प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. प्रोपोलिसमध्ये प्रतिजैविकांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी प्रोपोलिसपासून बनविलेल्या औषधांचा चांगला फायदा होतो. रॉयल जेलीमध्ये जीवनसत्त्व बी-५, बी-६, अॅमिनो अॅसिड तसेच मोठ्या प्रमाणात शारीरिक क्षमता वाढविणारे घटक असतात. यामुळे शरीरातील पेशींचा नाश होत नाही. त्यांची वाढ चांगली होते, स्नायू बळकट होतात. प्रोपोलिस
नैसर्गिक संकटापासून मधमाश्यांचे संरक्षण करण्यासाठी मिळालेले वरदान म्हणजेच प्रोपोलिस. मधमाश्या झाडांपासून चिकट पदार्थ घेऊन त्याबरोबर परागकण तसेच शरीरातील इतर द्रव्यांचे मिश्रण तयार करून डिंकासारखा चिकट पदार्थ तयार करते. या पदार्थाचा वापर मधमाशी अनेक कामांसाठी करते.निसर्गातील बदल उदा. थंडी, पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी प्रोपोलिसचा वापर केला जातो. तसेच शत्रुकिडींना दूर ठेवण्यासाठीही प्रोपोलिसचा वापर होतो. यामध्ये ३६० पेक्षा जास्त उपयुक्त घटक आढळून येतात. ते मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. प्रोपोलिसमध्ये प्रतिजैविकांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. या सर्व गुणधर्मांमुळे मानवी आरोग्यामध्ये प्रोपोलिस महत्त्वाचे आहे. शरीरावरच्या विविध प्रकारच्या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी प्रोपोलिसपासून बनविलेल्या औषधांचा चांगला फायदा होतो.रॉयल म्हणजे उच्च दर्जाची जेली. मधमाशी पालनातील सर्वांत महागडा पदार्थ. मधमाश्यांच्या अंड्यातून आलेल्या पिल्लांना सुरुवातीच्या दोन-तीन दिवस रॉयल जेली खाऊ घालते. त्यानंतर त्यांना मध आणि परागकणांपासून तयार केलेले खाद्य खाऊ घातले जाते. मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये फक्त राणी माशीलाच जन्मल्यापासून ते मरेपर्यंत रॉयल जेली खाऊ घातली जाते. कामकरी तसेच नर मधमाशी चार-पाच महिने जगू शकतात. परंतु राणी माशी दोन-तीन वर्षे जगू शकते. राणी माशी दररोज ५०० ते १००० अंडी घालते. तसेच या अंड्यांना फलित करणे दररोजचे हे काम न चुकता तिला दोन-तीन वर्षे करावे लागते. मधमाश्यांची संख्या वाढविण्याचे काम एकाच राणी माशीला करावे लागते. एवढी कार्यक्षमता टिकविण्यासाठी निसर्गाने खास पदार्थ तयार केला तो म्हणजे रॉयल जेली. कामकरी माश्या आपल्या शरीरामध्ये मध घेऊन त्यामध्ये त्यांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट ग्रंथींमधील स्राव मिसळून त्यापासून रॉयल जेली तयार होते. रॉयल जेलीमध्ये जीवनसत्त्व बी-५, बी-६, अॅमिनो अॅसिड तसेच शारीरिक क्षमता वाढविणारे घटक असतात. यामुळे शरीरातील पेशींचा नाश होत नाही. त्यांची वाढ चांगली होते, स्नायू बळकट होतात तसेच शारीरिक कार्यक्षमता वाढवितात. आज अनेक देशांमध्ये मधमाश्यांपासून रॉयल जेली उत्पादनात भर दिला जात आहे. मधमाशीच्या डंखामध्ये (माशी चावल्यानंतर शरीरात दिसत असलेला काटा आणि त्यावरची छोटीशी पिशवी) विष असते. मधमाशीने एकदा डंख मारला की तिचे मरण पक्के असते. त्यामुळे ती विनाकारण डंख मारत नाही. मधमाशीच्या पोटाच्या पाठीमागे विषाची छोटी पिशवी असते. त्याला काटा जोडलेला असतो. डंख मारल्यानंतर यातून विष बाहेर येते. हे विष रंगहीन असून प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. मधमाश्यांपासून हे विष काढून त्यापासून विविध आजारांवर औषध निर्मिती तसेच सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी वापर होतो. बी थेरपीमध्ये मधमाश्यांकडून शरीराच्या ठरावीक भागावर डंख मारून विविध आजारांवर उपचार केले जातात. अर्थात बी व्हेनमचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केला जातो. संपर्क- डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६० ( लेखक शेतीतज्ज्ञ आहेत)