द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला 
फळबाग

ढगाळ वातावरणामध्ये भुरी प्रादुर्भावाची शक्यता

डॉ. एस. डी. सावंत

सांगली, सोलापूर येथील द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये आज आणि उद्या (१७, १८ तारखेपर्यंत) वातावरण ढगाळ राहील. १८ तारखेपासून २१ तारखेपर्यंत अधूनमधून एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहील. सांगली विभागामध्ये पळशी, खानापूर, विटा, तासगाव या सर्व भागामध्ये सर्वसाधारणपणे १८ व त्यानंतर २१, २२ तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर भागामध्ये याच दिवसामध्ये सांगलीप्रमाणे अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन फुटी फुटत आहेत आणि शेंडा चालू आहे. अधूनमधून पाऊस पडला तरी वातावरणामध्ये जास्त आर्द्रता वाढत नाही. ती ४० ते ५० टक्क्यापेक्षा अधिक राहत नाही. अशा वातावरणामध्ये करपा रोगाची फारशी शक्यता नाही. परंतू मागील आठवड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बहुतांशी ठिकाणी वातावरण ढगाळ राहत असल्यामुळे पुन्हा भुरीचाच जास्त धोका दिसतो. ज्या ज्या ओलांड्यावर जास्त फुटी आलेल्या असतील, तिथे आतील बाजूला भुरी वाढण्याची शक्यता आहे. या भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात वापर करावे. सांगलीच्या काही भागामध्ये वाळवा, तासगाव भागामध्ये मागील एक दोन दिवसामध्ये हलक्या गारा पडून वादळी पाऊस झाल्याचे समजते. बऱ्याचशा ठिकाणी या गारामुळे नवीन फुटीच्या हिरव्या काड्यावर कमी जास्त प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. बरीचशी पानेही फाटलेली आहेत. खरे पाहता या कोवळ्या हिरव्या काड्यावरील जखमा कालांतराने भरून निघतील. फाटलेल्या पानांनी फारसा फरक पडणार नाही. नवीन चांगली पाने येऊन, ती ढगाळ वातावरण व पावसामुळे जोमाने वाढतील. झाडावर ताण कमी होईल. भुरीव्यतिरिक्त अन्य कोणत्या रोगाची त्वरीत शक्यता नसल्यामुळे सध्या भुरीसाठी सल्फरव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बुरशीनाशकाच्या फवारणीची जरूरी नाही. १८ ते २१ च्या दरम्यान जर बागेमध्ये पाऊस झाला, तर या सर्व बागांमध्ये बुरशीजन्य करपा रोगाची शक्यता वाढेल. म्हणून २० ते २१ तारखेनंतर पाऊस झालेल्या ठिकाणी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅक्स मिक्स) प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. या पावसाआधी याची फवारणी केल्यास बुरशीनाशक पावसाने धुवून जाईल व पुन्हा २१, २२ तारखेनंतर फवारणी करणे आवश्यक होईल. म्हणूनच २१ तारखेनंतर फवारणी करण्याचा सल्ला देत आहोत. नाशिक भागामध्ये पावसाची विशेष शक्यता नाही. परंतू वातावरण अधूनमधून ढगाळ राहणार आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे भुरीसाठी योग्य ती फवारणी करणे आवश्यक आहे. दिंडोरी व जवळपासच्या भागामध्ये १७,१८ तारखेला कदाचित काही भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता पाहूनच पाऊस संपल्यानंतर वरीलप्रमाणे फवारणीचा निर्णय घ्यावा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT