शेळ्यांच्या जातिवंत (Breeds of goats) पैदाशीसाठी कृत्रिम रेतनाचा पर्याय फायदेशीर ठरणार असल्याने यासाठी महाराष्ट्रात तीन हजार कृत्रिम रेतन केंद्रे उघडण्यात येणार आहेत. पशू व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्यात सुमारे १०६ लाख शेळ्या (Goat) आणि मेंढ्या आहेत. यातील केवळ ३० टक्के शेळ्या-मेंढ्या या जातिवंत, तर उर्वरित ७० टक्के शेळ्या-मेंढ्यांमध्ये कुठल्याच जातीचे साधर्म्य दिसत नाही. कुठल्याच जातीचे साधर्म्य नसलेल्या कमी उत्पादक शेळ्यांमध्ये (Goat Production) कृत्रिम रेतनाद्वारे दूध आणि मांस उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारने आता हाती घेतलेल्या कार्यक्रमाला बराच उशीर झाला, असेच म्हणावे लागेल. राज्यात शेळ्या-मेंढ्या सुधारण्यासाठी काय करता येईल.
याबाबतच्या एका अहवालामध्ये सुमारे चार दशकांपूर्वीच कृत्रिम रेतनाचा उल्लेख आढळतो. राज्यात नारी संस्थेत १९९३ मध्ये बोकडाचे ताजे, पातळ केलेले वीर्य वापरून कृत्रिम रेतनास सुरुवात झाली. परंतु अशा वीर्याचे आयुष्य काही तासांचेच असते. त्यामुळे वीर्य गोठवण्याची गरज भासू लागली. २०१२ पासून नारी संस्थेत वीर्य स्ट्रॉमध्ये गोठवले जाऊ लागले. बोकडाचे (Buck) वीर्य गोठवणारी भारतातील एकमेव म्हणून ही प्रयोगशाळा नावारूपाला आली. असे असताना शेळ्यांच्या जाती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांपासून (Farmer To Government) ते शासन असे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे अवर्गीकृत शेळ्यांचे प्रमाण देशात वाढत असून, अशा शेळ्यांचे दूध आणि मांस (Milk And Mutton) उत्पादन अत्यंत कमी मिळते.
शेळीला गरिबाची (Goat Poor Cow) गाय म्हणतात. उघड्यावर चरणाऱ्या शेळ्या संगोपनावर फारसा खर्चही होत नाही. स्थानिक बाजारात बाराही महिने कधीही शेळी नेऊन उभी केली, की हातोहात खपते आणि पाळणाऱ्यास वय आणि वजनानुसार पैसे देऊन जाते. शेतकऱ्यांची नड भागविणाऱ्या शेळीला त्यामुळेच एटीएम (Goat ATM) असेही संबोधले जाते. अशावेळी कृत्रिम रेतन कार्यक्रमाद्वारे शेळ्यांचे दूध आणि मटणाचे उत्पादन वाढले तर राज्यातील तमाम शेळीपालक शेतकऱ्यांचा (Farmer) त्यात थेट फायदाच होणार आहे. सध्या राज्यात कुठून तरी नवनव्या शेळ्यांच्या जाती आणून आपल्या येथील शुद्ध जातींबरोबर त्याचा संकर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यावर शासनासह कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे कुठल्याही आकार, रंगाच्या नवनव्या शेळीच्या (Goat) प्रजाती निर्माण होत आहेत. गाईंमध्ये जेव्हा कृत्रिम रेतन आले तेव्हा येथील देशी गाई नामशेष होतील, अशी ओरड होत होती.
अशाच प्रकारची ओरड आत्ताही होऊ शकते. परंतु कृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये जातिवंत पैदास करणे हेच अहल्यादेवी होळकर शेळी व मेंढी (Goat And Sheep) महामंडळाचे ध्येय आहे, हे लक्षात घेतले पाहिजेत. गाई- म्हशींपेक्षा शेळी- मेंढींमधील कृत्रिम रेतन थोडे किचकट आहे. राज्यातील पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये कृत्रिम रेतनाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने सर्व पशुधन विकास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यातील एक सकारात्मक बाब म्हणजे शेळ्यांमधील कृत्रिम रेतन शिकून घेतले म्हणजे या तंत्राचा वापर शेळीपालकांना देखील करता येऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिक अथवा पारंपरिक चार-दोन शेळ्या पाळणारांनी तांत्रिक प्रशिक्षण घेऊन कृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांची पैदास होईल, हे पाहावे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळातर्फे महिलांसाठी शेळी सखी हा उपक्रम आहे. कृत्रिम रेतनासह शेळ्यांमधील विविध आजार, त्यांवरील प्रथमोपचार, जंतप्रादुर्भाव, नर करडे खच्चीकरण,
जखमांवरचे उपचार या सर्वांचे प्रशिक्षण शेळीसख्यांना देण्यात आले तर त्या या व्यवसायात अधिक सक्षम होतील. कृत्रिम रेतन कार्यक्रमात जातिवंत बोकडांच्याच वीर्यमात्रा वापरल्या जातील तसेच याबाबतचे साहित्य सर्वांना उपलब्ध होईल, याची काळजी पशू संवर्धन विभागाला घ्यावी लागेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.