पालापाचोळा बागेतच कुजविल्याने भूसभुशीत झालेली जमीन दाखविताना सुरेश बन्ने.
पालापाचोळा बागेतच कुजविल्याने भूसभुशीत झालेली जमीन दाखविताना सुरेश बन्ने.  
फळबाग

शून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष बाग

Abhijeet Dake

गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश राचमंद्र बन्ने यांनी नियोजनपूर्वक कष्ट आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून द्राक्षाची बाग फुलवली. वेलीच्या गरजेइतके पाणी व्यवस्थापन आणि शून्यमशागतीचे धडे गिरवत त्यांनी द्राक्ष बागेतून दर्जेदार उत्पादन घेण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

तासगाव तालुका हा तसा दुष्काळी भाग. ना पुरेसा पाऊस, ना पाणी... यामुळं शेती हे या भागातील मोठे आव्हान. तशी आमची तीन एकर जिरायती शेती. त्या जमिनीत काय लागवड करायची? हा प्रश्‍न होताच. पावसावर हंगामी पिके घेत होतो. माझ्या हातात कला होती. या कलेतून मी शिलाई काम सुरू केले. त्यातून आर्थिक सुबत्ता मिळण्यास सुरवात झाली. खडतर प्रवास सुरू होता. या भागात द्राक्षाची सुरवात झाली. माझ्या मित्र मंडळींनी द्राक्ष बागा लागवडीस सुरवात केली. त्यांचे बागेतील कष्ट मी पहात होतोच. या शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता पाहून मलादेखील असं वाटलं आपणही द्राक्ष बागायतदार व्हावं. पण त्याचं नियोजन कसं करायचं ? असा प्रश्न डोळ्यासमोर होता. मी द्राक्षबागेची माहिती घेऊ लागलो... द्राक्ष बाग उभारण्यामागची पार्श्वभूमी सुरेश बन्ने सांगत होते.

द्राक्ष बागेची लागवड द्राक्ष लागवडीबाबत बन्ने म्हणाले, की मी कूपनलिका घेतली, पाणीदेखील लागलं. १९९९ च्या दरम्यान, १५ गुंठे क्षेत्रावर द्राक्षाच्या सोनाक्का जातीची ओनरूट वर लागवड केली. मित्रांचा सल्ला घेत योग्य बाग व्यवस्थापनातून उत्पादन सुरू झालं. पण संकटं काही पाठ सोडत नव्हती. पाणी कधी उपलब्ध व्हायचं. कधी कमी पडायचं. बाग लावल्यानंतर परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली. या दरम्यान पंढरपूर येथील वासुदेव गायकवाड यांची द्राक्ष शेती पाहण्याचा योग आला. त्यांच्याकडे जाऊन शेती करण्याची पद्धती आणि काटेकोर नियोजन आत्मसात केले. द्राक्ष शेतीचा अभ्यास झाल्यानंतर आणखी वीस गुंठे क्षेत्रावर रूटस्टॉकवर सोनाक्का जातीची लागवड केली.  शून्य मशागत शेतीची पाहणी आणि माहिती घेतल्यामुळे शेती करण्याचा उत्साह वाढला. सुरवातीपासूनच ठिबक सिंचनाचा वापर करण्यास सुरवात केली. माझी १५ गुंठे ओनरूट पद्धत आणि २० गुंठे रूटस्टॉक पद्धतीने लावलेली बाग आहे. आज ओनरूटवरील बाग सतरा वर्षांची आहे. परिसरातील शेतकरी म्हणतात, की ही बाग काढून दुसरी करा. पण मी त्यांना सांगतो, की आज ही  बाग मला गोड रसाळ, द्राक्ष देते. चांगले उत्पन्न मिळते. कमी क्षेत्रात अपेक्षित उत्पादन मिळत असेल तर खर्च का वाढवायचा ? विनामशागत पद्धत वापरल्याने मजूर, आंतरमशागत आणि रासायनिक खतांमध्ये सुमारे ५० टक्के खर्च कमी होतो. याचाच अर्थ असा की, खर्चात बचत म्हणजे उत्पन्नात ५० टक्के वाढ. हे सूत्र मी कायम डोळ्यासमोर ठेवले आहे. मला दरवर्षी दहा टन उत्पादन मिळते. आंध्रप्रदेशातील व्यापारी बागेतून द्राक्ष खरेदी करतात, त्यामुळे योग्य दर मिळतोय.

शून्य मशागत तंत्राचा अवलंब जमीन सुपीकता आणि पाणीबचतीवर बन्ने यांनी लक्ष केंद्रीत केले. याबाबत ते म्हणाले, २००८ च्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांची भेट झाली. त्यांच्या सल्‍ल्यानुसार विनामशागत शेती करण्याचे धडे गिरवण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून तणाचा वापर शेतातच केला पाहिजे, त्यामुळे जमीन सुपीक बनते, अशी माहिती मिळाल्यानंतर मी गेल्या आठ वर्षांपासून माझ्या बागेतील तण न काढताच तसेच ठेवण्यास सुरवात केली. तण पुरेसे वाढल्यानंतर शिफारशीत तणनाशकाचा वापर करून तण मारून जागेवरच कुजवतो. तणांचा योग्य वापर करत जमीन सुपीकतेवर लक्ष केंद्रीत केले. आता माझ्या जमिनीची सुपीकता वाढली आहे. वेलीची मुळीदेखील चांगली वाढते. बागेत बारामाही पालापाचोळा, तणांचे आच्छादन असते. यामुळे जमिनीची धूप थांबली. वाफसा असल्याने आठ दिवसांतून एक ते दोन तास पाणी दिले जाते. पाला पाचोळ्याचे आच्छादन केल्यामुळे कमी पाणी लागते. ओलावा टिकून राहतो. आॅक्टोबर छाटणीच्या दरम्यान शिफारशीनुसार रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देतो. आच्छादनामुळे मशागत बंद केली आहे.

एकमतानं होतेय शेती नियोजन शेती व्यवस्थापनातील धडपडीबाबत सौ. अरुणा बन्ने म्हणाल्या, की कधी गारपीट, तर कधी दुष्काळ अशी संकटांची मालिका सुरूच असते. त्यावर मात करण्यासाठी आम्ही दोघेही जिद्दीनं लढलो. शेती करताना घरात एकमत असावे लागतं. तरच शेतीचं नियोजन काटेकोरपणे होते. माझे पती जो निर्णय घेतील त्या निर्णयाला कधी नकार दिला नाही. आम्हाला शिकता आलं नाही, पण आम्ही आमच्या मुलांना उच्चशिक्षण दिलं. मोठा मुलगा अभिजितने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे, तर लहान मुलगा शशांकने विज्ञान शाखेचं शिक्षण पूर्ण केले आहे. आज दोन्ही मुले नोकरी करतात. पण, सुटीत आल्यानंतर शेतात आमच्याबरोबरीने राबतात.

- सुरेश बन्ने, ९७६५०२८१३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT