‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली  विजेची संपूर्ण गरज
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची संपूर्ण गरज 
कृषी पूरक

‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची संपूर्ण गरज

सतीश कुलकर्णी

परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर काही खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर २००९ मध्ये डॉ. विनोद कुलकर्णी ‘व्हीआरके न्यूट्रीशनल सोल्युशन्स’ या नावाने पशुखाद्य निर्मिती व्यवसाय सुरवात केली. पुढे २०११-१२ मध्ये आरग (ता. मिरज, जि. सांगली) येथे जमीन खरेदी करत ते लेअर पोल्ट्रीमध्येही उतरले. सुरवातीला ६५ हजार असलेली क्षमता वाढवत एक लाखापर्यंत पोचली आहे. आणखी विस्तारासाठी त्यांनी १३ एकर जमीन खरेदी केली असून, तिथे ४५ हजार पालक (पॅरेंट ॲण्ड ब्रीडर) पक्ष्यांच्या फार्मचे काम सुरू आहे. मात्र, पक्ष्यांची विष्ठा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या समस्यांची त्यांना जाण आहे. या समस्येतूनच त्यांनी संधी शोधली.  वीज आणि दुर्गंधीच्या समस्येवर केली मात ः  डॉ. मनोज कुलकर्णी यांचा फार्म एक लाख पक्ष्यांचा आहे. प्रति दिवस सुमारे ८ ते १० टन विष्ठा बाहेर पडते. विष्ठा कुजण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडणारे नायट्रस ऑक्साईड (३०० पट अधिक), अमोनिया, मिथेन (२५ पट अधिक), कार्बन डायऑक्साईड हे वायू जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरतात. या दुर्गंध, घाण व माश्‍यांमुळे परिसरातील गावांमध्ये पोल्ट्रीफार्मविषयी नाराजी असते. हे टाळण्यासाठी डॉ. विनोद हे प्रयत्नरत होते. तसेच त्यांच्या फार्मवर विजेची समस्याही होतीच. मागणी करूनही महामंडळाकडून विजेचा पुरवठा होत नव्हता. या दोन्ही समस्येवर बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले.  गजानन पाटील यांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर ४०० घनमीटर क्षमतेचा छोटा बायोगॅस प्रकल्प उभारून पाहिला. तो यशस्वीपणे चालतोय, हे लक्षात येताच २०१२-१३ मध्ये २५०० घनमीटर क्षमतेचा बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारला. त्यावेळी भविष्यातील पोल्ट्रीचा विस्तार लक्षात घेऊन तिप्पट अधिक क्षमतेचे डायजेस्टर बसवणे हे धाडसच होते. 

बायोमिथेन व सेंद्रिय खतनिर्मिती प्रक्रिया

१. पक्ष्यांच्या पिंजऱ्याखाली कन्व्हेअर बेल्ट असून, त्यावर पडलेली विष्ठा ठराविक वेळेनंतर शेडबाहेरील सिमेंट टाकीत पडते. २. विष्ठेमध्ये सम प्रमाणात पाणी टाकून यंत्राद्वारे घुसळले जाते. मिश्रण सेडिमेंटेशन टाकीमध्ये पाठवून, त्यातील वाळू आणि पंख वेगळे करतात.  ३. उर्वरित मिश्रण बायोगॅस डायजेस्टरमध्ये पाठवले जाते. त्यामध्ये हवारहीत स्थितीमध्ये अॅसिटोजेनिक आणि मिथेनोजेनिक जिवाणूंच्या साह्याने हायड्रोलाईज केले जाते. या कच्च्या सेंद्रिय पदार्थापासून कुजवण आणि अन्य प्रक्रियेतून बायोगॅसची निर्मिती होते. स्लरी बाहेर पडते.  ४. बायोगॅस शुद्धीकरण - कच्च्या बायोगॅसमध्ये मिथेन ६० टक्के, कार्बन डायऑक्साईड ३५ टक्के आणि बाष्पाचे प्रमाण ५ टक्के व अन्य काही वायू सूक्ष्म प्रमाणामध्ये असतात. अधिक ज्वलनक्षमता मिळण्यासाठी शुद्धीकरण आवश्यक ठरते. त्यासाठी कच्चा बायोगॅस शुद्धीकरण टाक्यामध्ये पाठवून, ‘व्हॅक्युम स्विंग प्रेशर ॲडसॉर्प्शन’ (व्हिएसपीए) पद्धतीने शुद्ध करतात. येथे बाष्प, सल्फर, कार्बन डायऑक्साईड वेगळे केले जातात. ९३ ते ९५ टक्के शुद्ध बायोमिथेन मिळतो. ५अ. बायोगॅस बलूनमध्ये साठवतात.  ५ब. बायोगॅस सरळ जनरेटरसाठी वापरून वीज मिळते. ५क. मायक्रोटर्बाईन या नवीन तंत्राद्वारे औष्णिक व विद्युत ऊर्जा उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे कार्यक्षमता ९० टक्क्यांपर्यंत वाढते. ६अ. बॉटलिंग प्रकल्प - हा बायोमिथेन १५० ते २०० बार दाबाखाली सिलिंडरमध्ये भरला जातो. या बायोगॅसमध्ये १० हजार किलोकॅलरी ऊर्जा असते. तिचा वापर उष्णता निर्मिती, वीजनिर्मिती, किंवा इंधन म्हणून करता येतो.  ६ब. कॉम्प्रेसरद्वारे योग्य दाबाखाली टाक्यामध्ये भरून वाहतूक केली जाते. ७.  स्लरीतील घन पदार्थ आणि द्रव पदार्थ वेगळे करण्याची यंत्रणा बसवलेली असून, त्यातील ५० ते ७० टक्के पाणी वेगळे केले जाते. या पाण्याचा पुनर्वापर करतात.  

विनोद कुलकर्णी म्हणतात... भविष्यामध्ये पोल्ट्री उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाययोजनाविषयी माहिती देताना डॉ. विनोद कुलकर्णी यांनी सांगितले, की पोल्ट्री खाद्यांच्या वाढत्या किमतीमुळे पोल्ट्री उद्योगातून नफ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आम्ही पोल्ट्री वेस्टपासून बायोमिथेन, सेंद्रिय खत निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. बायोगॅसपासून विजेच्या रूपांतरणाची कार्यक्षमता ३० ते ३५ टक्के इतकी असून, ६५ ते ७० टक्के उष्णतेच्या स्वरूपामध्ये वाया जाते. हा उष्णतेचा ऱ्हास रोखण्यासाठी काही तंत्रे आहेत. त्यातील मायक्रोटर्बाईन तंत्राची कार्यक्षमता ही ९० टक्क्यांपर्यंत आहे. यातून बायोगॅस कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय वापरतानाच ३५ टक्के वीज मिळते. सोबतच ३०० अंश सेल्सिअस तीव्र उष्णता मिळते. तिचा वापर व्हॅम तंत्राच्या साह्याने शेड गरम किंवा थंड राखण्यासाठी करता येतो. यासाठी लागणाऱ्या विजेची बचत होते. या तंत्राची प्राथमिक किंमत अधिक असली तरी पोल्ट्रीची कार्यक्षमता वाढल्याने काही काळातच त्यातून वसूल होते. या सर्व प्रक्रियांनंतर पोल्ट्री विष्ठेपासून सेंद्रिय खतांची निर्मिती केल्याने ४ रुपये प्रतिकिलो दर मिळतो. पोल्ट्री उत्पन्नासोबत बायोगॅस, वीज, सेंद्रिय खत यांच्या उत्पन्नामुळे काही प्रमाणात आर्थिक फायदा पदरी पडतो. सोबतच परिसराची स्वच्छता राखली जाऊन पर्यावरण आणि सामाजिक फायदेही होतात.

सुरवातीला प्रति दिन केवळ ३०० किलो बायोमिथेन वायू तयार होई. आता पक्ष्यांची संख्या वाढल्याने बायोमिथेन निर्मितीचे प्रमाण १००० किलोपर्यंत पोचले आहे. या वायूवर ६२.५ केव्हाएचे दोन जनरेटर चालवून वीज मिळवली जाते.   आता नव्या प्रकल्पामध्ये यातही सुधारणा केली असून, जनरेटरऐवजी मायक्रोटर्बाईन (६५ केव्हिए क्षमता) बसवला आहे. यामुळे उष्णता आणि वीज दोन्ही उपलब्ध होईल.  प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न 

  • कुलकर्णी यांच्या एक लाख पक्ष्यांच्या पोल्ट्रीतून ८ ते १० टन टाकाऊ घटक मिळतात. त्यातून ५ टन सेंद्रिय खत (मूल्य २० ते २४ हजार रु.),  १००० किलो बायोमिथेन (मूल्य ३० ते ३५ हजार रुपये) प्रति दिन तयार होतो. 
  •   सेंद्रिय खताची विक्री ४००० रुपये प्रति टन या प्रमाणे करतात.    
  •   उपलब्ध बायोगॅसद्वारे सध्या जनरेटर चालवून संपूर्ण फार्मच्या ऊर्जेची गरज भागते. उर्वरित वायू सांगली येथील पशुखाद्य निर्मिती कारखान्यातील बॉयलरसाठी वापरतात.  
  •   प्रकल्प उभारणी व बॉटलिंग युनिटसह वाहतुकीसाठी वाहन यांचा एकूण खर्च २ कोटी रुपये इतका झाला. आजपर्यंत बायोमिथेन व सेंद्रिय खतांच्या उत्पादनातून त्या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल झाला. एमएनई (मेढा मार्फत) या प्रकल्पासाठी ५० लाख (२००० रुपये प्रति घनमीटर) इतके अनुदान विचाराधीन आहे. 
  • समस्या नव्हे...संधी

  •      भारतातील सर्व पोल्ट्री फार्ममध्ये ही यंत्रणा उभारल्यास सुमारे पाच लाख टन बायोमिथेन व ५० लाख टन सेंद्रिय खत निर्मिती शक्य आहे. सध्या भारत एकूण वापराच्या ७० टक्के इंधन वायू आयात करतो. त्याला बायोमिथेन चांगला पर्याय होऊ शकतो. 
  •      सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा प्रकल्पातून अतिरिक्त झालेली वीज ज्या प्रमाणे राज्याचा विद्युत विभाग खरेदी करतो, तशीच व्यवस्था बायोमिथेनद्वारे तयार केलेल्या विजेसाठी उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. 
  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये 

  •   लेअर पोल्ट्रीतील दुर्गंध व घरमाश्यांचा उपद्रव टाळण्यात यश. 
  •   शंभर टक्के स्वच्छ व शाश्वत ऊर्जेची उपलब्धता. 
  •   आरग येथील प्रकल्पात संपूर्ण वीज स्वयंपूर्णता साधली. 
  •   मिरज येथील बॉयलरसाठीही होतो बायोमिथेनचा वापर. 
  •   गॅसनिर्मितीनंतर शिल्लक स्लरीतील पाण्याचाही केला जातो पुनर्वापर.
  •   संपूर्णपणे कुजलेल्या सेंद्रिय खतांची निर्मिती व विक्री. 
  • लेअर पोल्ट्रीचा ताळेबंद 

  •   एक लाख पक्ष्यांचे चोख व्यवस्थापन.  
  •   शक्य तिथे यांत्रिकीकरण असल्याने कमी मजुरांमध्ये व्यवस्थापन शक्य.  
  •   सरासरी प्रति पक्षी प्रति वर्ष ३२० अंडी मिळतात.  
  •   खाद्यावरील खर्चात वाढ झाल्याने प्रति अंडे उत्पादन खर्च हा ३.७० रुपये इतका झाला आहे.  
  •   त्या तुलनेत अंड्याचा सरासरी दर पूर्वीइतकाच राहिल्याने लेअर पोल्ट्री व्यवसाय नुकसानीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्हाला बायोमिथेन, सेंद्रिय खत उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्न मिळत असल्याने थोडाबहुत फायदा हाती राहत असल्याचे डॉ. विनोद यांनी सांगितले.  
  • संपर्क ः  डॉ. विनोद कुलकर्णी, ९८८१४७६११६ मनोज कुलकर्णी (व्यवस्थापक), ७३५०००२८३२  सांगली ऑफिस ः  ०२३३-२६७३२३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT