झाडपाल्यांमध्ये प्रथिने, खनिजे यांचे प्रमाण उत्तम असल्यामुळे शेळ्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.
झाडपाल्यांमध्ये प्रथिने, खनिजे यांचे प्रमाण उत्तम असल्यामुळे शेळ्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यास मदत होते. 
कृषी पूरक

शेळ्यांच्या अाहारातील झाडपाल्याचे महत्त्व

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील

शेळ्या झाडपाला खूप आवडीनं खातात. त्यामुळे शेतातील इतर चारा पिकांबरोबरच झाडपाल्यांमध्ये प्रथिने, खनिजे यांचे प्रमाण उत्तम असल्यामुळे शेळ्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यास मदत होते. चाऱ्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते व पशुखाद्यावरील खर्चात बचत होऊन शेळीपालन किफायतशीर होऊ शकते.    आपल्या भागातील शेळीपालन मुख्यतः मुक्त पद्धतीचे आहे. त्यामध्ये शेळ्यांना दिवसभर शेतातून, वनातून, डोंगर दऱ्यातून फिरवले जाते व शेळ्यांची दिवसभराची चाऱ्याची गरज भागवली जाते. परंतु, दिवसेंदिवस कमी होत असणारे शेती क्षेत्र, माळरानाचा शहरीकरणासाठी वापर, अल्पवृष्टीमुळे डोंगरदऱ्यामध्ये उत्पादन होणारा अल्प चारा व वृक्ष वाढ यामुळे मुक्त शेळीपालन पद्धतीला मर्यादा येत आहेत. याला पर्याय म्हणून लोक सध्या अर्धबंदिस्त किंवा पूर्णतः बंदिस्त शेळीपालन व्यवसायासकडे वळत आहेत. बंदिस्त शेळीपालनामध्ये चाऱ्याची गरज भागवण्यासाठी योग्य प्रकारचे पौष्टिक चारा पिकांची लागवड करणे तितकचं महत्त्वाचं बनलं आहे. याकरिता काही झाडे अाणि झुडपांची माहिती असणे अावश्‍यक अाहे. शेवरी सहा मीटरपर्यंत उंच अाणि जलद वाढ होणारी, बहुवर्षीय द्विदल चारा पीक म्हणून शेवरीची लागवड करता येते. शेवरीची लागवड सर्वसाधारणपणे बांधावर केली जाते. शेवरीच्या पानात कॅल्शियम, प्रथिने, स्फुरद यांचे प्रमाण उत्तम असते. जमिनीची धूप थांबवण्यासाठी शेवरीची मदत होते. सपाट जमिनीवर ओळीत शेवरीची पेरणी करता येते. शेवरीमध्ये १८.२ टक्के पचनीय प्रथिने व ५६.८१ टक्के एकूण पचनीय पदार्थ असतात. सुबाभूळ सुबाभूळ ही सर्व शेळ्यांसाठी उपयुक्त चारापीक आहे. सुबाभूळ कमी पाण्याच्या प्रदेशातही तग धरून चारा उत्पादन देते. यापासून मिळणाऱ्या चाऱ्यामध्ये जवळजवळ २०-२२ टक्के प्रथिने, ८.४ टक्के खनिजे असतात. सुबाभळीच्या हिरव्या शेंगा लुसलुसीत व मऊ असतात. बियांचा वापर शेळ्यांच्या खुराकात होऊ शकतो. शेळ्यांच्या आहारात सुबाभळीचा वापर ४० टक्के पर्यंत करावा. जास्त प्रमाणात वापर केल्यास त्यातील मायमोसीन नावाच्या द्रवामुळे शेळ्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हेक्‍टरी ५० ते ६० टन हिरवा चारा मिळतो. बाभूळ बाभळीची झाडे जवळजवळ सर्वच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला, शेताच्या बांधावर आढळून येतात. शेळ्या या झाडाचा पाला व शेंगा आवडीने खातात. या चाऱ्यामध्ये १४-१५ टक्के प्रथिने, ६.३ टक्के खनिजे आढळतात. झाडाची वाढ लवकर होते. हे झाड सदाहरित झाड म्हणून ओळखले जाते. बाभळीची झाडेमुक्त शेळीपालनाचा मुख्य आधार आहेत. अंजन उष्ण हवामानात विविध प्रकारच्या मातीत येणारे हे झाड आहे. या झाडाची पाने शेळ्यांसाठी एक उत्कृष्ट खाद्य आहे. हे झाड मुख्यतः मध्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यात ठराविक भागात आढळते. यामध्ये ५.२० टक्के पचनीय प्रथिने व ५.४ टक्के इतर पदार्थ आढळतात. बोर केटेरी बोरीचा पाला शेळ्या खूप आवडीने खातात. सध्या बोरीच्या बऱ्याच जाती आढळून येतात. यामध्ये १८.६ टक्के प्रथिने असतात. हे झाड कमी पाण्यातही हिरवे राहते. हादगा पाने शेवरीसारखीच परंतु रुंद व लांब असतात. जवळजवळ ६ ते ९ मीटर उंच वाढते. वाढ जलद होते. या झुडुपाच्या पानात उच्च दर्जाची २६.५ टक्के इतकी प्रथिने आणि ९.३ टक्के खनिजे आढळतात. हे झुडुप बहुवर्षीय द्विदल शेंगांनीयुक्त, कमी पाण्यावर उन्हाळ्यामध्ये सुद्धा चारा उत्पादन देते. लागवड शेवरीसारखीच करता येते. या चाऱ्यावर शेळ्यांचे पोषण व वजनवाढ चांगली होते. उंबर उंबराचे झाड हे ओलसर जमीन किंवा पाण्याच्या स्त्रोतांच्या भोवती चांगल्या पद्धतीने वाढते. सुक्‍या आणि थंड मातीत झाडाची विशेष वाढ होत नाही. रोपटे लावून लागवड करता येते. यामध्ये जवळजवळ ५.४ टक्के पचनीय प्रथिने व ५०.४३ टक्के पचनीय पदार्थ असतात. चिंच उष्ण भागात वाढणारे हे झाड सर्व ठिकाणी आढळते. उंची ३० मीटरपर्यंत वाढते. या झाडाच्या पानांमध्ये सर्वसाधारणपणे १३.४० टक्के प्रथिने आणि ९.५ टक्के खनिजे असतात. यातील पोषणमुल्यांचे प्रमाण जागेनुसार व मोसमाप्रमाणे बदलते. चिंचेची झाडे शेतामध्ये, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात आढळून येतात. चिंचेचा अांबट पाला शेळ्या आवडीने खातात. पिंपळ झाडाची पाने टोकदार व शेळ्यांसाठी चांगला चारा म्हणून प्रसिद्ध आहेत. चांगल्या सूर्यप्रकाशात या झाडाची वाढ उत्तम होते. झाडातील पोषणमूल्यांचे प्रमाण मोसमाप्रमाणे बदलते. सर्वसाधारणपणे ११.९ टक्के प्रथिने, १४ टक्के खनिजद्रव्ये व ३९.२२ टक्के पचनीय पदार्थ असतात. या झाडाच्या पानांचा शेळ्यांच्या आहारात चांगल्या प्रकारे उपयोग होतो. शेवगा जास्त खोल पाण्याच्या प्रदेशात आढळणारे हे झाड आहे. पाला शेळ्यासाठी उत्तम अन्न आहे. लागवड रोपाद्वारे करता येते. पांगारा पानवेलीच्या मळ्यात पांगरा झाडांची सावली करिता लागवड करतात. बिया किंवा रोपाद्वारे लागवड करतात. हे झाड बहुवर्षीय आणि शेंगांनीयुक्त असते. चारा उत्पादनास वेळ लागतो. कोवळ्या फांद्या व पाने शेळ्या आवडीने खातात. पाण्याची सोय असल्यास नापिक जमिनीवरसुद्धा चांगले उत्पादन मिळते. यामध्ये पोषणमूल्यांचे प्रमाण उत्तम असते.   संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT