उन्हाळ्यामध्ये म्हशीच्या प्रसूतीचे नियोजन करून दूध उत्पादन करावे.
उन्हाळ्यामध्ये म्हशीच्या प्रसूतीचे नियोजन करून दूध उत्पादन करावे. 
कृषी पूरक

व्यावसायिक, शास्त्रीय दृष्टिकोनातून करा प्रजनन व्यवस्थापन

डॉ. एम. व्ही. इंगवले

म्हशीच्या प्रजनन व्यवस्थापनामध्ये म्हैस विल्यापासून गाभण राहण्यापर्यंत प्रत्येक बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. साधारणपणे दीड वर्षात सरासरी एक वेत मिळेल असे व्यवस्थापन ठेवावे.

म्हैसपालनात व्यावसायिक दृष्टिकोन अाणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून अधिक दुग्धोत्पादन अाणि म्हशीपासून जास्तीत जास्त वेत मिळवणे शक्य होते. त्यासाठी उत्तम प्रजनन व्यवस्थापनामध्ये दीड वर्षाला एक वेत व प्रजननासंबंधी अाजारांना अटकाव ह्या गोष्टीकडे लक्ष असणे गरजेचे अाहे. सोबतच गोठ्यात जन्मलेल्या रेडकापासून नवीन उत्तम पारडी तयार होणे व्यवसाय टिकवण्यासाठी अाणि वृद्धिंगत करण्यासाठी अावश्‍यक अाहे. सद्यःस्थितीत दुधाळ, उत्तम व निरोगी म्हशींची उपलब्धता कमी होत असून किंमतही वाढत अाहे. याकरिता म्हैस पालकांनी नवीन पिढी निर्माण करणे महत्त्वाचे अाहे.

म्हशीच्या प्रसूतीच्या अवस्था गर्भधारणेचा १० महिने १० दिवस कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हशीची प्रसूती होते. प्रसूतीची वेळ जवळ आली की योनी फुगीर होते, चिकट पांढरा स्त्राव येतो, कास फुगीर होते व सड ताठर होतात. म्हशीचा पृष्ठभाग खाली सरकतो व शेपटीचे मूळ प्रकर्षाने जाणवते. प्रसूती प्रामुख्याने तीन अवस्थेत घडते. १. पहिली अवस्था ः गर्भाशयाचे दार उघडते. या अवस्थेत म्हैस बेचैन असते. उठबस करते, पोटाकडे बघते. प्रसूतीच्या वेदना/कळ यामध्ये गर्भाशयाची हालचाल वाढते. गर्भ गर्भमुखाकडे ढकलला जातो व गर्भाशयमुख उघडले जाते. २. दुसरी अवस्था ः पाणमोट फुटून वासराचे समोरच्या दोन पायावर मध्यभागी तोंड दिसते. विताना रेडकाची ही सामान्य अवस्था आहे. गर्भाशयाच्या व पोटाच्या स्नायुंच्या हालचालीमुळे रेडकू बाहेर फेकले जाते. ३. तिसरी अवस्था : वार गर्भाशयातून बाहेर पडतो.

विताना प्रामुख्याने खालील बाबीकडे लक्ष द्यावे

  • विताना रेडकाची अवस्था सामान्य नसेल तर ओढताण करू नये. यामुळे रेडकू बाहेर येत नाही. गर्भाशयाला तसेच रेडकाला इजा पोचते.
  • विताना पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये गर्भाशयातील रेडकाच्या हालचालीमुळे गर्भशयाला पीळ पडतो. यामध्ये म्हैस उठबस करते, बेचैन होते. एका बाजूला झोपून ताण देते. पोटाकडे वळून पाहणे इत्यादी लक्षणे दिसतात. परंतु रेडकू बाहेर येत नसते. अशा वेळी त्वरित तज्ज्ञ पशुवैद्यकांना उपचारासाठी बोलवावे. म्हशीमध्ये गर्भाशयाला पीळ पडण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • रेडकू मोठे असेल, योनीमार्ग अरुंद असेल व प्रसूतीमार्ग अरुंद असेल अशा अवस्थेत विताना अडचण होते. अशा वेळेस रेडकांना ओढणे हानिकारक असते.
  • बहुतांश वेळा रेडकू बाहेर आल्यानंतर किंवा ओढल्यानंतर गर्भाशय पूर्ण बाहेर येते. अशा वेळेस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गर्भाशय २ टक्के पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवावे. मल, मूत्र व जखमा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • प्रसूतीच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये साधारणपणे १० तासांनंतर वार पडतो. तोपर्यंत वार पडण्याची वाट पहावी. त्या अगोदर वार काढू नये किंवा वारास जड वस्तू बांधून ठेवू नये. त्यामुळे गर्भाशयाच्या आवरणास इजा पोचते.
  • विताना म्हशीची सर्व ऊर्जा खर्च होते. हा ताण कमी करण्याकरिता अर्धा ते १ किलो गूळ ३ ते ४ लिटर पाण्यात मिसळून पाजावा. यामुळे तात्पुरती ऊर्जा मिळते.
  • काही म्हैस पालक वार पडल्याशिवाय म्हशीचा चीक काढत नाहीत. परंतु हे चुकीचे असून म्हैस विल्यानंतर कास कोमट पाण्याने धुवून लगेच चीक काढून वासरास पाजावा.
  • चीक काढताना शरीरातील ऑक्सिटोसिन संप्रेरकाचे प्रमाण वाढते व यामुळे वार पडण्यास मदत होते.
  • म्हशीतील विण्याचा ताण कमी करण्याकरिता वेदनाशामक औषधे वार पडण्याची प्रक्रिया सुलभ होण्याकरिता वनस्पतिजन्य औषधे, कॅल्शिअम तसेच ऊर्जा असणारी औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तोंडावाटे द्यावीत.
  • गर्भाशयातील रक्तामिश्रित स्त्राव बाहेर पडणे फायदेशीर

  • म्हैस विल्यानंतर साधारणपणे दहा दिवसांनंतर गर्भाशयातील लालसर, तांबडा रंगाचा रक्तमिश्रित स्त्राव बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे गर्भाशय आकुंचन होण्याची प्रक्रिया चांगली होत असते व गर्भाशय पूर्वाअवस्थेत योग्य वेळेत येते.
  • हा रक्तमिश्रित स्त्राव गर्भाशय मुख बरे झाल्यामुळे किंवा गर्भाशयाच्या हालचाली न झाल्यामुळे तसाच राहतो व जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयाचा दाह किंवा गर्भाशयामध्ये पू तयार होतो. यामध्ये म्हशीला ताप येणे, पान्हा न येणे, दूध उत्पादन न वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात. यामुळे असा स्त्राव पडला याची खात्री करावी व विल्यानंतर गर्भाशय पूर्वाअवस्थेत आले आहे किंवा नाही हे ३०-४५ दिवसांनंतर पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावे.
  • अचूक माजाचे निदान व योग्य वेळेत कृत्रिम रेतन

  • म्हैस विल्यानंतर संतुलित आहार, सुयोग्य व्यवस्थापन, गर्भाशय पूर्वाअवस्थेमध्ये आल्यानंतर दोन महिन्यांनंतर माजावर आले पाहिजे.
  • बहुतांश म्हशीमध्ये माजाची लक्षणे तीव्र नसतात यांना मुका माज म्हणतात. यामुळे माजाचे अचूक निदान कठीण जाते.
  • म्हशीमध्ये वारंवार थोडी थोडी लघवी करणे, पान्हा चोरणे, योनीमार्गातून स्त्राव येणे व लालसर होणे ही प्रमुख लक्षणे दिसतात.
  • म्हशीमध्ये माज सुरू होण्याचे प्रमाण हे रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त असल्यामुळे दिवसातून कमीत कमी चार वेळा माजाचे निदान करावे.
  • माजाचा कालावधी हा ऋतू व म्हशीमध्ये वेगळा असतो. यामुळे साधारणपणे २४ तास माज असणाऱ्या म्हशीमध्ये मध्य माजाच्या कालावधीमध्ये (१० ते १२ तासांनंतर) कृत्रिम रेतन करावे.
  • उन्हाळ्यामध्ये माजाचा कालावधी कमी असतो. यामुळे लवकर कृत्रिम रेतन करावे. कृत्रिम रेतन वेळेत न झाल्यास गर्भधारणा होत नाही व म्हशी वारंवार उलटतात.
  • म्हैस गाभण राहिल्यानंतर दूध कमी देते किंवा आटते यामुळे कृत्रिम रेतन करत नाहीत. परंतु, विल्यानंतर दोन महिन्यांनी माजावर आलेल्या म्हशीला कृत्रिम रेतन करावे. अन्यथा म्हशीचा भाकड काळ वाढून तोटा सहन करावा लागतो. यामुळे म्हशीचा एक माज चुकला तर २००० रुपयांचे नुकसान होते व दोन वेतातील अंतर वाढते.
  • गर्भतपासणी व गाभण म्हशीची काळजी

  • म्हशीला कृत्रिम रेतन केल्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी माजावर आली आहे का हे पहावे.
  • कृत्रिम रेतनानंतर दोन महिन्यांनंतर म्हैस गाभण आहे किंवा नाही याची तपासणी करून घ्यावी. फळवल्यानंतर म्हैस माजावर आली नाही म्हणजे गाभण अाहे असा बहुतांश पशुपालकांचा गैरसमज होतो. गाभण नसलेली म्हैस ५ ते ६ महिने पोसली जाते यामुळे तोटा होतो.
  • तपासणीनंतर गाभण नसलेल्या म्हशींना माजावर येण्याची औषधे किंवा संप्रेरके देऊन माजावर आणून कृत्रिम रेतन करावे. जेणेकरून दीड वर्षाला एक वेत मिळेल.
  • अल्ट्रासोनोग्राफीच्या सहाय्याने म्हशीची गर्भतपासणी ३५ दिवसांत करता येते. यामध्ये गर्भाच्या हृदयाची हालचाल, गर्भ हे दिसते. मोठ्या म्हैस पालकांनी याचा उपयोग करावा.
  • म्हैस गाभण आहे याची खात्री झाली की संगोपन चांगले करावे. म्हशीला शेवटच्या दोन महिन्यांत आटवावे व चारही सडामध्ये प्रतिजैविक औषधे सोडावी. यामुळे गाभण कालावधीत कासदाह अाजार होणार नाही.
  • म्हैस साडेसात किंवा आठव्या महिन्यांत आटवल्यामुळे गर्भाच्या पोषणासाठी अन्नद्रव्ये मिळतात. कासेतील पेशींना विश्रांती मिळते अाणि विल्यानंतर दूध निर्मिती चांगली होते व म्हशीची दूध उत्पादन क्षमता चांगली राहते.
  • गाभण म्हशीची शक्‍य असल्यास स्वतंत्र व्यवस्था करावी व हलका व्यायाम द्यावा.
  • हिरवा व वाळलेला चारा मुबलक प्रमाणात द्यावा. सोबत दररोज २ किलो चांगले पशुखाद्य व ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
  • विण्याच्या काही दिवसअगोदर म्हशीकडे सारखे लक्ष द्यावे व जागा कोरडी व स्वच्छ ठेवावी.
  • म्हैस दूध देत नाही म्हणून कमी प्रतीचा चारा व पशुखाद्य न देणे हे हानिकारक आहे.
  • प्रजनन व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  • म्हशीच्या विण्याचा कालावधी ऑक्‍टोबर व नोव्हेंबर जास्त असतो अाणि हिवाळ्यामध्ये दुधाचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यामध्ये दुधाची उपलब्धता करण्यासाठी माजाचे एकत्रीकरण करून उन्हाळ्यामध्ये म्हशीच्या प्रसूतीचे नियोजन करून दूध उत्पादन करावे.
  • दीड वर्षामध्ये एक वेत मिळण्यासाठी विल्यानंतर म्हैस १०० ते १२० दिवसांत गाभण राहिली पाहिजे. म्हणून विल्यानंतर दोन महिन्यांनी म्हैस माजावर येणे गरजेचे आहे.
  • वांझ म्हशी तसेच माजावर न येणाऱ्या म्हशींना सुयोग्य उपचार करावेत.
  • बहुतांश शहरामध्ये म्हैस पालक गाभण म्हशी विकत घेऊन दूध घेतात व परत आटल्यानंतर विकतात. यामुळे नफ्याचे प्रमाण प्रचंड कमी होते. याकरिता पारडी तयार करून पुढची उत्तम वंशावळ असणारी पिढी गोठ्यात निर्माण करावी.
  • फळवण्याकरिता कृत्रिम रेतनाचा वापर करावा. मुऱ्हा, म्हैसाना, जाफराबादी, सुरती, पंढरपुरी, नागपुरी म्हशींना याच प्रजातीचे कृत्रिम रेतन करावे. तर गावठी म्हशींना मुऱ्हा प्रजातीचे कृत्रिम रेतन करावे.
  • म्हशीचा माज हा सौम्य असतो करिता माज निदान करावे. उन्हाळ्यामध्ये जास्त काळजीपूर्वक करावे.
  • वांझ, प्रजनन संस्थेतील बिघाड, कासदाहामुळे सड बंद असलेल्या म्हशी कळपातून कमी कराव्यात व उत्तम प्रजननक्षम म्हशी ठेवाव्यात.
  • जास्त म्हशी व अद्ययावत गोठा असणाऱ्या म्हैसपालकांनी अल्ट्रासोनोग्राफी, प्रयोग शाळेतील तपासणी इत्यादी निदानक्षम तंत्रज्ञानाचा वापर करून क्षमता योग्य राखावी.
  • दूध उत्पादन, प्रजननाच्या नोंदी ठेवून प्रत्येक म्हशीची माहिती नोंद करून ठेवावी. जेणेकरून उपचार केल्यावर फायदा होईल.
  • सद्यःस्थितीत मादी वासरू तयार होणाऱ्या वीर्यकांडी उपलब्ध (मुऱ्हा प्रजातीच्या) असून नवीन वंशावळीसाठी याचा वापर केल्यास मादी वासरेच तयार होतील.
  • संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT