या पूरक सुविधा गावात असाव्यात या ध्येयाने पछाडून सर्वांनी कामास सुरवात केली. ग्रामपंचायतीला सक्षम महिला नेतृत्व लाभले आहे. सरपंच सौ. सोनाली राजेंद्र राजोळे, उपसरपंच सौ. मीरा नवनाथ पिठे या गावाचा कारभार पारदर्शकपणे हाताळतात. ग्रामपालिका सदस्य, ग्रामसेवक प्रमोद खैरनार यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभते. होणाऱ्या प्रत्येक ग्रामसभेत महिला आपली मते मांडतात. स्वच्छ पाणी व आरोग्य गावाच्या सभोवताली मुबलक पाणी उपलब्ध आहे. पण सर्वांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जलसुराज योजना राबविली आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र नळजोडणी असून, २.२५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन स्वतंत्र टाक्या आहेत. निर्जंतुकीकरण प्रक्रिया करून प्रत्येक कुटुंबाला पाणी वितरित होते. यामुळे गेल्या पाच वर्षांत कुठलीही रोगराई गावात झालेली नाही. त्यामुळे आरोग्याचा स्तर उंचावला असून, राज्य शासनाने ग्रामपालिकेस ‘चंदेरी कार्ड’ सन्मान प्रदान केला आहे. पुढचा टप्पा म्हणजे ग्रामपालिकेने एका खासगी कंपनीकडून ‘सीएसआर’ फंड मिळविला आहे. यातून ‘आरओ’ युनिट उभारले जात आहे. यातून प्रत्येकाला पाच रुपयांमध्ये २० लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. पडीक जमिनीवर वृक्षसंपदा हरित संपन्न गावाच्या निर्मितीसाठी गाव सदैव प्रयत्नशील आहे. गावकऱ्यांनी पडीक जमिनीवर २० हजार झाडांची लागवड केली आहे. यात चिंच, जांभूळ, पेरू, आंबा, बदाम, सिल्व्हर ओक व बांबू यांची लागवड केली आहे. पुढील काळात पर्यावरण संवर्धनासह झाडांपासून आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे. गावात लोकसंख्येच्या चार पट वृक्षारोपण करण्यात आले असून, प्रत्येक घरासमोर किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे. ‘एक व्यक्ती - एक झाड’ अशी संकल्पना गावाने राबविली आहे. गावाबाहेर पडीक रानावर ‘आमराई’ साकारली आहे. दारूबंदीचा ठराव गावात दारूविक्रीवर बंदी आणण्यासाठी तत्कालीन सरपंच खंडू माधव बोडके व सौ. मनीषा प्रवीण राजोळे यांनी प्रयत्न केले. दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देत दारूबंदीचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. सुविधायुक्त ग्रामपालिका कार्यालय करंजगाव ग्रामपालिकेचे कार्यालय सर्व सुविधांनी युक्त आहे. सर्व कामे संगणकीकृत होतात. दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्र बसविले आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बैठकीसाठी सभागृह तसेच ग्रामस्थांसाठी छोटे प्रतीक्षालय आहे. कार्यालय सीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली आहे. कार्यालयातून दिला जाणारा प्रत्येक दाखला संगणकीकृत असतो. भ्रष्टाचार निर्मूलन प्रकरणे, लोकशाही दिन, ग्रामस्थांची सनद, वृक्ष लागवड, दवंडी व मासिक आणि ग्रामसभेच्या नोंदीसाठी विषयनिहाय नोंदवह्या ठेवल्या जातात. अर्थसंकल्पही सादर होतो. सामाजिक कार्यक्रमात पुढाकार गावात विविध जातिधर्मांचे लोक राहतात. त्यामुळे दिंडी सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचने, वैचारिक व्याख्याने यांचे आयोजन होते. ग्रामपालिका मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करते. उत्पन्नातील ५ टक्के टक्के वाटा अपंगांसाठी निधी म्हणून वापरला जातो. ऐतिहासिक गाव   करंजगावच्या उत्तरेला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. जागतिक कामगार चळवळीच्या इतिहासात योगदान देणाऱ्या कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे जन्मगाव म्हणून करंजगाव ओळखले जाते. गोदाकाठी रामायणाच्या आख्यायिकेत गावाचा उल्लेख होतो. या गावात प्राचीन सिद्धेश्वराचे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग तसेच गावास पर्यटन स्थळ म्हणून ‘क’ वर्ग दर्जा आहे. गावात खंडोबाचे मंदिर असून, त्यास प्रतीजेजुरीचा मान आहे. गौतम ऋषींचे पुत्र करंज ऋषी यांची समाधी आहे. यावरून गावाचे नाव ‘करंजगाव’ असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पेशवेकालीन गढी, प्राचीन मंदिरे व नदीपात्रातील शिवालये इतिहासाची साक्ष देतात. स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन 

  • सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारी
  • संपूर्ण गावभर भूमिगत गटारांचे जाळे
  • घरातील सांडपाणी गटारींद्वारे गावाबाहेरील तलावात संकलित होते. त्यामुळे दुर्गंधी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव नाही.
  • तलावातील संकलित सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी दगडी पिचिंग. यात मासे सोडले आहेत. सांडपाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यात येतो. हे पाणी पडीक रानावरील झाडांना दिले जाते.
  • गावातील शाळा, अंगणवाड्या या ठिकाणी परसबागांची निर्मिती. शेवगा, पेरू, तुळस यांची लागवड.
  • गाव हागणदारीमुक्त. विविध ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे.
  • प्रत्येकाकडे शौचालय.
  • चौदाव्या अर्थ आयोगाच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला मोफत ‘डस्टबिन’. सुका व ओला यामध्ये त्याचे वर्गीकरण. गावाबाहेर खड्ड्यात साठवून कंपोष्ट खतनिर्मितीचा ग्रामपालिकेकडून प्रयत्नशील
  • स्वच्छतेचे महत्त्व समजावे यासाठी भित्तिचित्रातून प्रबोधन व जनजागृती
  • गाव सुंदर व स्वच्छ होण्यासाठी कामे

  • विविध देवतांची मंदिरे व मशीद.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान
  • गावातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण जनसुविधा योजनेअंतर्गत.
  • गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड. जनावरांपासून बचाव होण्यासाठी तारेच्या संरक्षक जाळ्या.
  • प्रत्येक घरासमोर शोभिवंत रोपे, फुलझाडे व फळझाडांची लागवड
  • ठक्कर बाप्पा, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण, सभागृहे, समाजमंदिरे
  • इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलांची उभारणी
  • चौक सुशोभीकरण, विविध ठिकाणी एकसारखे रंगकाम करून सौंदर्यात भर
  • डिजिटल शिक्षण व्यवस्था

  • माध्यमिक शिक्षणापर्यंतची सुविधा. ‘मविप्र’चे जनता माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळा, एक वस्तीशाळा व बालकांसाठी एकूण चार अंगणवाड्या. सर्व शाळा डिजिटल
  • मुलांचे कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध सुविधा
  • राजोळे वस्तीवरील शाळेचा कृतिशील स्वयंअध्ययन प्रकारात ‘ज्ञानरचना’ प्रकल्पात तालुक्यात प्रथम क्रमांक
  • पालक-शिक्षक संवाद उपक्रमही राबविला जातो.
  • शाळेत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग यंत्र ग्रामपालिकेने दिले आहे.
  • महिला सबलीकरण

  • गावात एकूण ३६ बचत गटांची निर्मिती. महिलांसाठी दोन ग्रामसंघ
  • प्रत्येक बचत गटाला आदर्श महिलांची नावे.
  • प्रत्येक बचत गटाचा आर्थिक व्यवहार बँकेमार्फत. त्यामुळे महिला संघटित झाल्या असून, त्यांच्यात आर्थिक साक्षरता व उद्योजकता रुजली.
  • रोजगारनिर्मिती बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यसाठी ग्रामपालिकेकडून व्यावसायिक तत्त्वावर व्यापारी गाळ्यांची निर्मिती. गरजेनुसार ते भाडेतत्त्वावर उपलब्ध. त्यातील उत्पन्नातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपालिका प्रशासन प्रयत्नशील. युवक कल्याण

  • युवकांसाठी विविध व्याख्याने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
  • व्यायामशाळा
  • गावातील गोदावरी नदीवर बोटिंग क्लब.
  • करंजगावची वैशिष्ट्ये

  • एकूण क्षेत्रफळ : १४५९ हेक्टर
  • एकूण लोकसंख्या : ५२५० -
  • दुतर्फा झाडे
  • सिमेंट काँक्रिटीकरण केलेले पक्के रस्ते
  • पाणीपुरवठा व्यवस्था
  • गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था
  • आरोग्यासाठी पुढाकार
  • स्वच्छ व सुंदर परिसर
  • श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
  • महिला सक्षमीकरण
  • कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, गुटखाबंदी, दारूबंदी व प्लॅस्टिकबंदी,
  • गावातील नागरिकांची १०० टक्के आधार कार्ड नोंदणी
  • विविध शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी
  • सन्मान

  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय स्तरावर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा- सर्वोत्कृष्ट कामगिरी पारितोषिक सन २०१२-१३ (५० हजार रु. )
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्पर्धांतर्गत प्रथम पारितोषिक सन २०१३-१४ (५ लाख रु.)
  • विभागीय स्तरावर हेच प्रथम पारितोषिक - सन २०१५-१६ ( १० लाख रु.)
  • फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती स्वच्छता पुरस्कार - सन २०१४-१५ जिल्हा स्तर - द्वितीय क्रमांक ( २ लाख रु.)
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकसहभाग विशेष राज्यस्तरीय पुरस्कार - सन २०१६ (३ लाख रु.)
  • स्वच्छ स्मार्ट ग्राम – सन २०१६-१७ तालुका स्तर ( १० लाख रु.)
  • प्रतिक्रिया  गावासाठी नावीन्यपूर्ण योजना, उपक्रम राबविण्यासाठी आमचा पुढाकार असतो. गाव स्वयंपूर्ण, सुंदर बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. गावाच्या विकासात ग्रामस्थ, सदस्य, ग्रामसेवक व शासन यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. - सौ. सोनाली राजेंद्र राजोळे - ९६८९७९७३१९ सरपंच, करंजगाव  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT